नौदलात एकाच दिवशी सामील होणार ३ युद्धनौका !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – नौदलाच्‍या पश्‍चिम विभागाकडून एकाच दिवशी ‘निलगिरी’, ‘सुरत’ आणि ‘वागशीर’ या ३ युद्धनौकांचा सहभाग होणार आहे. ‘निलगिरी’ हे ‘प्रोजेक्‍ट १७ ए स्‍टेल्‍थ फ्रिगेट’ अर्थात् विनाशिका श्रेणीतील प्रमुख जहाज, ‘सुरत’ हे ‘प्रोजेक्‍ट १५ बी स्‍टेल्‍थ विनाशिका’ श्रेणीतील चौथे जहाज, तर ‘वाघशीर’ ही ‘स्‍कॉर्पिन-श्रेणी प्रकल्‍पा’ची सहावी आणि अंतिम पाणबुडी नौदलात रुजू करून घेण्‍यात येणार आहे. १५ जानेवारी या दिवशी नेव्‍हल डॉकयार्ड, मुंबई येथे एका कार्यक्रमाद्वारे हे देशार्पण पार पडणार आहे. तीनही युद्धनौकांची बांधणी मुंबईतील ‘माझगाव डॉक शिप बिल्‍डर्स’ या आस्‍थापनात करण्‍यात आली आहे.

आधुनिक सुविधांसह सुसज्‍ज

आधुनिक विमान वाहतूक सुविधांसह सुसज्‍ज निलगिरी आणि सूरतमध्‍ये चेतक, ए.एल्.एच्., सी किंग आणि नव्‍याने समाविष्‍ट करण्‍यात आलेल्‍या MH-60R यांसह अनेक हेलिकॉप्‍टरचा समावेश असून हे हेलिकॉप्‍टर दिवसा आणि रात्री दोन्‍ही वेळा चालणार्‍या मोहिमांमध्‍ये सहभागी होऊ शकते. या जहाजांमध्‍ये महिला अधिकारी आणि महिला खलाशी यांना मोठ्या प्रमाणात संधी देण्‍यासाठी विशिष्‍ट निवासस्‍थानांचाही समावेश केला आहे.