Prayagraj Kumbh Parva 2025 : घाणेरड्या पाण्यात धुतलेले पनीर आणि मिठाई यांची भाविकांना विक्री !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

  • महाकुंभमेळ्यातील विक्रेत्यांकडून भाविकांच्या आरोग्याशी खेळ !

  • अन्न आणि औषध प्रशासनाचे दुर्लक्ष !

  • संबंधित दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून त्यांची हकालपट्टी करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रयागराज – प्रयागराज येथे पनीर आणि मिठाई यांची विक्री करणारे ३-४ विक्रेते घाणीच्या पाण्यात पनीर आणि मिठाई धुवून त्यांची भाविकांना विक्री करत असल्याची गोष्ट हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी त्या विक्रेत्यांना सदरची मिठाईची विक्री करण्यास प्रतिबंध केला, तसेच त्यांच्याकडून झालेल्या चुकीची त्यांना जाणीव करून दिली. महाकुंभपर्वात ठिकठिकाणी मिठाई किंवा अन्य खाद्यपदार्थ यांची सर्रासपणे चुकीच्या पद्धतीने विक्री करणार्‍या संबंधित विक्रेत्यांचा अन्न आणि औषध प्रशासनाने शोध घेऊन दंड अथवा त्या विक्रेत्यांना मेळ्यातून हाकलून देण्याची कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्री. सुनील घनवट यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना केली.

श्री. सुनील घनवट म्हणाले की,

१. प्रयागराज महाकुंभमेळ्यात अशा प्रकारच्या घटना अतिशय गंभीर आहेत; कारण यामुळे लाखो भक्तांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खराब पाण्यात मिठाई धुवून विक्री करणे हे अनैतिकच नाही, तर आरोग्यासाठीही धोकादायक आहे.

२. अन्न आणि औषध प्रशासनाने महाकुंभमेळ्यातील सर्व उपाहारगृह आणि हातगाडी यांवरील अन्नाच्या गुणवत्तेची नियमित पडताळणी करावी. अन्न आणि पाणी यांचे नमुने नियमितपणे पडताळले जावे.

३. केवळ नोंदणीकृत आणि प्रमाणित विक्रेत्यांनाच मेळ्यात खाद्यपदार्थांची विक्री करण्याची अनुमती द्यावी. अनधिकृत विक्रेत्यांना त्वरित थांबवावे. भाविकांनी योग्य ती काळजी घेऊन खाद्यपदार्थ विकत घेण्याविषयी जनजागृती करावी.

४. अशा घटनांविषयी प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी, तसेच प्रशासनाने यावर त्वरित पाऊले उचलून मेळ्यात भक्तांच्या आरोग्याचे रक्षण करावे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर नियम लागू करावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

महाकुंभमेळ्यात विक्रेत्यांकडून असे प्रकार होत असतांना अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी काय करत आहेत ? त्यांना या प्रकारांची माहिती कशी मिळत नाही ? विक्रेत्यांकडून विक्री केलेल्या खाद्यपदार्थांची अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकार्‍यांनी वेळोवेळी पडताळणी करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे. असे असतांना याकडे दुर्लक्ष होऊ नये, असेच जनतेला वाटते !