वारसा म्हणजे नक्की काय ?

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या गड-दुर्गांची ‘जागतिक वारसास्थळ’ म्हणून पहाणी करण्यात येणार आहे. हा वारसा म्हणजे नक्की काय असतो ? एखादी वास्तू म्हणजेच वारसा असते का ? आणि आपल्याकडे असलेला हा वारसा जपायचा कशासाठी ? असे विविध प्रश्न या निमित्ताने उभे राहिले असतील. त्याचीच ही उत्तरे !

वारसा म्हणजे पूर्वसुरींकडून मिळालेल्या गोष्टी ! मग त्या वास्तू, वस्तू किंवा अन्य स्थावर स्वरूपातील मूर्त गोष्टी असतील किंवा एखादी कला, संस्कार यांसारख्या अमूर्त असतील. हा मिळालेला वारसा जपावा, त्यात आपल्या परीने भर घालावी आणि तो पुढच्या पिढीच्या हाती सोपवावा, ही झाली रीत ! ही रीत का आहे ? याचे उत्तर वरकरणी सोपे आणि तरीही गुंतागुंतीचे आहे. आपण, आपले गाव, आपला जिल्हा, आपले राज्य, आपला देश हे सारेच या वारशाच्या परीघात येतात. आपला म्हणून जो काही स्वभाव आहे, तो या वारशाचाच भाग आहे.

वारसा काय असतो ?

एखादी वास्तू वारसा म्हणून सांगतांना त्या वास्तूमुळे त्या भौगोलिक भागावर पडलेला प्रभाव, त्या वास्तूचे राजकीय किंवा सामाजिक स्थान या गोष्टींचा विचार केला जातो. महाराष्ट्रातील अजिंठा-वेरूळ हा जागतिक वारसा आहे. ही स्थळे शिल्प आणि चित्रसमृद्ध आहेतच. त्यासह ती त्या काळातील विचारशैलीचे, धार्मिक, सामाजिक अभिसरणाचे, समृद्धीचे, विचार प्रवाह यांचे प्रतिनिधित्व करतात. वेरूळमधील आधी कळस मग पाया अशा पद्धतीने डोंगरातून खोदले गेलेले कैलास मंदिर हा शिल्पींच्या कलेचा, त्यांच्या ज्ञानाचा मोठा ठेवाच आहे. त्याची अनुभूती घेण्यासाठी आजही जगभरातून लाखो पर्यटक, अभ्यासक तेथे आवर्जून येतात. वेरूळमध्ये कैलास मंदिरासह बौद्ध आणि जैन लेणीही आहेत. या तिन्ही धर्मांचे सहचर्य यातून दिसते. जागतिक वारसास्थळ म्हणून दर्जा मिळालेले कांचनगंगा अभयारण्य हे भारतातील पहिले ‘मिश्र वारसास्थळ’ आहे. माणूस, माणसाचा धर्म आणि निसर्ग, निसर्गाचा स्वतःचा धर्म याची एकतानता येथे दिसते.

भारतातील काही कला जागतिक वारसा म्हणून घोषित झालेल्या आहेत. यामध्ये ‘रामलीला’सारखा नाट्यप्रकार आहे, तसेच वेदपठणाची परंपराही आहे. ‘रामलीला’ची परंपरा काही शे वर्षे चालू आहे, तर वेदपठणाची किमान ३ सहस्र ५०० वर्षांपासून चालू आहे. यामध्ये लोकसहभाग, जगातील प्राचीन साहित्य मानल्या गेलेल्या वेदांची त्याच पद्धतीने आजपर्यंत चालू असलेली पठणपद्धत हे सारे बघितले गेले.

वारसा जपायचा कशासाठी ?

जुन्या इमारती, एखादी नष्टप्राय होत चाललेली कला जपायची कशासाठी ? असा प्रश्न काहीवेळा विचारला जातो. तो बरेचदा अज्ञानातून किंवा आर्थिक विचारांतूनही केला जातो. याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहायला हवे. वारसा आपल्याला काय देतो ? तर जगण्याला भक्कम पाया देतो. आपल्याकडे परंपरागत चालू असलेल्या गोष्टी, आपल्या जगण्याचा पाया असतात. आपण आत्ता असे का आहोत ? याचे उत्तर या परंपरांकडे डोळसपणे पाहिल्यावर समजते. यातील ‘डोळसपणे’ हा शब्द अधिक महत्त्वाचा ! त्या परंपरांमागील कारण शोधायला हवे. ते कारण सापडले, की वारसा जपण्याचे कारण अलगद हाती पडते. हा झाला कला किंवा अमूर्त स्वरूपातील वारसा. मूर्त स्वरूपातील वारसा आपल्याला पूर्वजांचे पराक्रम, त्यांचे विचार, त्यांची जीवनपद्धती, त्यांचे आचरण, वातावरण अशा अनेकविध गोष्टी दाखवत असतो. नालंदा विद्यापिठासारखा वारसा आपल्याला ज्ञानमार्गाची पुन्हा एकदा जाणीव करून देतो. पूर्वजांच्या कर्तृत्वाने अभिमान वाटतो आणि त्यासह त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून ज्ञानमार्गी होण्याची प्रेरणाही हा वारसा देतो. उत्तम, भव्य ते निर्माण करण्याचा आग्रह हाच वारसा करत असतो. उत्तम गडकोट, रायगडासारखा किल्ला पहतांना मान उंचावते, ऊर भरून येतो, तो उगाच नाही. वारसा जपायचा तो यासाठी ! आपल्या जगण्याचा आधार समजावा आणि त्या आधारे जगण्याला आकार मिळावा म्हणून ! हा झाला अमूर्त स्वरूपाचा लाभ ! वारसा जपणुकीतून मूर्त स्वरूपाचा लाभ मिळू शकतो का? हो, नक्कीच मिळतो तो म्हणजे पर्यटनातून !

ऐतिहासिक आणि प्राचीन वारशाविषयी आपला देश पुष्कळ सुदैवी आहे. आपल्याकडे जसा ऐतिहासिक वारसा आहे, तसाच प्राचीन वारसाही आहे. तो अधिककरून धार्मिकस्थळांच्या रूपात आहे. एेतिहासिक वारशाविषयीची माहिती आपल्याला बर्‍यापैकी असते. प्राचीन वारशासंदर्भात मात्र अभ्यास करावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत एक चित्र उभे करावे लागते. गुहा, लेणी, प्राचीन व्यापारी मार्ग, आत्ता असलेल्या काही परंपरा, देवता या सार्‍यांचा अभ्यास करून काहीतरी गोष्टी आकार घेऊ लागतात. सातवाहन कुळातील हाल राजाने संपादित केलेली ‘गाथा सप्तशती’ हे अमूर्त वारशाचे एक महत्त्वाचे उदाहरण ! यातून त्या काळातील जीवनमान, लोकसंस्कृती, धर्म, लोकजीवन, सण, समारंभ, पिके, झाडे, फुले अशा कितीतरी गोष्टींची माहिती आपल्याला दिली. एवढेच नाही, तर मराठी भाषेची प्राचीनताही सांगितली.

पर्यटनाचा विचार

जागतिक वारसास्थळ म्हणून एखाद्या वास्तूची नोंदणी झाल्यावर तेथे भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. त्या पर्यटकांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उभ्या राहतात, नव्हे तशी युनेस्कोची अटच असते. त्याचा लाभ स्थानिकांना होतो. पुणे शहरात आणि शहराच्या जवळपास वारसा मिरवणारी अनेक दुर्लक्षित स्थळे आहेत. जुनी मंदिरे, वीरगळ आहेत. त्यांचे महत्त्व ठाऊक नसल्यामुळे एकतर ती केवळ धार्मिक स्थळे होतात किंवा अचानक त्यांचा जीर्णाेद्धार होऊन पुरातन कला, विचार यांच्या जागी सिमेंट काँक्रिटची नवी वास्तू उभी राहते. त्या ऐवजी त्या वास्तूचे तसेच जतन केले, त्या विषयातील तज्ञांना बोलावून त्याची माहिती घेतली, माहितीफलक उभे केले, तज्ञांच्या साहाय्याने गावातील तरुणांना माहिती देण्यास तयार केले, पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे, अल्पोपहाराची व्यवस्था केली आणि त्या वास्तूचे महत्त्व, प्राचीनता लोकांपर्यंत पोचवली, तर त्या गावातील पर्यटन निश्चितपणे वाढेल.

साध्य काय होते ?

वारसा जपणुकीमागील सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक गोष्टींचा विचार केला, तरी यातून साध्य काय होणार ? पुन्हा एकदा उत्तर तेच येते. आपल्या जगण्याचा, वागण्याचा आधार सापडतो. आपल्याला आपली चिकित्सा करता येते. इतिहासाचा आधार घेऊन वर्तमानाच्या खांद्यावर उभे राहिले, की भविष्याचा अधिक स्पष्टतेने विचार करता येतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे जगात कोठेही, काहीही झाले की, आमच्याकडे हे होतेच, असे आपण वारंवार म्हणत असतो किंवा ऐकत असतो. मग आपल्याकडे नक्की काय होते ? ते शोधायला नको का ? जे आहे, त्याचे संवर्धन करायला नको का ? आणि असलेला वारसा सार्‍या जगाला अभिमानाने दाखवायला नको का ? हे सारे करून ते पुढच्या पिढीच्या हाती सुपुर्दही करायला हवे आणि मिळालेला वारसा सांभाळण्यासाठी ती पिढी सुशिक्षितही करायला हवी.

(साभार : ‘महाराष्ट्र टाईम्स’ संकेतस्थळ)

पर्यटन करतांना या कृती टाळा !

१. काही महिन्यांपूर्वी ‘ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा’मध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांनी वाघिणीला जिप्सी वाहने लावून चारही बाजूंनी घेरले होते. जिप्सी वाहनांच्या गराड्यात वाघीण सापडल्याने तिला वावरणे अवघड जात असल्याची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाली होती. अशा वेळी वाघीण चवताळली असती आणि तिने आक्रमण केले असते, तर ते पर्यटकांसाठी जीवघेणेच ठरले असते. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीला घेरण्याच्या घटना, म्हणजे प्राण्यांच्या उरल्या-सुरल्या निवासात जाऊनही त्यांना त्रास देऊन वेठीस धरण्यासारखे आहे. मनुष्याने अतीउत्साहापोटी, हौसेपोटी अथवा मौजमजा करण्याच्या नादात पशू-पक्ष्यांना त्रास होईल असे वागणे टाळून ‘माणसा’प्रमाणे रहाणे, हाच सूज्ञपणा आहे !

२. भंडारदरा येथील जगविख्यात काजवा महोत्सवाच्या काळात पर्यटकांनी हुल्लडबाजी आणि मद्यपान करतात. पर्यटकांचा गोंधळ, तसेच त्यांची संख्या वाढल्याने त्यांच्या वाहनांच्या दिव्यांचा तीव्र प्रकाश यांमुळे काजव्यांची संख्या वेगाने अल्प होत आहे. मादीला आकर्षित करण्यासाठी नर काजवे प्रकाश सोडतात. ते बघून माद्या भूमीवरील पालापाचोळा आणि रानवाटांवर बागडतात; कारण त्यांना उडता येत नाही; मात्र वर उडणारे काजवे पहाण्याच्या नादात पर्यटकांकडून मादी काजवे पायदळी चिरडले जातात. काही वेळा छायाचित्र काढतांना कॅमेर्‍यांचा ‘फ्लॅश’ झाडांवर पडतो. त्या उजेडामुळे काजवे पळ काढतात.