Australia Social Media Ban For Children : ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांवर सामाजिक माध्यमे वापरण्यास बंदी !

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियामध्ये १६ वर्षांखालील मुलांवर सामाजिक माध्यमे वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘सामाजिक माध्यमांमुळे मुलांची हानी होत असून याला आळा घालण्याची वेळ आली आहे’, असे ते म्हणाले; मात्र या वेळी त्यांनी सामाजिक माध्यमांची नावे सांगितली नाहीत.

१. इन्स्टाग्राम, फेसबुक, टीकटॉक, एक्स आदी सामाजिक माध्यमांवर १६ वर्षांखालील मुलांसाठी बंदी घालण्यात येणार आहे. या खेरीज यू ट्युबवरही बंदी घालण्याची शक्यता आहे, असे ऑस्ट्रेलियाचे दळणवळण मंत्री मिशेल रोलँड यांनी सांगितले. या संदर्भात अद्याप सामाजिक माध्यमांच्या आस्थापनांकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

२. या संदर्भातील कायदा करण्यासाठी यावर्षी संसदेत एक प्रस्ताव मांडण्यात येणार असून कायदा झाल्यानंतर ही वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. हा कायदा लागून झाल्यानंतर १६ वर्षांखालील मुले सामाजिक माध्यमांचा वापर करणार नाहीत, याचे दायित्व संबंधित आस्थापनांवर असेल.