दोडामार्ग – तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याच्या भोमवाडी, कुडासे येथील पुलाला संरक्षक कठडा नसल्याने काही दिवसांपूर्वी या कालव्यात एक चारचाकी पडून एका महिलेचा मृत्यू आणि एक जण घायाळ झाला होता. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी या पुलावर संरक्षक कठडा बांधण्यात यावा, यासाठी या भागातील महिला, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी यांनी भोमवाडी येथे १५ जानेवारीला उपोषण करण्यास प्रारंभ केला होता. माजी
ग्रामपंचायत सदस्य जेनिफर लोबो यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण चालू होते. अखेर जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी ‘संरक्षक कठडा बांधण्यासाठी जलसंपदा विभागाची मान्यता घेऊन मार्च २०२५ पूर्वी निविदा काढण्यात येईल आणि काम चालू करण्यात येईल, तसेच कालव्याच्या रस्त्याचे खडीकरण केले जाईल’, असे पत्र उपोषणकर्त्यांना दिले. त्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले.
संपादकीय भूमिकायावरून प्रशासनाला उपोषणाचीच भाषा समजते, असे समजायचे का ? असे प्रशासन जनहितकारी कारभार काय करणार ? |