उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. जयती स्वप्नील नाटे ही या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२४ मध्ये कु. जयती स्वप्नील नाटे हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.’ – संकलक)
मार्गशीर्ष शुक्ल पंचमी (६.१२.२०२४) या दिवशी कु. जयती स्वप्नील नाटे हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या वडिलांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. उत्तम स्मरणशक्ती
‘जयतीची बुद्धी तल्लख आहे. तिला सांगितलेल्या बर्याच गोष्टी तिच्या जशाच्या तशा स्मरणात असतात.
२. शिकण्याची वृत्ती
तिला अभ्यास करायला आणि नवीन गोष्टी शिकायला पुष्कळ आवडते.
३. जिज्ञासू
ती ‘शब्दांचा अर्थ, तसेच एखादी कृती कशी करायची ?’, याविषयी स्वतःहून विचारते.
४. नीटनेटकेपणा
तिच्यामध्ये उपजतच नीटनेटकेपणा हा गुण आहे. तिच्या पोशाखावर चुणी पडली असल्यास ती लगेच त्या पोशाखाला इस्त्री करून द्यायला सांगते.
५. शाळेत जाण्याची आवड
ती शाळेत आनंदाने जाते. तिला शाळेत जाण्यासाठी सिद्ध करावे लागत नाही. ती स्वतःहून शाळेत जाण्याची सिद्धता करते.
६. सात्त्विक खाद्यपदार्थ आवडणे
तिला फळे, दूध, लोणी, असे सात्त्विक खाद्यपदार्थ आवडतात. ती बाहेरचे पदार्थ तितकेसे आवडीने खात नाही.
७. जवळीक साधणे
ती खेळतांना सर्व मुलांमध्ये समरस होते. तिला ओळख लागत नाही. ती स्वतःहून नवीन मुलांशी बोलते आणि त्यांच्याशी जवळीक साधते.
८. आश्रमजीवनाची ओढ
ती आश्रमात जाण्यासाठी उत्साही असते. तिला आश्रमात सेवा करायला मिळाल्यावर पुष्कळ आनंद होतो. ती घरी आल्यावर याविषयी आनंदाने सांगते.
९. शिक्षक आणि साधक यांची आवडती
तिचे शाळेतील मुलांशी कधीही भांडण झाले नाही. जयतीचे वर्गशिक्षक तिचे कौतुक करतात. ती शाळेत आणि आश्रमात सर्वांची लाडकी आहे. ती आश्रमात एक दिवस जरी आली नाही, तरी अनेक साधक तिच्याबद्दल विचारतात.
१०. राष्ट्रपुरुषांप्रती प्रेम
आम्ही तिला ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे घर शिवनेरी गडावर आहे’, सांगितले. एकदा आम्ही शिवनेरी गड पहाण्यासाठी गेल्यावर ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे घर पहायला मिळेल’, यासाठी ती संपूर्ण शिवनेरी गड चढली. गड चढतांना तिला उचलून घ्यावे लागले नाही. त्या वेळी तिचे वय ५ वर्षे ५ मास होते.
११. तत्त्वनिष्ठ
ती आम्हाला आमच्या चुका सांगते. तेव्हा तिच्या बोलण्यात एक वेगळाच प्रेमभाव जाणवतो. त्या वेळी तिच्या बोलण्यात अधिकारवाणी किंवा राग जाणवत नाही.
‘गुरुदेवांनी मला ही सूत्रे सुचवली आणि माझ्याकडून लिहून घेतली’, त्याबद्दल मी त्यांच्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– श्री. स्वप्नील नाटे (कु. जयतीचे वडील), फोंडा, गोवा. (१०.११.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.