युवा पिढीचे सहलीचे मुख्य आकर्षण म्हणजे गोवा ! तोकड्या कपड्यांनिशी समुद्रकिनार्यावर केली जाणारी ‘मज्जा’ आणि समवेत मद्याच्या बाटल्या असे सर्वांत पसंतीचे ठिकाण म्हणून कल्पना करत युवाच नव्हे, तर सर्व वयोगटांतील लोक गोव्यात पाऊल ठेवतात; पण हा तो गोवा नाही, जो आतापर्यंत दाखवण्यात आला आहे. खरा गोवा काय आहे ? हे जाणून घेऊया या लेखातून !
१. केवळ प्रेक्षणीय स्थळ नव्हे, तर आध्यात्मिक शोध घेण्याचा आंतरिक प्रवास !
गोव्याची सांस्कृतिक समृद्धी त्याच्या प्रसिद्ध समुद्रकिनार्यांच्या पलीकडेही विस्तारलेली आहे. गोव्यात अनेक शतकांपूर्वीची आध्यात्मिक स्थळे, मंदिरे आणि परंपरा आहेत. या स्थळांना केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर सांस्कृतिक आणि स्थापत्यशास्त्रीय महत्त्वही आहे, ज्यामुळे गोव्याच्या वारशाचे सखोल दर्शन घडते. ‘आध्यात्मिक पर्यटना’चे अग्रगण्य केंद्र म्हणून गोव्यातील मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या समृद्ध इतिहासाने भारतासह आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आध्यात्मिक अनुभव देत आहे. शतकानुशतके असलेल्या गौरवशाली परंपरा आणि पवित्र खुणा यांसह, गोवा केवळ प्रेक्षणीय स्थळ नव्हे, तर त्याही पलीकडे सखोल आध्यात्मिक शोध घेण्याच्या आंतरिक प्रवासाकडे नेतो.
अलिकडील काही वर्षांत गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये ‘समुद्रकिनार्यावरील पर्यटन’ या प्रतिमेच्या पलीकडे असलेल्या गोवा राज्याच्या क्षमतेवर भर देण्यात आला आहे. पर्यटन खाते गोव्यातील पवित्र स्थळांना, तीर्थक्षेत्रांना आणि आध्यात्मिक आश्रयस्थानांना प्रोत्साहन देत असल्याने आध्यात्मिक पर्यटनाच्या संकल्पनेला आता गती मिळत आहे. राज्यातील समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे जतन अन् संवर्धन करतांना पर्यटनाशी संबंधित प्रस्तावांमध्ये विविधता आणण्याचे राज्याचे दीर्घकालीन धोरण आहे.
२. एकादश तीर्थ : गोव्यातील अभिनव पर्यटन उपक्रम !
‘एकादश तीर्थ’ या आध्यात्मिक पर्यटन उपक्रमाची कोनशिला (पाया) आहे, ज्यामुळे या मंदिरांना भेट देणार्यांना गोव्याचा अद्वितीय इतिहास, वास्तूकला आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ११ मंदिरांचा अभ्यास करण्याची संधी मिळते. या ‘एकादश तीर्थ’यात्रेमध्ये मंगेशी येथील श्री मंगेश मंदिर, म्हार्दाेळ येथील श्री महालसा नारायणी मंदिर, तांबडी सुर्ल येथील महादेव मंदिर, नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिर, सत्तरी येथील श्री ब्रह्मकरमळी मंदिर, फातर्पा येथील श्री शांतादुर्गा मंदिर, मडगाव येथील हरि मंदिर, जांबावली येथील श्री दामोदर मंदिर, पैंगीण येथील परशुराम मंदिर, खांडोळा येथील श्री महागणपति मंदिर आणि सांखळी येथील श्री दत्तात्रेय मंदिर यांसारख्या महत्त्वपूर्ण आध्यात्मिक स्थळांचा समावेश आहे. याद्वारे पर्यटकांना गोव्याच्या विविध धार्मिक परंपरांशी जोडणारा एक आध्यात्मिक प्रवास घडवण्याचा हेतू आहे. या पवित्र स्थळांना सखोल आध्यात्मिक महत्त्व आहे आणि ते राज्याच्या प्राचीन परंपरांचे प्रतिबिंब आहेत. ‘एकादश तीर्थ’ पुनरुज्जीवित करून आणि त्याविषयी प्रोत्साहन देऊन आध्यात्मिक ज्ञानाचा शोध घेणारे भक्त अन् पर्यटक या दोघांनाही चैतन्यदायी तीर्थयात्रेचा अनुभव देण्याचे गोवा सरकारच्या पर्यटन विभागाचे उद्दिष्ट आहे.
गोवा पर्यटन विकास महामंडळाने (गोवा टुरिझम् डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन – जी.टी.डी.सी.) राज्यभरातील विविध मंदिरे आणि धार्मिक स्थळे अभ्यागतांना अनुकूल बनवण्यासाठी त्यांत सुधारणा करण्यात सक्रीय भूमिका घेतली आहे. हा उपक्रम केवळ या पवित्र स्थळांचा स्थापत्यशास्त्रीय आणि सांस्कृतिक वारसा जतन करत नाही, तर अभ्यागतांचा एकूण अनुभवही समृद्ध करतो. ‘जीटीडीसी’ने मंदिरांकडे जाणारे रस्ते, पार्किंग, तेथील वीज व्यवस्था, परिसराचा विकास, शौचालय यांसारख्या आधुनिक सुविधांसह अनेक कामांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे गोव्याच्या आध्यात्मिक खुणांमध्ये लक्षणीय परिवर्तन झाले आहे.
तुयें येथील श्री भगवती मंदिर, सांखळी येथील श्री राधाकृष्ण मंदिर, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर, पारोडा येथील श्री चंद्रेश्वर भूतनाथ मंदिर, साल येथील श्री भूमिका मंदिर, मोरजी येथील श्री मोरजाई मंदिर यांसारख्या ठिकाणीही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
३. गोव्यातील मंदिरांमधील अनोख्या परंपरा !
‘जीटीडीसी’चे ही पवित्र स्थळे अद्ययावत् करण्याचे प्रयत्न गोव्याच्या आध्यात्मिक पर्यटनात या स्थळांना हे एक महत्त्वाचे स्थान प्राप्त करून देतील. माशेल येथील चिखल कालो, सांखळी येथील त्रिपुरारि पौर्णिमा, जांबावली येथील गुलालोत्सव, वास्को सप्ताह, मडगाव येथील दिंडी महोत्सव, शिरगाव जत्रा, घोडेमोडणी, नवरात्रीच्या काळातील मखरोत्सव यांसारख्या विविध चैतन्यदायी उत्सवांना पर्यटन विभाग सक्रीयपणे प्रोत्साहन देत आहे. यामुळे गोवा राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पुढे येत असून आध्यात्मिक पर्यटनस्थळ म्हणून त्याचे आकर्षण वाढते. यासह तांबडी सुर्ल येथील शिवाचे मंदिर, सांखळी येथील रूद्रेश्वर मंदिर आणि गोव्यातील इतर शिव मंदिरांमध्ये भगवान शिवाला समर्पित असलेला महाशिवरात्री या प्रमुख उत्सवाला प्रोत्साहन देण्यात गोवा पर्यटन विकास महामंडळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या उपक्रमांद्वारे पर्यटन विभाग अभ्यागतांचे आध्यात्मिक अनुभव समृद्ध करतो आणि राज्याच्या परंपरांविषयी सखोल माहिती जाणून घेण्यास प्रोत्साहन देण्यासह या आनंददायी उत्सवांमध्ये सहभागी होण्यास उद्युक्त करतो. त्यामुळेच गोवा राज्याला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शोधासाठी एक महत्त्वाचे स्थान म्हणून बळकटी मिळत आहे.
४. गोव्याची आध्यात्मिक ओळख करून देण्यासाठी गोवा सरकारचा पुढाकार !
आजच्या जगात जिथे इंटरनेटच्या माध्यमातून कोणतीही माहिती चुटकीसरशी प्राप्त होऊ शकते, तिथे गोव्याचा आध्यात्मिक पर्यटन उपक्रम जागतिक स्तरावर पोचवण्यासाठी गोवा पर्यटन विभाग अथक प्रयत्नरत आहे. गोव्याच्या आध्यात्मिक पर्यटनाचा प्रचार वर्तमानपत्रे, ‘डिजिटल’ माध्यमे, तसेच सामाजिक माध्यमे यांसह विविध मंचांद्वारेही पसरत आहे. गोव्याचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करणारी सामग्री सिद्ध करून अधिक सखोल आणि अधिक अर्थपूर्ण प्रवासाचा अनुभव घेऊ इच्छिणार्या पर्यटकांना आकर्षित करण्यात गोवा पर्यटन विभाग यशस्वी झाला आहे. आध्यात्मिक प्रवास, धार्मिक सण आणि पवित्र स्थळे यांवर लक्ष केंद्रित करणार्या सामाजिक माध्यमांच्या मोहिमांमुळे गोव्याच्या समृद्ध आध्यात्मिक भूमीविषयी वेळोवेळी विशेष सादरीकरण केले गेले आहे. गोव्याच्या आध्यात्मिक वारशाचा शोध घेण्यासाठीच्या मोहिमा तरुण आणि वृद्ध अशा दोन्ही प्रकारच्या पर्यटकांसाठी सिद्ध करण्यात आल्या आहेत.
‘जीटीडीसी’च्या सहकार्याने पर्यटन विभागाच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. विविध उपक्रमांमुळे गोवा एक अग्रगण्य आध्यात्मिक पर्यटनस्थळ बनण्याच्या मार्गावर आहे. गोव्याचा आध्यात्मिक पर्यटनातील प्रवास हा ‘समुद्रकिनारे’ आणि ‘मेजवान्या’ या पारंपरिक ओळखीच्या पुढे जाऊन या भूमीच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विविधतेला सामावून घेणारा आहे.
– श्री. सुनील आंचिपाका, संचालक, गोवा पर्यटन विभाग आणि व्यवस्थापकीय संचालक, गोवा पर्यटन विकास महामंडळ, गोवा सरकार.
गोवा सरकारचा दूरदर्शी दृष्टीकोन !
गोवा राज्य आपल्या आध्यात्मिक पर्यटनाचा विस्तार करत असतांना पर्यटकांना केवळ सुट्टीच नव्हे, तर मन, शरीर आणि आत्मा यांचे पोषण करणारा परिवर्तनशील प्रवास देण्याचे आश्वासन देते. गोव्याच्या मंदिरांतील शांत वातावरणात मनाला मिळणारी शांतता असो आणि येथील पारंपरिक उत्सव असोत, गोव्यात प्रत्येक प्रवाशासाठी काहीतरी आध्यात्मिक आहे. येणार्या काळात गोवा ‘सन, सँड अँड सी’ (सूर्य, वाळू आणि समुद्र) याही पलीकडचा आहे, हा सरकारचा दूरदर्शी दृष्टीकोन अधोरेखित होत राहील. गोवा ही आध्यात्मिकता, परंपरा आणि संस्कृती यांची भूमी आहे, जिचा शोध घेणे आवश्यक आहे.
– श्री. सुनील आंचिपाका, संचालक, गोवा पर्यटन विभाग आणि व्यवस्थापकीय संचालक, गोवा पर्यटन विकास महामंडळ, गोवा सरकार.
(या विशेष लेखाबद्दल गोवा सरकारच्या पर्यटन विभागाचे आम्ही आभार व्यक्त करतो.)