शिवसृष्टीच्या पुढील टप्प्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुणे – ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा या त्रिसूत्रीवर आधारित आंबेगाव येथील शिवसृष्टी येथे मांडण्यात आलेले दालन अत्यंत प्रेरणादायी असून महाराष्ट्रातील अन् देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावी’, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टीच्या दुसर्या टप्प्याच्या लोकार्पण प्रसंगी केले. त्यांनी शिवसृष्टीच्या पुढील टप्प्यासाठी राज्यशासनाकडून आणखी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणाही केली. या प्रसंगी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता आशिष शेलार, खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी, शिवसृष्टीचे जगदीश कदम, विनय सहस्रबुद्धे, अमृत पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी शिवसृष्टी येथील दालन, गंगासागर आणि भवानीमातेच्या मंदिराला मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन पहाणी केली. या वेळी रायगडावरून आणलेले जल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गंगासागरमध्ये अर्पण करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, शिवरायांचे विविध पैलू शिवसृष्टीच्या माध्यमातून जनतेपुढे यावेत. त्यांच्या आज्ञावलीतील माहिती शिवसृष्टीच्या माध्यमातून सर्वांना मिळावी. शिवसृष्टी उभारणे हे एक राष्ट्रकार्य आहे. या कार्यामध्ये शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.