५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मुंबई येथील कु. कार्तिक विशाल डांग (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. कार्तिक विशाल डांग हा या पिढीतील एक आहे !

मुंबई येथील कु. कार्तिक विशाल डांग याची त्याच्या आईला लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. कार्तिक डांग
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. जन्मापूर्वी

अ. ‘गरोदरपणात माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबवली जात होती. त्यामुळे माझ्या मनातील प्रतिक्रिया न्यून झाल्या.

आ. पाचव्या मासात ‘सोनोग्राफी’मध्ये (विशिष्ट ध्वनीलहरीच्या साहाय्याने पोटातील अवयवांची चित्रे घेण्याच्या चाचणीत) अधिक पाणी आढळून आले. मला मधुमेह झाल्याचे निदान झाले. मी वैद्यकीय उपचारांसमवेत नामजपादी उपाय केले. त्यानंतर पाणी आणि मधुमेह दोन्ही सामान्य झाल्याची अनुभूती आली.

इ. मला नववा मास चालू असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या ‘ऑनलाईन’ प्रसारणासंबंधी सेवा मिळाली. त्या वेळी माझा नामजप अखंड होत होता आणि भावावस्था सतत टिकून होती.

आधुनिक वैद्या (सौ.) जागृती विशाल डांग

२. प्रसूतीच्या वेळी ईश्वराने रक्षण करणे

प्रसूतीच्या वेळी माझे शस्त्रकर्म झाले. त्या वेळी मी ‘माझ्या समवेत भगवंत आणि गुरुदेव आहेत’, असा भाव ठेवला. त्यामुळे मला ताण आला नाही. प्रसूतीच्या वेळी अनेक अडथळे आले; पण ईश्वराने माझे रक्षण केले.

३. जन्म ते ३ मास

अ. चि. कार्तिक जन्मापासूनच पुष्कळ शांत आहे. तो विनाकारण कधी रडायचा नाही आणि त्रासही द्यायचा नाही. त्याला झोपवतांना ॐ हा नामजप केला की तो लगेच झोपायचा.

आ. बाळाच्या कपाळावर (आज्ञाचक्राच्या ठिकाणी) जन्मतः टिळ्याच्या आकाराची एक लालसर खूण होती.

इ. तो ३ मासांचा असतांना एका रात्री पुष्कळ रडत होता. तेव्हा प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन लावल्यावर तो शांत झाला.

४. वय १० ते १२ मास

४ अ. शिकण्याची वृत्ती : कार्तिकला कुठलीही गोष्ट एकदा शिकवली की, ती त्याच्या लक्षात रहाते. त्याला ‘आरती कशी करायची ? उदबत्ती कशी ओवाळायची ? नमस्कार कसा करायचा ?’, हे एकदाच शिकवले होते. तो त्याप्रमाणे कृती करून दाखवतो.

४ आ. आनंददायी सहवास : ‘त्याला त्याच्या वडिलांनी जवळ घेतल्यावर चंदनाचा सुगंध येतो’, असे त्यांना जाणवते. मी चिकित्सालयात नोकरी करते. चिकित्सालयातून घरी आल्यावर मी कार्तिकला नुसते जवळ घेतले, तरी मला आनंद आणि उत्साह जाणवतो.

४ इ. सात्त्विकतेची आवड : त्याला सनातनची सात्त्विक उत्पादने पुष्कळ आवडतात. तो पुष्कळ वेळ दैनिक ‘सनातन प्रभात’कडे बघत असतो. तो रडत असतांना त्याला ‘सनातन प्रभात’चा अंक दिल्यावर तो शांत होतो.

४ ई. देवतांची ओढ

१. कार्तिक ८ मासांचा झाल्यावर माझ्या घराजवळ असलेल्या कृष्णाच्या मंदिरात जाण्यासाठी आतूर असायचा. देवळात दर्शनासाठी गेल्यावर त्याला फार आनंद व्हायचा.

२. तो ११ मासांचा असतांना मी त्याला पेठेत घेऊन गेले असतांना तो पुष्कळ रडत होता. तिथून आम्ही मंदिरात गेल्यावर तो शांत झाला आणि टाळ्या वाजवू लागला. मंदिरातून पुन्हा पेठेत गेल्यावर तो पुन्हा रडू लागला.

४ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेली ओढ : तो दैनिक ‘सनातन प्रभात’मधील प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राला हात लावून नमस्कार करतो.

५. स्वभावदोष : हट्ट करणे.

भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुमाऊली, तुम्ही दिलेल्या बाळकृष्णरूपी बाळाची अनुभवायला मिळलेली भावसुमने तुमच्या चरणी अर्पण करते.’

–  आधुनिक वैद्या (सौ.) जागृती विशाल डांग (आई), सायन, मुंबई. (१८.०६.२०२४)


बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक