गोव्यातील महिलांची आखातामध्ये नोकरीच्या आमिषाने तस्करी !

पणजी, १० नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यातील महिलांची आखाती देशांमध्ये नोकरीचे आमीष दाखवून तस्करी केली जात आहे. महिलांना आखातामध्ये गेल्यानंतर त्यांना सहजतेने परत यायला मिळू नये, यासाठी त्यांचे ‘व्हिसा’, पारपत्र आदी अधिकृत कागदपत्रे कह्यात घेऊन त्यांना ‘बाँडेड लेबर’ (बांधील कामगार) म्हणून घरकाम करण्यास किंवा तत्सम अन्य काम करण्यास लावले जात आहे.

हल्लीच एक घटना उघडकीस आली आहे. दलालांनी गोव्यातील एका तरुण महिलेला घरकाम करण्याच्या नोकरीसाठी हल्लीच बहरीन येथे पाठवले. संबंधित महिलेची आर्थिक स्थिती चांगली नव्हती; म्हणून तिने ही नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. या महिलेच्या एका मैत्रिणीने प्रारंभी तिला बहरीन येथे काम करणार्‍या एका दलाल महिलेला जोडून दिले. तेथील महिला दलालाने गोव्यातील तरुण महिलेची सर्व कागदपत्रे हाताळली; मात्र प्रत्यक्ष ती या महिलेला भेटलीच नाही. गोव्यातील महिला बहरीन येथे पोचल्यानंतर तिला ‘बाँडेड लेबर’चे काम देण्यात आले आणि तिला मूलभूत सुविधाही पुरवल्या गेल्या नाहीत. महिलेला कोणतेही स्वातंत्र्य नव्हते, तर कामाचे तासही संबंधित मालकिणीच्या मर्जीवर अवलंबून होते. महिलेला कामावर ठेवल्याविषयी कोणते करारपत्रही देण्यात आले नाही. ‘केवळ रहाण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली जाईल आणि मोलकरिणीचे काम करावे लागेल’, असे सांगितले होते. राहिलेले अन्न किंवा ‘इन्स्टंट नूडल’ जेवण म्हणून दिले जात होते. महिलेला इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्याने तिला घरच्या लोकांशी संपर्क साधता येत नव्हता. महिलेचे पारपत्रही दलाल महिलेने स्वत:कडे ठेवल्याने तिला तेथून परत येता येत नव्हते. महिलेला प्रतिमाह २६ तारखेला २६ सहस्र रुपये वेतन दिले जायचे; मात्र तिला गोव्यात घरी पैसे पाठवायचे असल्याने स्वत:कडे अधिक पैसे ठेवायला मिळत नव्हते.

दलालांचे जाळे कार्यरत

विशेष म्हणजे महिलांना नोकरीचे आमीष दाखवून आखातामध्ये पाठवण्यासाठी गोव्यात सर्वत्र दलालांचे जाळेच कार्यरत आहे. हे दलाल अडचणीत असलेल्या किंवा चांगल्या वेतनाच्या नोकरीच्या आमिषाला बळी पडणार्‍या मुली किंवा महिला यांना सातत्याने शोधत असतात. दलाल या मुली किंवा महिला यांना बहरीन किंवा ‘यु.ए.ई.’ आदी आखाती देशांमध्ये चांगल्या वेतनाची नोकरी मिळणार असल्याचे आमीष दाखवतात. आमीषाला बळी पडणार्‍या मुली किंवा महिला यांना त्वरित ‘व्हिसा’ आणि पारपत्र मिळवून दिले जाते. पारपत्र घेण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी तत्परतेने करवून घेतली जाते. ज्या मुलींना तांत्रिक माहिती आहे किंवा ‘ऑनलाईन’ चांगल्यारित्या संवाद साधू शकतात अशांना दलाल अधिक प्रमाणात लक्ष्य करत असतात. दलाल मुली किंवा महिला यांना प्रत्यक्ष न भेटता सर्व व्यवहार ‘ऑनलाईन’ स्वरूपात करत असतात. ‘व्हिसा’ आणि पारपत्र यांसाठी लागणारा खर्च दलाल स्वतः करतो आणि हा खर्च संबंधित मुली किंवा महिला यांनी त्यांना पुढे त्यांच्या वेतनामधून दलालाला द्यायचा असतो. याविषयी अधिक माहिती देतांना ‘अन्याय रहित जिंदगी’चे संचालक अरुण पांडे म्हणाले, ‘‘कामगार या नात्याने महिलांची तस्करी करण्याचे नवीन संकट गोवा राज्यात उद्भवले आहे.’’