लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सिंधुनगरी – लाचलुचपत विभागाने सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे २ वरिष्ठ अधिकारी सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक माणिक भानुदास सांगळे आणि कार्यालय अधीक्षक उर्मिला महादेव यादव या दोघांना ३३ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले आहे. त्यामुळे सहकारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीसाठी श्री स्वामी समर्थ गृहनिर्माण संस्था मर्यादित, रेवतळे, मालवण या गृहनिर्माण संस्थेच्या मानीव अभिहस्तांतरण आदेशाप्रमाणे कार्यवाही करून भूमी संस्थेच्या नावे करण्याकरता ५० सहस्र रुपये रकमेच्या लाचेची मागणी करण्यात आली असल्याची तक्रार १० जानेवारी या दिवशी प्राप्त झाली होती. १६ जानेवारी या दिवशी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत लोकसेविका श्रीमती उर्मिला यादव यांनी तक्रारदाराकडे ४० सहस्र रुपयांची रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आज ४ फेब्रुवारी या दिवशी करण्यात आलेल्या दुसर्या पडताळणी कारवाईच्या वेळी लोकसेवक माणिक सांगळे यांनी तक्रारदाराकडे ३३ सहस्र रुपयांची लाच मागितली, तसेच लोकसेविका श्रीमती उर्मिला यादव या तक्रारदाराकडे लाचेची मागणी करत असतांना माणिक सांगळे यांनी तेथे उपस्थित राहून लाच मागणीस प्रोत्साहन दिले. लाचेची रक्कम पंच साक्षीदारांच्या समक्ष तक्रारदाराकडून स्वीकारतांना दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले.