हिंदूंच्या संस्कृतीवर घाला घालणार्या फुटीरतावादी शक्तींना वेळीच रोखा !
यवतमाळ – देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवावी लागेल. आगामी काळात सावध रहात हिंदु संस्कृतीवर घाला घालणार्या फुटीरतावादी आणि संस्कृतीविरोधी शक्ती यांना थारा देऊ नका. हिंदूंनी सनातन धर्म असणारा आणि संस्कृतीचे रक्षण करणारा शासक निवडून द्यावा. धर्मरक्षणासाठी १०० टक्के मतदान करा, असे आवाहन अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी केले.
येथील स्थानिक उत्सव मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या ‘शिवचैतन्य जागरण’ कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शंखनाद आणि मातृशक्तीने औक्षण करून महाराजांचे स्वागत करण्यात आले. गीत राहुल एकबोटे यांनी, तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर रुईकर यांनी केले. या वेळी साधू-संतांसमवेत विविध मठ-मंदिरांचे प्रतिनिधी यांच्यासह शेकडो सनातनी बंधू-भगिनी उपस्थित होते.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि म्हणाले की,
१. मठ, मंदिरे आणि आश्रम ही हिंदु समाजाची ऊर्जास्थाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत. हिंदवी स्वराज्यात शास्त्र, साधू, संत, तीर्थस्थाने, तीर्थयात्रा या सर्वांच्या माध्यमातून संस्कृती संवर्धनाचे कार्य झाले आहे.
२. आज राज्यघटनेच्या रक्षणासाठी संस्कृतीचे संवर्धन होणे आवश्यक आहे. हिंदू टिकला, तर राज्यघटना टिकेल. त्यामुळे राज्यघटना आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आपण १०० टक्के मतदान करायलाच हवे.
३. १०० टक्के मतदान आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणातून आपला देश जगात सर्वश्रेष्ठ बनवूया. त्यासाठी सनातन धर्म आणि संस्कृती यांची मूल्ये जपणारा शासक आपण निवडला पाहिजे.
४. आज बांगलादेशात जे घडत आहे, ते आपल्या घरापर्यंत येण्यास विलंब लागणार नाही. त्यामुळे हिंदु समाजाने सजग रहाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हिंदुहिताचा विचार करणार्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे रहाण्याची आवश्यकता आहे
संपादकीय भूमिकाहिंदु टिकला, तर राज्यघटना टिकेल आणि राज्यघटनेच्या रक्षणासाठी संस्कृती संवर्धन होणे आवश्यक आहे ! |