रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सुश्री (कु.) मेघा चव्हाण यांचा पौष कृष्ण द्वितीया (१५.१.२०२५) या दिवशी ४२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सुश्री (कु.) मेघा चव्हाण यांना ४२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. सौ. कीर्ती प्रतीक जाधव, पाटणतळी, फोंडा, गोवा.
१ अ. इतरांना समजून घेणे : ‘मेघाताई साधकाची क्षमता लक्षात घेऊन संबंधित साधकाला सेवा शिकवते.
१ आ. तत्त्वनिष्ठता : सेवा करतांना कोणाकडून काही चुका झाल्यास मेघाताई तत्त्वनिष्ठपणे चुका सांगते.
१ इ. सतर्कता : ताई स्वतःची सेवा परिपूर्ण आणि वेळेत होण्यासाठी नेहमी सतर्क असते.
१ ई. विविध शारीरिक त्रास होत असतांनाही आनंदी असणे : काही कालावधीपूर्वी मेघाताईच्या चेहर्यावर काळसर डाग येऊन चेहर्यावरील काळपटपणा वाढला होता. त्यावर वैद्यकीय उपचारांच्या समवेत नामजपादी उपायही चालू होते. या संदर्भात मी तिला विचारल्यावर ती सहजतेने मला म्हणाली, ‘‘त्यावर उपचार चालू आहेत. ते हळूहळू जातील.’’ त्याविषयी तिच्या मनात काळजीचे किंवा प्रतिमेचे विचार नव्हते. ताईला सर्दीचा आणि मणक्याचाही त्रास आहे. अनेक शारीरिक त्रास असतांनाही ताई नेहमी आनंदी असते.
भगवंताने मेघाताईमध्ये ‘स्वयंशिस्त आणि नियोजनबद्धता’ हे गुण दिले आहेत. ‘ताईच्या माध्यमातून भगवंत मला जे शिकवत आहे, ते मला मनापासून कृतीत आणता येऊ दे’, अशी परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना करते.’
२. सौ. तन्वी सरमळकर, फोंडा, गोवा.
२ अ. नीटनेटकेपणा : ‘मेघाताईची प्रत्येक वस्तू, तिचे कपडे अतिशय व्यवस्थित आणि नीटनेटके असतात.
२ आ. सेवेची तळमळ : मेघाताई शारीरिक त्रासांवर मात करून तळमळीने सेवा करते.’
३. सौ. प्रियांका वाडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. मनातील भीती दूर करून शिकण्याच्या स्थितीत रहाण्याचे महत्त्व कृतीतून शिकवणारी मेघाताई !
‘एका सेवेच्या संदर्भात शंका विचारण्यासाठी मला एका संतांकडे जायचे होते. मी यापूर्वीही संतांना ती शंका विचारली होती; पण त्यांनी सांगितलेले मला आकलन होत नव्हते. मी मेघाताईला त्याविषयी सांगितले आणि तिला म्हणाले, ‘‘मला पुन्हा शंका विचारण्याची भीती वाटते; म्हणून तूच संतांना विचारशील का ?’’ त्या वेळी ताई मला म्हणाली, ‘‘माझ्या समवेत चल आणि तूच शंका विचार; कारण देवाला तुला शिकवायचे आहे.’’ ताई माझ्या समवेत संतांकडे आली. त्यामुळे मला संतांना माझी शंका पुन्हा विचारता आली आणि संतांनीही मला पुन्हा प्रेमाने सर्व विश्लेषण करून सांगितले.
३ आ. संतांनी सांगिलेल्या प्रयत्नांविषयी पाठपुरावा घेणे : एका संतांच्या सत्संगाच्या वेळी मेघाताई तिथे उपस्थित रहात असे. त्यातील एका सत्संगासाठी मीही उपस्थित होते. त्या सत्संगात संतांनी मला एक प्रयत्न करायला सांगितला होता. त्यानंतर २ – ३ दिवसांनी माझी आणि मेघाताईची आश्रमातील मार्गिकेत भेट झाली. तेव्हा ताईने मला विचारले, ‘‘संतांनी सांगितल्याप्रमाणे तू प्रयत्न चालू केले आहेस ना ?’’
४. कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय १३ वर्षे), फोंडा, गोवा.
४ अ. नियोजनकौशल्य : कु. मेघा मावशीकडे आश्रमात येणार्या पाहुण्यांचे नियोजन करण्याची सेवा असते. मावशी हे नियोजन परिपूर्ण करते.
४ आ. सतत आनंदी रहाणे : मेघामावशी नेहमी आनंदी असते. ती एकदा रुग्णाईत होती. तेव्हा तिच्या चेहर्याकडे पाहून ‘ती रुग्णाईत आहे’, असे मला वाटले नाही.
४ इ. प्रेमभाव : मेघामावशी प्रत्येकाशी प्रेमाने, नम्रतेने आणि आपुलकीने बोलते.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला मेघामावशीकडून तिच्यातील हे गुण शिकण्याची संधी दिली. त्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘मला असेच शिकण्याच्या स्थितीत राहून अधिकाधिक शिकता येऊ दे’, अशी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १३.४.२०२४)