पुणे – मतदानाविषयी शहरातील नागरिकांच्या असलेल्या उदासीनतेमुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होतो. पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. पुणेकरांनी मतदानासाठी बाहेर पडावे, यासाठी विविध आकर्षक सवलती घोषित केल्या आहेत. (शासनकर्ते योग्य कामे करतील, तर अशा सवलतींची आमिषे जनतेला द्यावी लागणार नाहीत, हेही तेवढेच खरे ! – संपादक) पुणे नागरिक मंच, क्रेडाई, आर्ट ऑफ लिव्हिंग, पुणे हॉटेलर्स असोसिएशन, पुणे रेस्टॉरंट्स अँड हॉटेलर्स असोसिएशन, पेट्रोल डिलर्स असोसिएशन, पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टंमेंट्स महासंघ या संस्थांनी पुढाकार घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.
पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाचे सुहास पटवर्धन म्हणाले, गृह सहकारी संस्थांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे मतदान वाढवण्यासाठी गेल्या ३ महिन्यांपासून प्रयत्न करत आहोत. समाजमाध्यमांचाही उपयोग केला जात आहे.
पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले की, २० नोव्हेंबर या दिवशी इंजिन ऑईल खरेदीवर ५० रुपयांचे पेट्रोल विनामूल्य देऊ. पुणे रेस्टॉरंट्स अँड हॉटेलर्स असोसिएशनचे गणेश शेट्टी म्हणाले की, मतदानाचे कर्तव्य बजावलेल्या व्यक्तींना हॉटेलमध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिका :जनतेने मतदान करावे, यासाठी सवलती द्याव्या लागणे, हे व्यवस्थेसाठी अशोभनीय ! |