|
प्रयागराज – सनातन धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचा वैज्ञानिक अन् आध्यात्मिक आधार समजावून देणारे ‘सनातन संस्कृती प्रदर्शन’ प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात आयोजित करण्यात आले आहे. ‘भारत अध्यात्मशास्त्राच्या आधारे हिंदु राष्ट्र कसे बनू शकतो ?’, याचे उत्तर या प्रदर्शनातून मिळेल. हे प्रदर्शन १२ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सनातन संस्था शिबीर, सेक्टर ९, गंगेश्वर महादेव मार्ग, प्रयागराज येथे सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत चालू राहील. सनातन धर्मविषयी सोप्या भाषेत माहिती देणार्या या प्रदर्शनाला कुंभमेळ्यातील भाविकांनी भेट द्यावी, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी १५ जानेवारी या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
श्री. राजहंस पुढे म्हणाले, ‘‘कुंभमेळा हा कोट्यवधी भाविकांच्या भक्तीचा महामेळा आहे; मात्र अनेकांना सनातन धर्म, संस्कृती आणि परंपरा यांमागील शास्त्राची माहिती नसल्यामुळे कुंभमेळ्याचा अपेक्षित आध्यात्मिक लाभ होत नाही. सध्या कॉन्व्हेंट शाळेत बायबल आणि मदरशांमध्ये कुराण शिकवले जाते; परंतु सामान्य हिंदूंना त्यांच्या धर्मासंबंधी ज्ञान देणारी कोणतीही व्यवस्था नाही. यामुळे ‘सनातन धर्म म्हणजे काय ?’, ‘धर्माचरण कसे करावे ?’, हे हिंदूंना ठाऊक नाही. धार्मिक कृती श्रद्धेने आणि योग्य प्रकारे केली गेली, तर त्याचा अधिक अध्यात्मिक लाभ होतो, तसेच भारत स्वाभाविक हिंदु राष्ट्र आहे. सनातन धर्मियांची हिंदु राष्ट्राची कल्पना विश्व कल्याणासाठी आहे. हिंदु राष्ट्राचे मूळ लक्ष्यच विश्वशांती आहे, या उद्देशाने ‘सनातन संस्कृति प्रदर्शना’चे आयोजन केले आहे.’’
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये : ‘तीर्थमहिमा कक्ष’ अन् ‘हिंदु राष्ट्र बोध कक्ष’ !
सनातनचे साधक श्री. संजय सिंह यांनी प्रदर्शनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करतांना सांगितले की, सनातन संस्था वर्ष २००१ च्या कुंभमेळ्यापासून सातत्याने अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून जागृती करत आहे. ‘तीर्थमहिमा’ आणि ‘हिंदु राष्ट्र बोध’ या दोन स्वतंत्र कक्षांद्वारे भाविकांना मार्गदर्शन केले जाईल. ‘तीर्थमहिमा कक्ष’: येथे २ श्राद्धक्षेत्रे, ३ त्रिस्थळी यात्रेची स्थाने, ४ कुंभक्षेत्रे आणि ७ मोक्षपुरी यांची महत्त्वपूर्ण माहिती दिली जाईल. ‘हिंदु राष्ट्र बोध कक्षा’त हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेविषयी निर्माण होणारे आक्षेप आणि त्यांची शास्त्रशुद्ध उत्तरे दिली जातील.
ग्रंथ प्रदर्शन आणि माहिती पुस्तिकांचा समावेश !
सनातन धर्म, अध्यात्म, साधना आणि राष्ट्रहित यांवर आधारित सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन येथे असेल. भाविकांना धर्मशास्त्र समजावून सांगण्यासाठी विशेष ग्रंथ, फलक आणि व्हिडिओ यांच्या माध्यमांतून माहिती दिली जाईल. सनातनच्या साधिका सौ. धनश्री केळशीकर यांनी सांगितले की, भाविकांना सनातन धर्माचे महत्त्व, त्याचा आध्यात्मिक लाभ आणि परंपरांचा वैज्ञानिक आधार समजावून घेण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल. भाविकांनी प्रदर्शनाला भेट देऊन याचा लाभ घ्यावा.
प्रयागराज येथे मार्चपासून सनातनचे धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यात येणार !
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना श्री. राजहंस म्हणाले की, प्रयागराज येथे सनातनचे केंद्र असायला हवे, अशी अनेकांची मागणी असून त्या दृष्टीने प्रयागराज येथे मार्चपासून सनातनचे धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यात येणार आहेत. यातून अधिवक्ता आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे संघटन केले जाईल. गेल्या ७५ वर्षांत सनातन धर्माची अपकीर्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सनातन म्हणजे जुने पुराणे आहे, असे कथानक (नॅरेटिव्ह) समाजात निर्माण करण्यात आले. प्रत्यक्षात सनातन शाश्वत आणि नित्यनूतन आहे.