Melbourne Shri Krishna Janmabhoomi Mukti Andolan : श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी आंतरराष्ट्रीय चळवळ मेलबर्नपासून चालू होणार !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह

प्रयागराज – त्रिवेणीच्या काठावरून चालू झालेल्या श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीच्या चळवळीचा प्रतिध्वनी आता साता समुद्रापलीकडे पोचला आहे. विदेशात श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती चळवळीचा शंखनाद होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे श्रीकृष्ण जन्मभूमीविषयी महासंवाद आयोजित करण्यात आला असून त्याची रूपरेषा सिद्ध करण्यात आली आहे. या चळवळीचा प्रारंभ स्वाक्षरी मोहिमेने झाला आहे. जगभरातील अनिवासी भारतियांना या चळवळीशी जोडण्याची सिद्धता चालू झाली आहे.

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह

१. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह म्हणाले की, श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीसाठी २८ ते ३० मार्च या कालावधीत मेलबर्नमध्ये एक भव्य परिसंवाद आयोजित केला जाईल. महासंवादात बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाईल. जगभरातील सनातनी हिंदू आणि अनिवासी भारतीय यांना महासंवादाच्या माध्यमातून जागरूक केले जाईल.

२. १४ मार्चनंतर श्रीरामलल्लाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येपासून हे आंदोलन चालू  होईल. यानंतर भगवान श्रीकृष्णाचे भक्त जागतिक स्तरावर एकत्र येतील. मेलबर्ननंतर दक्षिण आफ्रिका, केनिया, मॉरिशस, मलेशिया आणि अमेरिका येथे स्वाक्षरी मोहिमा आणि जागरूकता मोहिमा आयोजित केल्या जातील.

३. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीसाठी स्वाक्षरी मोहिमेत आतापर्यंत साडेतीन कोटींहून अधिक हिंदूंनी भाग घेतला आहे.