१. भारतमूमी, देवता आणि मंदिरे यांचे महत्त्व
अनुमाने ५१ कोटी चौरस कि.मी. क्षेत्रफळ असणार्या या पृथ्वीवर सर्वांत महत्त्वाचे आध्यात्मिक स्थान कोणते असेल ?, तर ते म्हणजे आपली भारतभूमी ! त्याला कारणही तसेच आहे. ब्रह्मा, विष्णु आणि महेश या सनातन हिंदूंच्या मुख्य देवतांपैकी धर्मसंस्थापनेसाठी मी पुनःपुन्हा अवतार धारण करीन, असे वचन देणारे श्रीविष्णु यांचे आतापर्यंत झालेले सर्व अवतार याच पवित्र भूमीत झाले आहेत. महादेवाची जी १२ ज्योतिर्लिंगे जगाच्या पाठीवर आहेत, तीसुद्धा याच पवित्र भारतभूमीत आहेत; देवीची जी ५१ शक्तीपीठे आहेत, तीसुद्धा याच पवित्र भारतभूमीत आहेत. (भारतभूमीचे लचके तोडल्याने पाकिस्तान, बांगलादेश, तिबेट, नेपाळ हे वेगळे झाले, हा भाग निराळा; पण हा संपूर्ण प्रदेश अखंड भारतच आहे.) मंदिरे ही सनातन हिंदु धर्माची आधारशीला आहेत. आजच्या काळात म्हणायचे झाले, तर मंदिर हे हिंदूंसाठी चैतन्यशक्ती ग्रहण करण्याचे स्थान आहे आणि म्हणूनच हिंदु समाजाला बलहीन, दुर्बल बनवण्यासाठी धर्मांध आक्रमकांनी भारतात आल्यावर सर्वप्रथम येथील मंदिरांवर आक्रमण केले, मंदिरे नष्ट केली. अयोध्या आपण परत मिळवली असली, तरी मथुरा, काशी आदी सहस्रो ठिकाणे आजही प्रतीक्षेत आहेत.
२. भारतात मंदिर-संस्कृती नष्ट करण्याचे षड्यंत्र
सध्याचे चित्र काही वेगळे नाही. आजही सनातन हिंदु धर्माची आधारशीला असणार्या मंदिर संस्कृतीला अनेक आघातांना सामोरे जावे लागत आहे. दक्षिण भारतात मंदिरविरोधी विविध कायद्यांमुळे हिंदु मंदिरे सरकारी हस्तकांच्या कह्यात गेल्याने तेथे प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. उत्तर भारतात धर्मांध मंदिरावर आक्रमणे करत आहेत, गोव्यात मंदिरातील दानपेट्या फोडल्या जात आहेत, तर महाराष्ट्रामध्ये मंदिराचे पुजारी आणि भाविक यांच्यावर धर्मांध आक्रमण करत आहेत. अशा अनेक समस्यांनी मंदिर संस्कृतीला ग्रहण लावण्याचे षड्यंत्र चालू आहे. यात हिंदुविरोधी शक्ती मंदिर-परंपरा आणि विधी यांविषयी समाजमन बिघडवण्याचा डाव आखत आहेत, जेणेकरून मंदिर संस्कृतीवरील श्रद्धेस तडा जाईल. जसे की, केरळ येथील शबरीमला मंदिरात, तसेच महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर मंदिरात महिलांविषयी भेदभाव केला जातो, मंदिर संस्कृती महिलांना दुय्यम स्थान देते, असे भ्रम निर्माण केले जात आहेत. बरेच बुद्धीवादी लोक अयोध्येत श्रीराममंदिर बांधण्यास विरोध करत होते. त्याऐवजी तेथे रुग्णालय अथवा शाळा-महाविद्यालय बांधण्याचे फुकाचे डोस देण्याचे काम हे भाडोत्री बुद्धीहीनवादी करत होते. अशा सर्व प्रकारे मंदिर संस्कृती नष्ट करण्याचे षड्यंत्र भारतात केले जात आहे. सनातन धर्माचे पाईक असणार्या आपल्या खांद्यावर या मंदिर संस्कृतीचे रक्षण करण्याचे दायित्व आहे.
३. मंदिर संस्कृती रक्षणार्थ हिंदूंनी करावयाचे प्रयत्न
आपण प्रत्येक जण काही ना काही प्रयत्न करत आहोत; पण आपण सर्वांनी ठरवून संघटितपणे प्रयत्न केले, तर आपल्या मंदिर संस्कृतीला लक्ष करणार्यांना नक्कीच आपण थोपवू शकू.
३ अ. हिंदूंनी सामूहिक उपासनेसाठी मंदिरात एकत्र येणे, तसेच मंदिरात हिंदूहितार्थ उपक्रम घेणे आवश्यक ! : हिंदूंना मंदिरांतून जे चैतन्य मिळते, त्याद्वारे ते धर्माचे कार्य उत्साहाने करू शकतात. मंदिरे हिंदूंचे प्रभावी संघटन करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. धार्मिक स्थळांमधून कशा प्रकारे फतवे देऊन देशविरोधी कृती केल्या जात आहेत, हे आपण सर्वांनी पाहिले आहेच. या वर्षी सत्तेत कुणाला बसवायचे ? यासाठीची देशव्यापी योजना धार्मिक स्थळांमधून कार्यान्वित करण्यात आली होती. आपल्या मंदिरांमध्येही प्रचंड सामर्थ्य आहे. वर्ष २०१२ मध्ये, म्हणजे १२ वर्षांपूर्वी १०० हिंदूंना सोबत घेऊन चालू झालेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशन या चळवळीने आज वैश्विक रूप धारण केले आहे. या चळवळीचा आरंभ गोव्यातील रामनाथ मंदिरातच झाला आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे आपण सर्व हिंदुत्वनिष्ठांनी आपापल्या भागात आपल्या संघटनेच्या उपक्रमांच्या बैठका, कार्यक्रम, मोहिमा इत्यादी मंदिरांमध्ये आयोजित करण्याचा प्रयत्न करूया. कोणत्याही कार्यक्रमाचा आरंभ स्थानिक मंदिरात जाऊन देवतेला प्रार्थना करून करूया, तसेच मंदिरात सामूहिक उपासना करण्यावर भर देऊया. तसे उपक्रम आपल्या भागात चालू करता येतील का ?, ते पाहूया. जसे सामूहिक आरती करणे, सामूहिक हनुमान चालिसा म्हणणे इत्यादी उपक्रम आपण साप्ताहिक पद्धतीने चालू करू शकतो. अनेक ठिकाणी आज असे उपक्रम चालू आहेत आणि त्याला हिंदूंचा प्रतिसादही उत्तम मिळत आहे. महाराष्ट्रातील सिल्लोड येथे शेकडो गावांत हिंदु राष्ट्र अभियानाच्या माध्यमातून सामूहिक हनुमान चालीसा घेण्यात येते, उदा. प्रत्येक शनिवारी संध्याकाळी ७ वाजता ९ मिनिटांसाठी तेथे शेकडो मुले हनुमान मंदिरात जमतात. या उपक्रमांतून संघटनेतील कार्यकर्त्यांची सामूहिक उपासना होऊन देवतेची कृपाही मिळेल आणि मंदिर संस्कृती बळकट होण्यास साहाय्य मिळेल.
हिंदु जनजागृती समितीने मागील काही वर्षे वार्षिक उपक्रमात मंदिराशी संबंधित उपक्रम आयोजित केले. उदा. हिंदु नववर्ष असतांना सामूहिक गुढी उभारण्याचे नियोजन करणे. या वर्षी समितीच्या माध्यमातून ३५० हून अधिक ठिकाणी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी गदापूजन उपक्रम आयोजित करण्यात येतो. यावर्षी ८०० हून अधिक ठिकाणी गदापूजन पार पडले. यात सहस्र्रो हिंदु बांधव संघटितपणे सहभागी झाले. अशा उपक्रमांचे आयोजनही आपण करू शकतो.
३ आ. मंदिर स्वच्छता उपक्रम : आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम घेत असतो. त्यालाच जोडून जर आपण मंदिर स्वच्छता हा उपक्रम घेतला, तर त्याला चांगला प्रतिसाद मिळतो, तसेच मंदिरांची स्वच्छता होऊन त्याचे पावित्र्य वाढण्यास साहाय्य मिळेल. ‘हिंदु इकोसिस्टीम’च्या (यंत्रणेच्या) माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी अशी मंदिर स्वच्छता करण्याचे आवाहन केले जाते. याला अनेक राज्यांतून सामान्य हिंदूही चांगला प्रतिसाद देतात. आपणही अशा प्रकारे आपल्या राज्यात, जिल्ह्यात किंवा भागात असा मंदिर स्वच्छता उपक्रम करू शकतो.
३ इ. मंदिर संस्कृती रक्षणासाठी हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु संघटना यांनी करायचे प्रयत्न : आज हिंदूबहुल देशात अनधिकृत असलेल्या मशिदी, दर्गे यांचे रक्षण मुसलमान समाज प्राणपणाने करतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या मंदिरांच्या सुरक्षेचे दायित्व केवळ मंदिर विश्वस्तांचे नसून आपल्या हिंदूंचेही आहे. अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना ज्याप्रमाणे लव्ह जिहादपासून हिंदु युवतींचे रक्षण करतात, गोहत्येपासून गोमातेचे रक्षण करतात, धर्मांतरापासून हिंदु कुटुंबांचे रक्षण करतात. अगदी त्याचप्रमाणे मंदिरे आणि मंदिर संस्कृती यांचे रक्षण हा विषय हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या ‘अजेंड्या’वर (कार्यसूचीत) असला पाहिजे. अनेक मंदिरांची जागा अहिंदूंनी बळकावली आहे, तर अनेक ठिकाणी मंदिर विश्वस्त आणि भाविक यांना धर्मांध मारहाण करतात. याला आपण सर्वांनी विरोध करायला हवा. यासाठी आपल्या मंदिरावर आघात झाल्यास तात्काळ संघटित होऊन निवेदन देणे, सनदशीर मार्गाने आंदोलन करणे, पत्रकार परिषद घेणे, कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रार करणे, आवश्यकता पडल्यास न्यायालयात जाणे, या कृती आपल्याला येणार्या काळात कराव्या लागणार आहेत. यासाठी आम्हा हिंदुत्वनिष्ठांना मंदिर विश्वस्त, पुजारी, व्यवस्थापक यांच्या पाठीशी ढाल बनून उभे रहावे लागणार आहे.
३ ई. मंदिराच्या संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहिता (पारंपरिक पोषाख) लागू करणे, अहिंदूंची दुकाने नकोत, मंदिर परिसरात मद्य आणि मांस विक्रीला बंदी, अशी अभियाने राबवणे : मंदिर संस्कृती रक्षणाच्या अंतर्गत आपण विविध मोहिमा आपल्या भागात मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांना सोबत घेऊन करू शकतो. उदा. मागील वर्षी हिंदु जनजागृती समितीने महाराष्ट्र मंदिर महासंघाला सोबत घेऊन राज्यभर मंदिरात वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्याचे अभियान राबवले. याला मंदिर आणि भाविक यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘मी कोणते कपडे घालायचे हे तुम्ही सांगू नका ?’, असे सांगणार्या पुरोगामी आणि स्वैराचारी आवाजाला ‘मंदिरात येतांना सात्त्विक अन् अंगप्रदर्शन न करणारे कपडे घालूनच यावे लागेल’, या घोषणेने उत्तर दिले गेले. मंदिरे वस्त्रसंहितेची मोहीम राबवू शकली; कारण आपल्यासारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्यामागे भक्कमपणे उभ्या राहिल्या. येणार्या वर्षात या वस्त्रसंहितेच्या मोहिमेला आपण सर्व जण मिळून व्यापक स्वरूप देऊया. यासोबतच मंदिरांच्या आवारात किंवा जवळ अहिंदूंची दुकाने नकोत ! जे आपल्या देवाला मानत नाहीत, त्यांना मंदिर क्षेत्रात व्यवसाय करण्यास अनुमती देऊ नये, तसेच मंदिराच्या जवळपास मद्य आणि मांस यांची दुकाने मुळीच नकोत. याविषयी सर्व हिंदुत्वनिष्ठांनी आपापल्या भागात आवाज उठवायला हवा. मद्य आणि मांस विक्रीच्या दुकानांमुळे मंदिर परिसराचे पावित्र्य भंग होते. त्यामुळे आपणा सर्वांना एकत्रितपणे मंदिर संस्कृती रक्षणासाठी शासनाकडे संघटितपणे ही मागणी करावीच लागेल.
४. आवाहन
आपण एक महत्त्वाचे लक्षात घायला पाहिजे आणि ते म्हणजे सनातन हिंदु धर्मात मंदिरे ही केवळ वैयक्तिक मनःशांती मिळवण्यासाठी बांधली जात नाहीत, तसेच मंदिरे उत्पन्न मिळवण्याच्या भौतिक उद्देशाने, तर नाहीच नाही. आपला इतिहास साक्षी आहे, ‘दक्षिणेत आज धनुष्यकोडीजवळ श्रीरामेश्वरम् स्थानापन्न झाले, ते रावणाच्या विनाशासाठी ! महाराष्ट्रात अशाच एका रायरेश्वराच्या मंदिरात देवाला साक्षी मानून मोगलांचे कर्दनकाळ असलेल्या छत्रपतींनी शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची घेतलेली शपथ प्रत्यक्षात आणली. समर्थ रामदासस्वामी यांनी महाराष्ट्रात स्थापन केलेले ११ मारुति हे मन, मेंदू आणि मनगट मजबूत असलेल्या मावळ्यांची सेना बनवण्यासाठी होते. एवढेच काय, तर भारत-पाक युद्धात पाकिस्तानने डागलेल्या ३०० बाँबगोळ्यांपासून तेथे स्थापित तनोटमातेने रक्षण केले’. यावरून हिंदु मंदिर-संस्कृती राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अनमोल आहे अन् म्हणून देवाने दिलेल्या या देहात अखेरचा श्वास असेपर्यंत मंदिर संस्कृतीचे रक्षण करूया. मंदिर संस्कृतीचे रक्षण केल्याने सर्व देवतांची कृपा आपल्यावर होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य तो आपल्या माध्यमातून करून घेईल, ही निश्चिती बाळगूया !
– श्री. सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ.