प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्या संदर्भात निंदनीय वक्तव्याचे प्रकरण
मुंबई – प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्या संदर्भात निंदनीय वक्तव्य करणारे ज्ञानेश महाराव यांना मुंबई येथील प्रसिद्ध श्री शिवाजी नाट्यमंदिर या नाट्यगृहाच्या कार्यकारिणीतून काढा, अशा मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने देण्यात आले आहे. नुकतेच नाट्यगृहाचे अध्यक्ष कर्नल सुधीर सावंत (निवृत्त) यांना हे निवेदन देण्यात आले.
वाशी येथे काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्याविषयी बेताल आणि निंदनीय वक्तव्य केले होते. असे वक्तव्य केवळ मानसिक संतुलन बिघडलेली समाजकंटक व्यक्तीच करू शकते. त्यामुळे श्री शिवाजी नाट्यमंदिर या नामांकित संस्थेच्या कार्यकारिणीतून महाराव यांना काढून टाकण्यात यावे आणि आपल्या संस्थेचा मान कायम राखावा. आमचे देवी-देवता, साधू-संत आणि आदर्श यांचा कुणी अवमान आणि अपप्रचार करत असेल, तर आम्ही खपवून घेणार नाही. त्यासाठी आम्ही संवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करू, असे या निवेदनात म्हटले आहे.
या वेळी सकल हिंदु समाजाच्या वतीने श्री. प्रमोद काटे, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. लक्ष्मण जठार, सकल हिंदु समाज, विक्रोळीचे श्री. प्रभाकर भोसले, श्री. शिवकार्य प्रतिष्ठानचे श्री. बाळासाहेब त्र्यंबके, रायगड संवर्धन प्रतिष्ठानचे श्री. राजेंद्र सावंत, श्री स्वामी समर्थांचे कामोठे आणि पनवेल मठाचे भक्त श्री. तेजस, हिंदुत्वनिष्ठ भांडुपकर गटाच्या सौ. प्रिया जोशी, कु. प्राची आदी उपस्थित होते. तसेच शिवसंस्कार, सिंधुदुर्ग, विश्व हिंदु परिषद, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, लक्ष्मीनारायण सामाजिक ग्राम विकास मंडळ, खिंडुक पाडा, श्रीराम सामाजिक विकास मंडळ आदी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवेदन दिले.