प्रयागराज – मौनी अमावस्येच्या अमृतस्नान पर्वाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी या दिवशी हिंदु-राष्ट्र जागृती फेरी काढून कुंभमेळ्यामध्ये हिंदु राष्ट्राचा जयघोष केला. सेक्टर १९ मध्ये मोरी मार्गावरील गंगा नदीच्या तटावरून मोरी-मुक्ती चौकापर्यंत ही फेरी काढण्यात आली. ‘भारत हिंदु राष्ट्र बनेगा, जय श्रीराम, जय श्रीराम’, ‘हम भारत भव्य बनायेंगे, हम हिंदु राष्ट्र बनायेंगे’ अशा घोषणा देण्यात आल्या. या फेरीत सनातन संस्थेचे साधक आणि कुंभमेळ्यासाठी आलेले विविध संघटनांचे धर्माभिमानी हिंदूही सहभागी झाले होते. फेरीत घोषणा दिल्या जात असतांना आजूबाजूच्या भाविकांनीही हिंदु राष्ट्राचा जयघोष केला.
या वेळी ‘लाना होगा, लाना होगा, हिंदु राष्ट्र लाना होगा’, ‘सभी संतोंकी यही पुकार, हिंदु राष्ट्र हो साकार’ या घोषणाही देण्यात आल्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी गंगामातेचे पावित्र्य कसे जपावे, गंगास्नानाचा आध्यात्मिक लाभ कसा प्राप्त करावा ? याविषयीची माहिती दिली. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी या वेळी जनजागृती फेरी काढण्यामागचा हेतू स्पष्ट केला.