Ayodhya Foundation Samoohik Tarpan : देशभरात ‘सामूहिक तर्पण’ विधी संपन्‍न : अयोध्‍या फाऊंडेशनचा पुढाकार !

गेल्‍या २ सहस्र वर्षांत धर्मरक्षणार्थ प्राण त्‍यागलेल्‍या ८० कोटी हिंदूंसाठी सश्रद्ध हिंदूंनी केला विधी !

हरिद्वार (उत्तराखंड) – गेल्‍या २ सहस्र वर्षांत ख्रिस्‍ती आणि इस्‍लामी आक्रमकांविरुद्ध धार्मिक संघर्ष करतांना प्राण त्‍यागलेल्‍या ८० कोटी हिंदूंसाठी सर्वपित्री अमावास्‍येला देशभरात सामूहिक तर्पण विधी करण्‍यात आला. या हिंदु पूर्वजांमुळेच देशात आजही ८० टक्‍के हिंदू आहेत. त्‍यांच्‍याप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी ‘अयोध्‍या फाऊंडेशन’ संघटनेने सामूहिक तर्पणाचा उपक्रम देशभर राबवला.

यानिमित्त संघटनेच्‍या संस्‍थापिका मीनाक्षी शरण या गेली ८ वर्षे हरिद्वारला येत असतात. यंदाही हरिद्वारच्‍या चंडी घाटावर त्‍या, तसेच अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ यांच्‍या उपस्‍थितीत तर्पण विधी करण्‍यात आला.

१. प्रतिवर्षी १५ ऑगस्‍टला ‘श्रद्धा संकल्‍प दिन’ करून एक पवित्र धागा स्‍वीकारून देश-विदेशातील लाखो हिंदूंना सर्वपित्री अमावास्‍येला सामूहिक तर्पण करण्‍याची शपथ त्‍या देतात.

२. चंडी घाटावर सर्वपित्री अमावास्‍या, म्‍हणजेच २ ऑक्‍टोबरला २५० हिंदू आणि २१ मुला-मुलींनी सामूहिक तर्पण केले. यांमध्‍ये मीनाक्षी शरण, निशीथ शरण, मुंबईहून शिवानी शरण, अशोक विंडलस, कर्नल हनी बक्षी (निवृत्त), कर्नल दत्ता (निवृत्त), डेहराडूनहून कर्नल विवेक गुप्‍ता (निवृत्त), डॉ. कुलदीप दत्ता, सुधीर शर्मा, डॉ. प्राची शर्मा, देहलीहून अधिवक्‍ता अमिता सचदेव, हिंदु जनजागृती समितीच्‍या संदीपकौर मुंजाल, पूजा तिवारी, हिमाचल प्रदेशातील हिंदु जागरण मंचचे माजी महामंत्री आणि प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ कमल गौतम, महेंद्र ठाकूर, घड सेनेचे संस्‍थापक विमल बदोनी, तसेच चेन्‍नईहून चंद्रभान सिंह आदींनी सहकुटुंब सामूहिक तर्पण केले.

३. या मोहिमेचा उद्देश हिंदूंना त्‍यांच्‍या शूर आणि गौरवशाली इतिहासाचे स्‍मरण करून देणे, त्‍यांना स्‍वरक्षणासाठी शत्रूपासून जागरूक करणे आणि भावी पिढीला सनातन संस्‍कृती अन् परंपरांविषयी शिक्षित करणे हा आहे.

४. आतापर्यंत १६ देश आणि भारतातील प्रत्‍येक प्रांतातील लाखो हिंदू या मोहिमेत सामील झाले आहेत.

उत्‍स्‍फूर्तपणे सहभागी झालेल्‍या संघटना आणि आस्‍थापने !

हिंदु जागरण मंच (हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश राज्‍ये), हिंदु युवा मोर्चा (छत्तीसगड), हिंदु रक्षक (मध्‍यप्रदेश), भारत रक्षा मंच (उज्‍जैन), इटर्नल हिंदू फाऊंडेशन (देहली आणि मुंबई), शाश्‍वत भारत ट्रस्‍ट (डेहराडून), घड सेना (उत्तराखंड), पनून कश्‍मीर, सारस्‍वत काश्‍मिरी ब्राह्मण फाऊंडेशन, अरुंधती फाऊंडेशन (पुणे), देवदेवेश्‍वर संस्‍थान (पुणे), संवेदना संस्‍थान (हिमाचल प्रदेश), अयोध्‍या फाऊंडेशन (नैरोबी, केनिया), सिद्ध विद्या एसोसिएट्‍स (मुंबई), अमिता सचदेव अँड एसोसिएट्‍स (देहली) आणि हिंदु जनजागृती समिती