Attack On Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खान यांच्यावरील आक्रमण चोरीच्या उद्देशाने ! – मुंबई पोलीस  

अभिनेता सैफ अली खान

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सैफ अली खान यांच्यावर १५ जानेवारीच्या रात्री प्राणघातक आक्रमण झाल्याची घटना घडली. त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आला. यात चाकू त्यांच्या पाठीच्या मणक्यामध्ये अडकला. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रकर्म करण्यात आले. ही घटना चोरीच्या उद्देशातून घडली असून चोराचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी आता राजकारण चालू झाले आहे.

चोराला लवकर पकडले जाईल, यात टोळीचा समावेश नाही ! – गृहराज्यमंत्री

गृहराज्यमंत्री योगेश कदम

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, चोर घराच्या मागच्या भिंतीवरून चढला होता. तेथील एका सी.सी.टी.व्ही.मध्ये चोराचा चेहरा चित्रीत झाला आहे. त्याला लवकरच पकडले जाईल. यात कुठल्याही टोळीचा समावेश नाही. हे प्रकरण केवळ चोरीचे आहे.

गृहमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे ! – शरद पवार

शरद पवार

कायदा-सुव्यवस्था किती ढासळत आहे, हे लक्षात येते. याच भागात एकाची हत्या झाली होती, हा हत्येचा दुसरा प्रयत्न आहे. या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहे. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी जे गृहमंत्री आहेत, त्यांनी याकडे गांभीर्याने द्यावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

आधुनिक वैद्यांकडून सैफ अली खान यांच्या प्रकृतीविषयी स्पष्टता

सैफ अली खान यांच्यावर उपचार करणार्‍या लीलावती रुग्णालयाच्या आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘सैफ यांच्यावर न्युरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी झाली आहे. त्यांना अतीदक्षता विभागात हालवले आहे. ते आता स्थिर आहेत. अडीच इंचाचे चाकूचे टोक त्यांच्या मणक्यातून काढण्यात आले आहे.’’

  • (म्हणे) ‘सैफ अली खान यांच्यावर धार्मिक कट्टरतावाद्यांकडून आक्रमण करण्यात आले !’

  • जितेंद्र आव्हाड यांचे धर्मद्वेषी विधान !

जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले की, सैफ अली खान यांच्यावर झालेले आक्रमण पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. त्यांच्या मुलाचे नाव ‘तैमुर’ ठेवल्यावरून अनेकदा त्यांना लक्ष्य करण्यात येत होते. ते पहाता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हे आक्रमण करण्यात आलेला आहे कि कसे ? या दिशेने अन्वेषण होणे आवश्यक आहे.’’

संपादकीय भूमिका

दिवसाढवळ्या हिंदूंवर होणारी वाढती आक्रमणे पहाता त्याविषयी जितेंद्र आव्हाड चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

आव्हाड यांची अपरिपक्वता लक्षात येते ! – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे प्रत्युत्तर

जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देतांना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटले की, या घटनेला सामाजिक किंवा राजकीय रंग देणे म्हणजे आव्हाड यांची राजकीय परिपक्वता किती आहे, हे लक्षात येते.