वाचनाची आवड, लेखन-संपादन करणार्‍याला आवश्यक अशी वाचनदृष्टी देणारे पुस्तक म्हणजे ‘पुस्तकसंवाद – वाचकाच्या नजरेतून’ !

छोट्या पडद्याशी निगडित विविध तांत्रिक अंगांच्या संबंधाने देश-विदेशात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले श्री. विनायक भालचंद्र देव हे गेली काही वर्षे रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात येऊन त्यांच्या क्षेत्राशी संबंधित साधकांना अनमोल मार्गदर्शन करत आहेत. त्यांना आता आम्ही ‘देवकाका’ असे म्हणतो. अलीकडे त्यांनी ‘पुस्तकसंवाद – वाचकाच्या नजरेतून’ या त्यांच्या लेखसंग्रहाचे पुस्तक पाठवले आणि संदेश दिला ‘वाचून अभिप्राय जरूर कळवा’. हा लेख, म्हणजे त्याचे वाचकोपयोगी रूप आहे. 

मराठी वाचकांना समकालीन निवडक साहित्यकृती ज्ञात करून देणार्‍या त्यांच्या प्रकाशित लेखांचा संग्रह असलेले हे पुस्तक श्री. देवकाकांनी त्यांचे जीवन घडवणार्‍या दोन आज्या, आई, पत्नी, कन्या आणि नात यांना अर्पण केले आहे.

पुस्तकाचे मुखपृष्ठ

१. श्री. देव यांच्या वाचनाच्या आवडीच्या विकासाचा प्रवास

मनोगतातून श्री. देवकाकांना लहानपणापासून मराठी वाचनाची असलेली आवड ही पुढे प्रथम इंग्रजी आणि नंतर हिंदी साहित्याच्या वाचनाकडेही कशी गेली, हे सांगत, नंतर अनुवादकाचे काम करतांना त्यांच्या वाचनाच्या आवडीचा विकास झाला, हे सांगतात. वाचनालयाचे वर्गणीदार असणे, ही सामान्य गोष्ट असल्याचा आणि त्यामुळे करमणूक, तसेच प्रबुद्ध होणे यांसाठी वाचन हेच स्वस्त अन् प्रभावी माध्यम असण्याचा तो काळ होता.

विनिता ऐनापुरे लिखित प्रस्तावनेमध्ये श्री. देवकाकांच्या लेखांना ‘रसग्रहणात्मक लेखन’, असे म्हटले आहे. अर्थात् येथे मी त्यांच्या पुस्तकाचे रसग्रहण वा परीक्षण करत नसून सनातनमधील त्याच्या परिचयाच्या अनेकांना त्यांच्या व्यक्तीमत्वाचा हा पैलू समजावा, यासाठी प्राधान्याने लिहित आहे.

श्री. विनायक देव

२. लेखक, लेखनशैली आणि वाचनशैली यांविषयीचे पुस्तकात असलेले लेख

इंग्रजी भाषेमध्ये पुस्तकांतून मराठीच्या तुलनेत पुष्कळच विविध विषय हाताळले जातात. मराठी वाचकांना या विषयांची ओळख निदान होणे, हा उद्देश श्री. देव यांच्या या लेखांतून सहज साध्य होतो. उदाहरणार्थ खासगी हेलिकॉप्टर सेवा देणार्‍या कॅप्टन गोपीनाथ, ‘बिग बझार’वाले किशोर बियाणी यांच्या यशकथांच्या पुस्तकांसंबंधीचे लेख.

काही लेखांमधून श्री. देवकाकांनी लेखक आणि त्यांचे लेखन यांसंबंधीही माहिती दिली आहे. उदा. लि चाइल्ड, टेरी लेन, आर्थर हॅले, जेफ्री आर्चर, इयान फ्लेमिंग. या लेखांद्वारे त्या लेखकाची वैशिष्ट्ये आपल्याला समजतात.

श्री. चेतन जोशी यांच्या ‘कॉकटेल कार्निव्हल्स’ या कथासंग्रहाविषयी लिहितांना त्या कथा वाचतांना ‘स्वतःची कथा वाचण्याची पद्धत कशी चुकीची होती’, हे श्री. देवकाका प्रांजळपणाने सांगतात.

३. पुस्तकात मांडणी कशी असावी ? याचे दिशानिर्देश

पुस्तकात ‘गाजलेल्या प्रस्तावना’ या श्री. वि.ग. कानिटकर आणि श्री. म.श्री. दीक्षित यांनी परिश्रमपूर्वक संपादन केलेल्या पुस्तकाविषयी लेख आहेत. अशा पुस्तकाची निवड लेखासाठी करणे यांतून रसग्रहण करणार्‍याची दृष्टी समजते. हा लेख वाचतांना मुख्य लेखन नीट समजण्यासाठी ‘प्रस्तावना तितक्याच गंभीरपणे पहाण्याची गोष्ट आहे’, हे लक्षात येते. सोबत प्रस्तावना ही सकृतदर्शनी परावलंबी साहित्यकृती असली, तरी तिचे स्वत:चे वेगळेपण कसे असते, हेही आपल्याला समजते. सोबत त्यांनी पुस्तकांमध्ये येणारे मनोगत, प्रस्तावना, अर्पण, पुस्तकाचे हक्क यांसारख्या गोष्टी कोणत्या क्रमाने याव्यात, याविषयी निर्देशित केले आहे.

डॉ. दुर्गेश सामंत

४. काल्पनिक व्यक्तीरेखांसंबंधी केलेले विश्लेषण

‘लेखकाचा लेखक’ यामध्ये लेखकांनी निर्मिलेल्या आणि त्यांच्या भोवती गुंफण्यात आलेल्या अनेक कथानकांमधून वाचकाच्या मनात स्वत:चे स्थान निर्माण करणार्‍या काल्पनिक व्यक्तीरेखांसंबंधी ते लिहितात. उदाहरणार्थ जेम्स बाँड, हॅरी पॉटर.  इंग्रजी लेखकांच्या अशा मानस अपत्यांनी जनमानसावर किती पगडा घातला, हे त्यांनी उदाहरणांसहित दाखवले आहे. लेखक आपल्या मानस अपत्यांचे जितके अधिक तपशील आणि बारकावे देईल तेवढे ते अधिक जिवंत बनते, असे सांगतांना ‘मराठी लेखकांची अशी मानस अपत्ये तितकी परिपूर्ण रितीने वर्णिलेली नसतात’, हेही ते उदाहरणांसहित दाखवून देतात.

५. कथाविष्कार आणि कथा किंवा कादंबरी यांचे चित्रपटातील रूपांतराविषयी केलेले लिखाण

‘सिक्वेल आणि बरंच काही’, हा लेख १६ पानी आहे. आपल्याला विविध साहित्यकृती, चित्रपट यांचे ‘सिक्वेल’, म्हणजे आधीच्या प्रकाशित कथाविष्काराच्या अंतानंतर पुढे काय घडले, हे सांगणारा कथाविष्कार यांविषयी ते सांगतात. हा आविष्कार, म्हणजे कादंबरी, चित्रपट असा काही असू शकतो. सोबत ते ‘प्रिक्वेल’, ‘इंटरक्वेल’ यांविषयी सांगतात. मग मराठीतील नवीन लेखकांनी या पद्धतीचा उपयोग करून साहित्यकृती निर्माण कराव्यात, हे श्री. देवकाका सुचवतात.

‘माध्यमांतर’ हा ११ पानांचा लेख कथा किंवा कादंबरी, तिचेच नाटकातील, मालिकेतील किंवा चित्रपटातील रूपांतर याविषयी आहे. यात श्री. देवकाकांनी प्रत्येक माध्यमाची वैशिष्ट्ये, मर्यादा सांगितल्या आहेत.

६. ‘पुस्तकांचे रसग्रहण’ हा पुस्तकातील लेखांचा गाभा

ज्या विषयावरील पुस्तकाचे रसग्रहण असेल, त्या विषयाशी आपला परिचय तर होतोच; परंतु अन्य काही उपयुक्त सूत्रे समजू शकतात. उदाहरणार्थ बांधकाम व्यावसायिक सुहास मंत्री यांच्या पुस्तकातील ‘व्यावसायिकाने दिवसातील आपल्या वेळेचे विभाजन कसे करावे’, हे श्री. देवकाकांनी संबंधित लेखात नोंद केले आहे. या पुस्तकातील शेवटचा लेख आहे ‘साहित्य आणि चित्रपट’. त्याविषयी विवरण करून सर्वांत शेवटी गाजलेल्या मराठी आणि इंग्रजी अशा साहित्यकृती अन् त्यावर आधारित चित्रपट यांची सूची दिलेली आहे.

एकूण पुस्तक वाचनाची आवड आणि आवश्यकता असणार्‍याला, तसेच काही उर्मीने लेखन-संपादन करणार्‍याला आवश्यक असणारी एक वाचनदृष्टी श्री. देवकाकांच्या या पुस्तकाच्या वाचनातून मिळू शकते.

दोन अवतरण चिन्हांच्या मध्ये पुस्तकाचे नाव, असे या पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे. एका अवतरण चिन्हामध्ये कपाटातील पुस्तके ठळक दिसतात आणि संपलेल्या अवतरण चिन्हामध्ये तीच अस्पष्ट दिसून त्यावर काही अक्षरे दिसतात. पुस्तकांचे रसग्रहण हा या लेखांचा गाभा आपल्याला त्यातून स्पष्ट होतो. (९.११.२०२४)

।। श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।।

– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

पुस्तकाचे प्रकाशक : हेडविग मिडिया हाऊस

१२८, ३ रा मजला, पारेख महल, सखाराम कीर मार्ग, शिवाजी पार्कजवळ, माहीम, मुंबई ४०००१६

संपर्क क्र. : ८१०८९ १४५०७, ७६६६२ १९८३८