प्रत्येक कृती सात्त्विक करायला शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

१. केसांचा भांग मधोमध आणि शेवटपर्यंत पाडल्यावर चांगली स्पंदने येत असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रयोगातून शिकवणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एकदा मी आणि एक साधिका परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाला गेलो होतो. आमचे बोलणे झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे लक्ष आमच्या केसांतील भांगाकडे गेले. आम्ही दोघींनीही केसांचा भांग मध्यभागी पाडला होता. त्या साधिकेने सरळ रेषेत शेवटपर्यंत भांग पाडला होता आणि मी तो अर्ध्यापर्यंतच पाडला होता. तेव्हा ‘केसांचा मध्यभागी पाडलेला भांग अर्ध्यापर्यंत कि शेवटपर्यंत पाडलेला चांगला वाटतो ?’, याचा प्रयोग परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हा दोघींना करण्यास सांगितले. त्या वेळी आम्हा दोघींनाही ‘केसांचा भांग मध्यभागी आणि सरळ रेषेत पूर्ण पाडल्यावर अधिक चांगली स्पंदने येत आहेत’, असे जाणवले. त्या प्रयोगानंतर मी केसांचा भांग मध्यभागी आणि सरळ रेषेत शेवटपर्यंत पाडण्यास आरंभ केला.

२. गडद काळपट रंगाचे कपडे सात्त्विक नसल्याचे सहज बोलण्यातून लक्षात आणून देणे

एकदा मी गडद काळपट चॉकलेटी रंगाचा पंजाबी पोशाख घातला होता. तो रंग पाहून परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘या रंगाचा पोशाख का घातलास ?’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘तो काळपट रंगाचा असल्याने प्रवासात सोयीचा होतो.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मग तो प्रवासातच वापरायचा ना ! आश्रमात कशाला वापरायचा ?’’ तेव्हा मला माझी चूक लक्षात आली. त्यानंतर मी पोशाखासाठी तशा रंगाचे कापड पुन्हा कधी घेतले नाही.

३. कपड्याचा रंग सात्त्विक असला, तरी त्यावरील नक्षीमुळे तो असात्त्विक असल्याचे लक्षात आणून देणे

मी एकदा नवीन पंजाबी पोशाख घातला होता. त्याचा रंग गुलाबी (सात्त्विक) असल्याने ‘तो परात्पर गुरु डॉक्टरांना आवडेल’, असे मला वाटले. प्रत्यक्षात मात्र तो पोशाख पाहिल्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘असा पोशाख का घातलास ?’’ तेव्हा ‘त्यावर मोठ्या आकाराची असात्त्विक नक्षी असल्याने तो चांगला वाटत नाही’, हे माझ्या नंतर लक्षात आले. तोपर्यंत मला त्या पोशाखाचा रंग सात्त्विक असल्याने ‘तो सात्त्विकच आहे’, असे वाटत होते. ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक वेळी आपल्या जे लक्षात येते, त्याच्या पुढचे शिकवत आहेत’, याची मला जाणीव झाली.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे प्रत्येक गोष्टीतील सात्त्विकता ओळखून कृती करण्यास शिकवणारे पृथ्वीवरील एकमेव गुरु आहेत’, असे वाटून मला त्यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.