वैकुंठचतुर्दशी 

आज ‘वैकुंठचतुर्दशी’ आहे. त्या निमित्ताने…

कार्तिक शुक्ल चतुर्दशीला ‘वैकुंठचतुर्दशी’ म्हणतात. याविषयी पुराणातील कथा अशी आहे – वाराणसीच्या मनकर्णिका तीर्थात भगवान श्रीविष्णु सहस्र कमळांनी श्री विश्वेश्वराची पूजा करत बसले असता त्यांची परीक्षा पहाण्यासाठी भगवान शंकरांनी त्यातील एक कमळ लपवले. श्रीविष्णुंच्या लक्षात येताच पूजेत उणीव राहू नये; म्हणून त्यांनी स्वतःचे नेत्रकमल अर्पण करून सहस्र कमळे वहाण्याचा आपला संकल्प पूर्ण केला. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना त्रैलोक्याचे राज्य दिले आणि वर मागण्यास सांगितले. श्रीविष्णूंनी ‘राक्षसी शक्तीचा निःपात करण्यासाठी लोकांना छळणार्‍या दैत्य आणि राक्षस यांचा नाश माझ्या हातून व्हावा’, असा वर मागितला. भगवान शंकरांनी त्यांना सुदर्शनचक्र दिले आणि ‘कार्तिक शुक्ल चतुर्दशीला जे ध्यान करून मनकर्णिकेत स्नान करतील, त्यांना वैकुंठ प्राप्ती होईल’, असा वर दिला. तेव्हापासून कार्तिक शुक्ल चतुर्दशीला ‘वैकुंठचतुर्दशी’, असे म्हणतात. या दिवशी शंकर आणि श्रीविष्णु यांची भेट असते अन् केवळ याच दिवशी श्री शंकरांना १०८ तुळशीची पाने आणि श्रीविष्णूंना १०८ बेलपाने वाहिली जातात.

– सौ. प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली

(साभार : मासिक ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक)