भूमीची अवैध खरेदी रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

  • भुजवाडा (तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती) येथील श्री काळेश्‍वर महादेव संस्थानची कोट्यवधी रुपयांची भूमी लाटण्याचे षड्यंत्र !

  • ६ एकर भूमी हडपण्याचा प्रयत्न !

  • काही प्रशासकीय अधिकार्‍यांचे संगनमत !

निवेदन देतांना दर्यापूर येथील मंदिराचे हितचिंतक

अमरावती – येथील दर्यापूर तालुक्यातील श्री काळेश्‍वर महादेव संस्थानची कोट्यवधी रुपयांची भूमी लाटण्याचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे पदाधिकारी श्री. अनुप जयस्वाल आणि महासंघाचे अमरावती जिल्हा निमंत्रक श्री. कैलास पनपालीया यांनी दर्यापूरच्या तहसीलदारांकडे लेखी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. या संस्थानच्या भूमीच्या खरेदीचे अवैध प्रकरण तात्काळ रहित करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे. याआधी येथील श्री सोमेश्‍वर देवस्थानची ५० कोटी रुपयांची भूमी कवडीमोल भावात विकण्याचा घोटाळा उघड झाला होता.

श्री काळेश्‍वर महादेव संस्थान

१. पूर्वी ‘श्री काळेश्‍वर महादेव संस्थान’ या नावाने प्रसिद्ध असलेले देवस्थान ‘श्री कोंडेश्‍वर महादेव संस्थान’ या नावाने ओळखले जाते. या संस्थानच्या मालकीच्या भुजवाडायेथे शेत गट क्र. ६८ आणि ९२, अशा दोन शेतभूमी आहेत.

२. या शेतभूमी संस्थानला अनुक्रमे वर्ष १९१० आणि वर्ष १९१२ मध्ये मिळालेल्या होत्या. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून संस्थानवर खर्च होणे अपेक्षित असतांना भूमी कह्यात घेतलेल्यांकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला संस्थानला मिळत नाही.

३. हे संस्थान अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या संस्थानचे सर्व विश्‍वस्त मृत झाल्याचा अपलाभ घेत १५ एकर शेतभूमीपैकी ६ एकर भूमी हडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

४. या भूमीच्या खरेदीसाठीचा अर्ज पुरुषोत्तम पुंडलिकराव टाले यांनी केला आहे. मंदिराच्या भूमीचे संरक्षण करण्याचे दायित्व शासन आणि न्यायालय यांचे असल्याचे निर्देश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने विविध निवाड्यांत दिलेले आहेत, तसेच कायद्यानुसार देवस्थानच्या भूमींना कुळ कायदा लागू नसतांना महसूल विभागातील काही अधिकारी त्यांच्या पदाचा अपवापर करून अवैधपणे ही भूमी इतरांच्या घशात घालत आहेत.

५. मंदिराला कुळ कायद्याच्या प्रावधानानुसार सूट प्रमाणपत्र प्राप्त असल्याने या भूमीला विक्री प्रमाणपत्र देण्याचे तहसीलदारांकडील प्रकरण त्वरित रहित करण्याची मागणीही मंदिर महासंघाने केली आहे.

६. शेतभूमी प्रकरणात मंदिर महासंघाच्या वतीने पाठपुरावाही करण्यात येणार आहे.

याविषयीचे निवेदन देतांना दर्यापूर येथील मंदिराचे हितचिंतक सर्वश्री प्रदीप मलिये, गौरव बैताडे, ओम राणे, संदीप राजगुरे, गजानन शेंडोकार, अक्षय सरडे, दिनेश धोत्रे, तेजस गिरी आदी उपस्थित होते.

राज्यव्यापी अभियान राबवणार !

संपूर्ण महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून असे अनेक अपप्रकार चालू झाले असून त्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. अशी घटना अन्य कुठे घडत असल्याचे निदर्शनास आल्यास ती सर्व माहितीसह  मंदिर महासंघाला द्यावी. या विरोधात लवकरच मंदिर महासंघाच्या वतीने राज्यव्यापी अभियान चालवण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली आहे.