रवींद्रनाथ टागोर यांनी जॉर्ज पंचमसाठी लिहिलेले ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत नाहीच !
छत्रपती संभाजीनगर : आपण चित्रपटाच्या आधी राष्ट्रगीतासाठी उभे रहातो; परंतु हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी जॉर्ज पंचम यांच्या स्वागतासाठी वर्ष १९११ मध्ये लिहिले होते. अशा गीताला आपले राष्ट्रगीत मानणे योग्य नाही. यात पालट व्हायला हवा. ‘वन्दे मातरम्’ हेच आपले राष्ट्रगीत व्हावे,’ अशी मागणी नगर येथील सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थानाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केली आहे. ते एका चित्रपटाच्या ‘ट्रेलर’च्या (चित्रपटाचे छोटे विज्ञापन) शुभारंभप्रसंगी बोलत होते.
पू. रामगिरी महाराज म्हणाले,
‘‘जॉर्ज पंचम हा ब्रिटीश राजा होता. तो भारतियांवर अन्याय करत होता. त्याच्या समर्थनार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गायले होते. ‘जन-गण-मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता’ अर्थात भारतियांचे तुम्ही भाग्यविधाता आहात’, असे त्यांनी म्हटले आहे. रवींद्रनाथांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य मोठे आहे; पण तत्कालीन व्यवस्थेत काम करतांना ब्रिटिशांचे गुणगान गाण्याविना पर्याय नव्हता.’’
माझे वक्तव्य राष्ट्रगीताचा अवमान नसून ते विश्लेषण आहे !
पू. रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, राष्ट्रगीताच्या संदर्भात मी जे बोललो आहे, तो राष्ट्रगीताचा अवमान नसून ते विश्लेषण आहे. इतिहासाचे संशोधन व्हायला हवे. राष्ट्रगीतातून देशाची स्तुती व्हावी, ही माझी मागणी आहे.
सध्याच्या चित्रपटांतून साधूसंतांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न !
सध्या चित्रपटांतून साधूसंतांची प्रतिमा मलीन करण्यात आली आहे. याउलट कधीही एखाद्या मौलानाची प्रतिमा मलीन करण्याचे त्यांचे धाडस झाले नाही. हिंदु धर्म सहिष्णु आहे, याचा अपलाभ घेण्यात आला. आजवर चित्रपटांनी सनातन धर्माला अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडील काळात समाजात जागृती झाली आहे. आता योग्य स्थिती सांगणारे चित्रपट येत आहेत. त्यामुळे समाजाला याचा लाभ होईल, असे पू. रामगिरी महाराज या प्रसंगी म्हणाले.