Diwali Celebration In White House : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी !

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी २८ ऑक्टोबरच्या रात्री त्यांचे सरकारी निवासस्थान ‘व्हाईट हाऊस’मध्ये दिवाळी साजरी केली. यात ६०० हून अधिक भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक सहभागी झाले होते.

या वेळी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, माझ्या राष्ट्राध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सिनेटर (खासदार) या कार्यकाळात मी मोठ्या संख्येने भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांसमवेत काम केले आहे. दक्षिण-आशियाई अमेरिकी समुदायाने अमेरिकी जीवनाचे प्रत्येक अंग समृद्ध केले आहे. हा जगातील सर्वांत वेगाने वाढणारा समुदाय आहे. आता ‘व्हाईट हाऊस’मध्ये दिवाळी अभिमानाने साजरी केली जाते.

या वेळी उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि बायडेन यांच्या पत्नी या दिवाळी सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत. बायडेन म्हणाले की, पत्नी जिल आणि कमला हॅरिस यांना येथे यायचे होते; पण त्या प्रचारात व्यस्त आहेत.

सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून दिल्या शुभेच्छा !

अंतराळातून शुभेच्छा देताना सुनीता विल्यम्स

अमेरिकेच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून व्हिडिओ संदेशाद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

त्या म्हणाल्या की, या वर्षी मला पृथ्वीपासून ४०० कि.मी.वर अंतराळ स्थानकावर दिवाळी साजरी करण्याची अनोखी संधी मिळाली आहे. माझ्या वडिलांनी आम्हाला नेहमी दिवाळी आणि इतर भारतीय सणांची शिकवण दिली आणि आम्हाला आमच्या सांस्कृतिक मुळाशी जोडून ठेवले आहे. दिवाळी हा आनंदाचा क्षण आहे; कारण या सणामुळे जगात चांगुलपणाचा प्रसार होतो.

वर्ष २००३ पासून व्हॉईट हाऊसमध्ये साजरी होत आहे दिवाळी !

वर्ष २००३ मध्ये जॉर्ज बुश राष्ट्राध्यक्ष असतांनाच्या काळात व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यास प्रारंभ झाला. वर्ष २००९ मध्ये बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये एकांतात दिवाळी साजरी केली होती.

अमेरिकेत ५४ लाख भारतियांपैकी ४८ टक्के हिंदु  !

‘प्यू रिसर्च सेंटर’च्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेत ५४ लाख भारतीय वंशाचे लोक आहेत. त्यांपैकी ४८ टक्के (अनुमाने २५ लाख) हिंदू आहेत. सध्या बायडेन प्रशासनात १३० हून अधिक भारतीय महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. अमेरिकेतील अनुमाने ३८ टक्के डॉक्टर भारतीय वंशाचे आहेत. भारतीय-अमेरिकी अमेरिकेतील सर्वाधिक कमाई करणारा वांशिक गट आहे.