अचानक उकाडा वाढला आहे. कफ पातळ होऊन नाक गळणे, सर्दी, घसा खवखवणे, अशी लक्षणे आता वाढतांना दिसत आहेत. त्यातच पुण्यात अशा संसर्गोत्तर ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जी.बी. सिंड्रोम)चे रुग्ण अचानक वाढले आहेत. यामागे ‘कॅम्पिलोबॅक्टर’ (एक प्रकारची अन्नाची विषबाधा), कच्चे मांस, ‘वॅक्सिन्स’ने (लसमुळे) आलेली प्रतिक्रिया, अशी विविध कारणे पुढे येत आहेत. याविषयीची माहिती, घ्यायची काळजी इत्यादी गोष्टी सामाजिक माध्यमे आणि बातम्या यांमधून भरभरून वाहत आहेच, म्हणून इथे पुनरुल्लेख टाळते. या दुहेरी दृष्टीने काही गोष्टी…
१. थंडीत छान असलेली भूक अचानक न्यून झालेली आता जाणवेल, अशा वेळी थंडीमध्ये घेत असलेले पदार्थ, काढा, सूप, भरपेट खाणे, तिखट पदार्थ, भरभरून तूप, लोणी, गोड पदार्थ खात असाल, तर आता न्यून करायला हरकत नाही. भूक लागली, तरच खा आणि साधा फुलका / भाकरी, भाजी, डाळ-भात अशा खाण्यावर भर द्या. गेले काही दिवस सामाजिक माध्यमांवर चर्चेत असलेली ‘बीट रूट कांजी’ हा प्रकारही टाळलेला बरा.

२. स्ट्रॉबेरी आणि द्राक्षे बाजारात दिसू लागली आहेत. द्राक्षांपेक्षा त्यावर असलेल्या फवारणीमुळे घसा दुखणे, खोकला हे त्रास होतांना दिसतात. द्राक्षे खायची, तर फेब्रुवारी मासाच्या शेवटच्या आठवड्याखेरीज नकोच. तेव्हा जेव्हा खाल, तेव्हा ती मीठ पाण्यात १०-१५ मिनिटे ठेवून हाताने खसखसून धुवून बेताने खा. विशेषतः लहान मुलांना देतांना प्रमाणातच द्या. स्ट्रॉबेरीविषयीही फवारणीचा धोका लक्षात घेऊन धुतांना काळजी घेणे आवश्यक आहे, तसेच ‘स्ट्रॉबेरी विथ क्रीम’, असे खायला नको.
३. ‘जी.बी. सिंड्रोम’च्या दृष्टीने काही दिवस बाहेरील मांसाहार, अंडी बंद करा. अर्धवट शिजलेल्या मांसातून वा अंड्यातून हा संसर्ग पसरू शकतो. स्नायू बळकट करण्यासाठी काही लोक कच्ची अंडी, दूध असा आहार घेतात, ते तसेही नकोच; पण सध्या आवर्जून टाळा.
४. कुठल्याही संसर्गापासून स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न करा. सर्दी, खोकला होऊ न देणे, मास्क वगैरे नेहमीच्या सूचनांचे पालन करणे आणि हात स्वच्छ धुणे या गोष्टी पाळा.
५. सध्या बाहेरचे खाणे नको. यामुळे गर्दीत जाणेही टळेल, तसेच खाण्यातून कुठलेही संसर्ग व्हायची शक्यता अल्प राहील. खायची वेळ आलीच, तर पूर्ण शिजवलेले उकळलेले पदार्थ असतील, असे बघा. कच्चे पदार्थ असलेले कुठलेही पदार्थ टाळा. जसे सँडविच, अर्धकच्चा कोबी असलेले नूडल्स, सलाड (कोशिंबीर) इत्यादी. यातून थेट संसर्ग होत नसला, तरी बनवणारा किंवा आणणारा आजारी असेल किंवा स्वच्छता पाळणारा नसेल, तर त्यातून अप्रत्यक्षपणेही हा संपर्क टाळलेला बरा.
६. शरिरात विदाह वाढेल, असे सोया, चायनीज, मिरची, हलापिनो, मेयो हे पदार्थ आवर्जून टाळा. नियमित व्यायाम, आहार आणि झोप ही नेहमीची पथ्ये आहेतच.
७. संसर्गाला आलेली शरिराची प्रतिक्रिया अशा स्वरूपाचे व्याधी रूप असल्याने प्रतिकारशक्ती वाढवणारी काही रसायन स्वरूपी औषधे वैद्यांच्या सल्ल्याने चालू करता येतील.
प्राथमिक उपचार म्हणून आयुर्वेदालाच प्राधान्य देण्याचा विचार करा !
कुठलेही लक्षण आले असता प्राथमिक उपचार म्हणून आयुर्वेदालाच प्राधान्य, हा विचार प्रत्येकाने करावा. तुम्ही शरिराला हानी न करता बरे करणार्या औषधांवर जितका भर द्याल, तितके तुमच्या शरिराच्या आतील वातावरणही चांगले राहील. इतके वर्ष ‘जी.बी. सिंड्रोम’ची कारणे अस्तित्वात असूनही आताच तो बळावण्यामागे आपल्या शरिरातील पालटलेले वातावरण हे महत्त्वाचे कारण आहे. (भले ते उठसूट घेतलेल्या ‘सिंथेटिक’ (कृत्रिम) औषधांनी असेल किंवा पोटात जाणार्या ‘ऑर्डर’ (मागणी) केलेल्या डब्यांच्या प्लास्टिकमधून किंवा सतत फवारणी केलेल्या पिकांमधून असेल.)
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (३०.१.२०२५)