१. झोपेत वरच्या दिशेने वेगाने जात असल्याचे पाहून साधिकेला दचकून जाग येणे आणि याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर त्यांनी येणार्या अनुभूतींचा अभ्यास करण्यास सांगणे
‘मार्च २०२४ पासून मला ‘मी झोपल्यावर आकाशात वेगाने वरवर जात आहे’, असे दिसायचे. ‘मी कुठे जात आहे ?’, ते मला कळत नसायचे. त्या वेळी इतकी मी दूर जात होते की, मला पृथ्वी एखाद्या लहान चेंडूप्रमाणे दिसायची. लहान आकारातील पृथ्वी पाहून मी झोपेतून घाबरून उठत असे. एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या भावसत्संगात मी त्यांना याविषयी सांगितले आणि ‘आध्यात्मिक त्रास असल्यास वेगळे काही उपाय करायचे का ?’, असे विचारले. त्या वेळी त्यांनी ‘पुढे काय होते ?’, त्याचा अभ्यास करूया’, असे सांगितले होते. एक दिवस मी ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना जसे मला झोपेत दिसत होते, तसेच दिसू लागले. या वेळीही मी दूर आल्याचे पाहून घाबरून २ वेळा डोळे उघडले. मी ध्यानमंदिरात असल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र समोर होते. ते पाहून मी पुन्हा डोळे मिटले की, पुढचे दिसणे चालू व्हायचे. या वेळी मी झोपेत नसून ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते, हा भेद होता; परंतु झोपेत मला जसे दिसायचे, तसेच मला या वेळीही दिसले.
२. आकाशाच्या दिशेने वेगाने वर जात असल्याचे साधिकेला दिसणे आणि पुढे जाऊन पृथ्वी लहान होतांना दिसून शनि ग्रहाभोवती असलेले कडे दिसणे
२८.७.२०२४ या दिवशी मी ध्यानमंदिरात नामजपाला बसले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून नामजप करत होते. थोड्या वेळाने मी डोळे मिटून नामजप करतांना मला ‘मी पृथ्वीपासून एकदम वेगाने (एखाद्या यानाच्या गतीपेक्षाही अधिक गतीने) वरवर जात आहे’, असे दिसू लागले. वर जाण्याचा वेग पाहून ‘मी उंचावरून पडीन’, या भीतीने मी पटकन डोळे उघडले. त्या वेळी समोर परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र होते. छायाचित्राकडे पाहून मी पुन्हा डोळे मिटले. डोळे मिटल्यावर मी वेगाने वर जात असल्याचे मला पुन्हा दिसू लागले. मी वरच्या दिशेने जाण्याची गती इतकी अधिक होती की, काही क्षणांतच माझ्या डोळ्यांत न सामावणारी पृथ्वी चेंडूच्या आकाराची लहान होतांना दिसू लागली. त्यानंतर ती एका कणाएवढी दिसू लागली. तेव्हा मी तशीच एका पोकळीत पुढे पुढे जात होते. पुढे गेल्यावर मला अतिशय मोठ्या आकाराचे दगड एका प्रवाहात फिरत पुढे जात असल्याचे दिसले. आणखी पुढे गेल्यावर तो मोठ्या आकाराच्या दगडांचा प्रवाह म्हणजे ‘शनी ग्रहाभोवती असलेले कडे आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी आणखी पुढे जाऊ लागले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणाचा अंगठा पर्वताच्या आकाराचा दिसून ग्रहमालेतील ग्रह त्यांच्या चरणांच्या खालच्या बाजूला एका कणाइतके दिसणे आणि त्यानंतर विशाल रूपात परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवयवाचा एकेक भाग साधिकेला दिसणे
त्यानंतर अतिशय मोठा दिसणारा शनि ग्रह हळूहळू दूर दूर होऊन एका लिंबाच्या आकाराइतका दिसू लागला. आणखी काही वेळ मी तशीच पुढे जात होते. त्यानंतर एक मोठा सोनेरी दरवाजा लागला. मी त्या दरवाज्याच्या जवळ गेल्यावर तो दरवाजा हळूहळू उघडू लागला. दरवाजा पूर्ण उघडल्यानंतर मी आत गेले. तेव्हा मला केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या एका चरणाचा अंगठा दिसला. तो अंगठा एखाद्या मोठ्या उंच पर्वताइतका विशाल होता. माझे लक्ष अंगठ्याच्या खालच्या बाजूला गेले. तिथे वाटाण्याच्या आकाराइतके लहान सूर्य, पृथ्वी, शनि आणि अन्य ग्रह फिरतांना दिसले. ते पाहून मी क्षणभर घाबरले. दृष्टी जिथपर्यंत पोचेल, तितक्या अंतरावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवयवांचा एकेक भाग पाहून मी स्तब्ध झाले. एखाद्या विशिष्ट उंचीवरून समुद्राला पाहिल्यास त्याच्या अथांगतेमुळे तो आपल्या दृष्टीत मावत नाही, तसे मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या एकेक अवयवाकडे पाहून होत होते. मी त्यांच्याकडे पहात पुढे जात होते. परात्पर गुरु डॉक्टर एका कुशीवर झोपलेले होते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चेहर्याकडे माझे लक्ष गेले. त्यांच्या चेहर्यावर स्मितहास्य होते. त्या वेळी दिसलेले परात्पर गुरु डॉक्टरांचे भव्य आणि विशाल रूप मनावर कायमस्वरूपी कोरले गेले आहे. ते मी कधीही विसरू शकणार नाही. ते रूप इतके सुंदर आहे की, ते क्षणभर आठवले, तरी मला जगाचा विसर पडतो.
४. रामनाथी आश्रमातील परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत त्यांच्या चरणांजवळ बसलेली असल्याचे साधिकेला दिसणे आणि परात्पर डॉक्टरांचे विशाल रूप आठवून अंगावर शहारे येणे
त्यानंतर पाण्यात दगड फेकल्यावर ज्याप्रमाणे वर्तुळाकृती तरंग दिसतात, तसे तरंग मला दिसून माझी पापणी लवली. एका क्षणात माझ्या समोरचे चित्र पालटले होते. ‘मी रामनाथी आश्रमातील परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत त्यांच्या चरणांजवळ बसले आहे’, असे मला दिसले. त्यानंतर माझे डोळे आपोआप उघडले गेले. त्या वेळी ध्यानमंदिरात नामजपाला बसून मला एक घंटा झाल्याचे लक्षात आले. मी ध्यानमंदिरातून बाहेर आल्यावर डोळे उघडे असतांना काही वेळ मला ती दृश्ये परत परत दिसत होती. ‘मी एका वेगळ्याच जगात जाऊन आले आहे’, असे मला जाणवत होते. त्या वेळी मनाला पुष्कळ शांतता जाणवत होती. परात्पर गुरु डॉक्टरांचे पाहिलेले विशाल रूप डोळ्यांसमोर येऊन बराच वेळ अंगावर रोमांच येत होते.
देवाने दिलेली अनुभूती शब्दांतून सांगणे अतिशय कठीण वाटत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेल्या या अनुभूतीसाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.७.२०२४)
|