५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा, गोवा येथील चि. देवांश अनित पिंपळे (वय १ वर्ष)!

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. देवांश अनित पिंपळे हा या पिढीतील एक आहे !

चैत्र कृष्ण दशमी (२३.४.२०२५) या दिवशी चि. देवांश अनित पिंपळे याचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि आजी यांच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. देवांश पिंपळे

 चि. देवांश अनित पिंपळे याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. जन्मापूर्वी 

अ. ‘मला गर्भारपणात देवाच्या कृपेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडून नामजपादी उपाय मिळाले. मी नामजप करत असतांना ‘गर्भातील बाळ नामजप ऐकत आहे’, असे मला जाणवत असे.

आ. एकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला साधनेविषयी मार्गदर्शन केले. तेव्हा ‘गर्भातील बाळ शांतपणे ऐकत आहे. माझा श्वास संथ गतीने चालू आहे’, असे मला जाणवले.

२. जन्म ते ३ मास

अ. देवांशच्या पोटावर जन्मतःच पांढर्‍या रंगाचे कमळाचे चिन्ह आहे. देवांशच्या पोटावरील ते चिन्ह संतांना दाखवल्यावर त्यांनी ‘हे शुभचिन्ह आहे’, असे सांगितले.

आ. देवांश जन्मापासूनच शांत आणि स्थिर आहे.

इ. देवांशचा जन्म झाल्यानंतर २ मासांनी गुरुपौर्णिमा होती. देवांश लहान असल्याने मला गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला जाता आले नाही. मी घरी गुरुपौर्णिमा सोहळ्याचे संगणकीय प्रक्षेपण पहात असतांना देवांश वेगवेगळे आवाज करून प्रतिसाद देत होता. त्या दिवशी सकाळी गुरुपूजनाच्या वेळी मी त्याला मांडीवर घेऊन भावजागृतीचा प्रयोग करत असतांना तो हुंकार देऊन प्रतिसाद देत होता.

ई. तो ३ मासांचा असतांना पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४३ वर्षे) भोर येथे आल्या होत्या. तेव्हा त्यांनी देवांशला घेतल्यावर त्यांची पूर्वीपासूनची ओळख असल्याप्रमाणे देवांश त्यांच्याकडे पाहून हसत होता आणि हुंकार देत होता. पू. ताईंनी ‘ॐ’ चा नामजप केल्यावर त्या दिवसापासून देवांशने ‘ॐ ॐ’ असा नामजप म्हणायला आरंभ केला. तेव्हा ‘पू. मनीषाताईंचा संकल्प कार्यरत झाला’, असे मला वाटले.’

– सौ. सायली पिंपळे (चि. देवांशची आई), फोंडा, गोवा.

शांत आणि आनंदी चि. देवांश अनित पिंपळे !

पू. (सौ.) मनीषा पाठक

अ. ‘चि. देवांशचे डोळे पुष्कळ बोलके आहेत. त्याच्या डोळ्यांमध्ये तेज जाणवते.

आ. तो पुष्कळ शांत, सात्त्विक आणि आनंदी आहे.

इ. मी देवांशच्या आजोबांकडे गेले होते. त्या वेळी देवांश ३ मासांचा होता. तेव्हा मी त्याला मांडीवर घेऊन नामजप करत असतांना तो एकटक पहात होता. मी त्याच्याकडे पाहून ‘ॐ ॐ’ असा नामजप करत असतांना तोही ‘ॐ’ म्हणत होता.

 ई. त्यानंतर काही मासांनी मी त्याला पुन्हा भेटल्यावर तो माझ्या मुलीच्या समवेत (कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १३ वर्षे हिच्या समवेत) पुष्कळ छान खेळत होता. ‘त्या दोघांची अनेक जन्मांपासून ओळख आहे’, असे मला जाणवले.’

–  पू. (सौ.) मनीषा पाठक, पुणे (१६.३.२०२५)

३. वय ४ ते ६ मास

अ. ‘आम्ही भ्रमणभाषवर नामजप, सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे मार्गदर्शन आणि भक्तीसत्संग लावल्यास देवांश शांत राहून ऐकतो. ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी’ हा श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र ऐकतांना तो पुष्कळ शांत होतो. तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरील भाव पालटतात.

आ. त्याला एखादी कृती करायला शिकवली की, तो लगेच त्याप्रमाणे कृती करतो.

 इ. तो नवीन वस्तूंना लगेच हात लावत नाही. तो आधी नीट निरीक्षण करून ‘स्वतःला इजा होणार नाही’, याची पडताळणी करून नंतरच त्या वस्तूला हात लावतो. ’

– सौ. रुक्मिणी जाधव (देवांशची आजी (आईची आई)), भोर, पुणे.

४. वय ६ मास ते १ वर्ष

४ अ. देवांशच्या कानात अन्नपदार्थ ग्रहण करण्याचे महत्त्व सांगितल्यावर त्याने अन्नपदार्थ ग्रहण करणे : ‘देवांश ६ मासांचा झाल्यावर त्याला अन्नपदार्थ देणे चालू केले. तेव्हा आरंभी १५ दिवस तो ते अन्नपदार्थ खात नव्हता. तो झोपल्यावर मी त्याच्या कानात ‘अन्न म्हणजे गुरुदेवांनी माझ्यासाठी पाठवलेला प्रसाद आहे. त्यातून मला चैतन्य मिळणार आहे. माझे छान पोषण होणार आहे, म्हणून मी खाऊ आनंदाने खाईन’ अशी स्वयंसूचना सलग ३ दिवस सांगितली. त्यानंतर देवांशने अन्नग्रहण करायला चालू केले.’ – सौ. सायली पिंपळे

४ आ. देवतांची चित्रे अचूक ओळखणे : आमच्या घरी श्रीकृष्ण, दत्त यांची चित्रे आणि श्री गणपतीची सात्त्विक मूर्ती आहे. देवांशला देवतांची नावे घेऊन विचारले की, तो अचूक त्या त्या देवतेकडे पहातो.

४ इ. देवांश हसतमुख आहे.

४ ई. सच्चिदानंद परब्रह्म  डॉ. आठवले यांच्या प्रती भाव : त्याला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे छायाचित्र दाखवल्यावर पुष्कळ आनंद होतो. तेव्हा तो पुष्कळ हसतो आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याने प्रथम ‘आबा’ हा शब्द उच्चारला. त्याला ‘प.पू. आबा कुठे आहेत ?’, असे विचारल्यास तो सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पहातो.

– श्री. विठ्ठल जाधव (देवांशचे आजोबा, आईचे वडील, वय ६२ वर्षे),  भोर, पुणे.

४ उ. ‘मी देवांशला समवेत घेऊन मोठ्याने नामजप केल्यावर तो मन लावून नामजप ऐकतो आणि ‘ॐ’ असे म्हणतो.’

– चि. कृष्णराज पिंपळे (देवांशचा मोठा भाऊ, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १० वर्षे), फोंडा, गोवा.

‘हे गुरुमाऊली, आपल्या अनंत कृपेमुळे चि. देवांशच्या माध्यमातून आम्हाला शिकता येत आहे. ‘त्याला सांभाळतांना आमची साधना होऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. ‘आपणच ही सूत्रे आमच्याकडून लिहून घेतली’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. सायली पिंपळे, फोंडा, गोवा (१६.३.२०२५)