‘मी वर्ष २०१४ नंतर २ – ३ लेख वगळता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (प.पू. डॉक्टर) यांच्याविषयी लिखाण केले नाही किंवा इतरही काही लिखाण केले नाही. पूर्वी मी प.पू. डॉक्टरांच्या समवेत अनुभवलेले अमूल्य भावक्षण साधकांना सांगायचे; पण काही कारणांमुळे माझ्याकडून ते भावक्षण सांगणेही अल्प होत गेले.
प.पू. डॉक्टरांनी मला छायाचित्रे आणि ध्वनीचित्रफिती पडताळणे या सेवेतील बारकावे शिकवले. ‘त्या वेळी आणि त्यानंतरही इतर वेळी मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि मला आलेल्या अनुभूती किंवा अन्य विषय’, यांवर मी लिखाण करावे’, यासाठी प.पू. डॉक्टरांनी पुष्कळ प्रयत्न केले. ‘मी लिखाण करावे’, यासाठी त्यांनी कृती आणि प्रसंग यांच्या माध्यमातून अथक प्रयत्न केले. त्या समवेत त्यांनी माझ्या लिखाणात येणारे सर्व अडथळे दूर करून मला लिखाणासाठी प्रोत्साहित केले. ‘प.पू. डॉक्टरांनी यासाठी मला कसे घडवले ?’, याविषयी मी प्रस्तुत लेखात दिले आहे.
(भाग १)

१. साधिकेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी लिहिलेले लेख वाचून साधकांनी भावस्थिती अनुभवणे
१ अ. साधिकेने लिहिलेला लेख वाचून साधकांना प.पू. डॉक्टरांच्या समवेतचे अमूल्य भावक्षण पुन्हा अनुभवल्यासारखे वाटून त्यांनी साधिकेला त्यांच्याविषयी लिखाण करण्यास सांगणे : वर्ष २०१४ मध्ये मी प.पू. डॉक्टरांवर लेख लिहिला होता. तो लेख वाचलेले प्रसारातील अनेक साधक रामनाथी आश्रम बघायला आल्यावर मला आवर्जून भेटायचे आणि सांगायचे, ‘‘ताई, तू प.पू. डॉक्टरांविषयी लेख लिहीत जा. त्या लिखाणातून आम्हाला ‘त्यांना अनुभवल्यासारखे वाटते. तुझ्या ठिकाणी ‘आम्हीच तो प्रसंग त्यांच्यासह अनुभवत आहोत’, असे आम्हाला वाटते. माझ्या सहसाधिकाही मला हेच सांगायच्या.
१ आ. ‘प.पू. डॉ. आठवले यांच्याविषयी साधिका बोलतांना स्वतःसह ऐकणारे साधकही भावविश्वात जातात’, असे सहसाधिकेने सांगणे : मी सुश्री (कु.) सोनल जोशी (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६४ टक्के आणि वय ४४ वर्षे) हिला प.पू. डॉक्टर यांच्याविषयीचा एखादा प्रसंग सांगितल्यावर ती मला म्हणायची, ‘‘पूनम, तू प.पू. डॉक्टर यांच्याविषयी सांगायला लागलीस की, एका वेगळ्याच विश्वात जातेस आणि समोरच्यांनाही प.पू. डॉक्टरांच्या भावविश्वात नेतेस. त्यामुळे तू प.पू. डॉक्टरांविषयी लेख लिहायला पाहिजेस.’’
२. प.पू. डॉक्टरांनी लेख लिहायला सांगूनही लिखाण न होणे
२ अ. ‘लिखाण करूया’, असे ठरवूनही ते न जमणे : नंतर १ – २ वर्षांनी प.पू. डॉक्टरही म्हणाले होते, ‘‘किती वर्षे झाली, तू काही लिहिले नाहीस ना ?’’ तरीही मला लिहायला जमले नाही. साधारण वर्ष २०१९ पासून मला थोडा थोडा आत्मविश्वास येऊ लागला. ‘लिखाण करूया’, असे वाटू लागले होते; तरीही मला ते जमले नाही. यासाठी मी कान पकडून प.पू. डॉक्टर आणि सर्व साधक यांची क्षमा मागते.

२ आ. साधिकेने ‘शिकायला मिळालेली सूत्रे लिहून द्यावी’, यासाठी प.पू. डॉक्टरांनी पाठपुरावा करणे : वर्ष २०२० मध्ये काहीतरी वेगळेच घडले. त्या वेळी जणू प.पू. डॉक्टरांनी माझ्याकडून लिखाण करवून घ्यायचा चंगच बांधला होता. त्यांनी मला निरोप पाठवला, ‘डॉक्टरांनी साधकांना कसे शिकवले ?’, यावर संदीपला (पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे (समष्टी) संत यांना) ग्रंथ करायचा आहे. त्यासाठी सर्वांकडून लिखाण आले; पण पूनमचे आणि तिच्या समवेत सेवा करत असलेल्या अन्य साधकांचे काहीच लिखाण आले नाही.’ तेव्हा मी ‘त्या संदर्भात कसे लिहूया ?’ या दृष्टीने समवेत सेवा करणार्या साधकांना विचारले, तर ‘काहींनी त्यांना जे जे शिकायला मिळाले होते, ते लिहून दिले होते’, असे समजले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘प.पू. डॉक्टर लिखाण लिहून देण्यासंदर्भात इतरांना सांगत नसून आता त्यांना माझ्याकडूनच लिखाण येणे अपेक्षित आहे.’
त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी निरोप आला, ‘सर्वांचे लिखाण आले, केवळ पूनमचेच लिखाण आले नाही.’ ‘लिखाणाचा आरंभ कुठून आणि कसा करावा ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते.
२ इ. लिखाण होण्यासाठी पू. संदीपदादांनी दिलेले प्रोत्साहन ! : मी पू. संदीपदादांना ‘प.पू. डॉक्टरांकडून शिकायला मिळालेल्या सूत्रांचा ग्रंथ करत आहात का ?’, असे विचारले. साधारण वर्ष २०१८ मध्ये पू. संदीपदादांनी मला त्यांनी लिहिलेला एक लेख वाचायला दिला आणि म्हणाले, ‘‘प.पू. डॉक्टर एवढे सांगत आहेत, तर तू लिहिण्यास आरंभ कर. तुला लागेल ते साहाय्य करूया.’’ त्यांनी मला पुष्कळ प्रोत्साहन दिले. या प्रसंगामुळे माझे धैर्य आणि कृतज्ञता वाढली.
३. ‘प.पू. डॉक्टर यांच्याविषयी लिखाण करायचे’, या विचाराने रात्रंदिवस प.पू. डॉक्टरांचे स्मरण होणे
या सर्व घटनाक्रमातून माझ्या लक्षात आले, ‘प.पू. डॉक्टरांना मी ज्या कशात अडकले आहे, त्यातून मला बाहेर काढायचे आहे.’ प.पू. डॉक्टरांविषयी लिखाण करायचे ठरवल्यापासून ‘काय लिहूया ? कुठून आरंभ करूया ?’, या विचारांत रात्र आणि दिवस कसे निघून जायचे, ते मला कळत नव्हते. देव माझ्याकडून नेहमीची कामे आणि सेवा करवून घेत होता; पण माझे मन प.पू. डॉक्टरांच्या विचारांनी अन् त्यांच्या समवेत अनुभवलेल्या प्रसंगांनी भरून जायचे. सकाळी उठल्यापासून दिवसातील प्रत्येक कृती करतांना केवळ ‘परम पूज्य, आणि परम पूज्य’च आठवत होते.
४. लेख लिहिण्याच्या संदर्भातील प.पू. डॉक्टरांची इच्छा पूर्ण करू न शकल्यामुळे साधिकेला वाटलेली खंत !
४ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यावर लेख लिहिण्यास प.पू. डॉक्टरांनी सुचवणे : हे सर्व विचार चालू होते, तरीही लिखाण काही होत नव्हते. मी स्वतःलाच कंटाळले होते. त्यात मला आणखी एक प्रसंग सारखा आठवत होता. मी एका साधिकेवर (मैत्रिणीवर) लिहिलेला लेख प.पू. डॉक्टरांना पुष्कळ आवडला. ते मला म्हणाले, ‘‘आता असाच पुढचा लेख बिंदाताईंवर (आताच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यावर) लिही.’’
४ आ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकले नाही’, ही बोचणी अजूनही मनाला असणे : मी सौ. बिंदा सिंगबाळ यांच्या संदर्भातील केवळ सूत्रे लिहून ठेवली होती. त्यानंतर काही दिवसांनी २ – ३ साधिकांनी सौ. बिंदाताईंवर लेख लिहिले होते. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संपादकांना सुचवले होते की, पूनमने लिहिलेला लेख प्रथम छापायचा. मग ओळीने इतरांचे छापायचे. तेव्हाही माझ्याकडून ते लिखाण वेळेत झाले नाही आणि दैनिकाच्या संपादकांनी काही दिवस थांबून नंतर अन्य साधकांचे लेख छापायला आरंभ केला. ‘मी प.पू. डॉक्टरांची इच्छा पूर्ण करू शकले नाही आणि सौ. बिंदाताईंविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकले नाही’, ही बोचणी माझ्या मनाला अजूनही आहे आणि त्यातच आता प.पू. डॉक्टर यांच्या विषयीचे लिखाणही माझ्याकडून होत नव्हते. तेव्हा मला वाटले, ‘गुरूंची ही साधी इच्छाही मी पूर्ण करू शकत नाही, तर मी केवळ कल्याणस्वामींचा आदर्श समोर ठेवून काय उपयोग ?’, (एकदा समर्थ रामदासस्वामी त्यांच्या शिष्यांसह सज्जनगडावर अध्यात्माविषयी चर्चा करत होते. त्यांच्या समवेत कल्याण हा शिष्यही होता. अचानक बाहेर वाळत घातलेले त्यांचे वस्त्र (छाटी) वार्याने दरीत उडाले. तेव्हा समर्थांनी म्हटले, ‘‘कल्याणा, छाटी उडाली.’’ समर्थांचे ‘कल्याणा छाटी’ एवढेच शब्द ऐकून मागचा पुढचा कसलाही विचार न करता कल्याणाने दरीत उडी टाकली आणि छाटी पकडली. सारे शिष्यगण अचंबित मुद्रेने हा प्रसंग पहात होते. ‘गुरूंचे आज्ञापालन करतांना प्राणाचाही विचार न करता झोकून देऊन सेवा करण्याचा आदर्श जगासमोर ठेवणारे कल्याणस्वामी समर्थांचे शिष्योत्तम असल्यास नवल ते काय ? कु. पूनम साळुंखे यांच्यासमोर गुरुसेवा करतांना ‘गुर्वाज्ञेचे प्राणपणाने पालन करणार्या’ शिष्योत्तम कल्याणस्वामींचा आदर्श होता.)
साधनेत केवळ तन, मन, धन, बुद्धी आणि अहं एवढेच नाही, तर प्रसंगी प्राणही (सर्वस्व) अर्पण करण्याची सिद्धता असायला हवी’, असे मी साधनेत आल्यापासून मला नेहमी वाटते.
५. प.पू. डॉक्टरांनी इतर साधकांचे आलेले लेख वाचायला ठेवणे आणि ‘ते वाचले का ?’, याचा पाठपुरावाही घेणे
माझ्या मनाची ही स्थिती त्यांना कळत असावी. ते देवच आहेत ना ! त्यांना सर्वच कळते. मी मनातून त्यांची केवळ क्षमायाचना करत होते आणि ते मात्र त्यांच्या परीने चिकाटीने माझ्यासाठी प्रतिदिन नवीन नवीन निरोप पाठवत होते. या वेळीही त्यांनी मला इतर साधकांचे आलेले लेख वाचायला ठेवले. किमान ते वाचून तरी मी काहीतरी लिहावे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर ‘ते लेख मला मिळाले का ? मी वाचले का ? आता कसे लिहायचे, हे माझ्या लक्षात आले का ?’, असे सर्व प्रश्न त्यांनी मला विचारले.’
(क्रमशः)
– कु. पूनम साळुंखे (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
लेखाचा भाग २ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/882162.html