वाराणसी (उत्तरप्रदेश) – भाद्रपद कृष्ण अष्टमीला भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव संपूर्ण विश्वामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. भगवान श्रीकृष्णाच्या प्रती भाव वाढवण्यासाठी आणि त्याच्याविषयी धर्मशास्त्राचे ज्ञान समाजाला मिळावे, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी वाराणसी, गोरखपूर आणि जौनपूर येथे एकूण ६ ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा सामूहिक नामजप करण्यात आला. अयोध्या, भदोही आणि कानपूर येथे ‘श्रीकृष्णाच्या पूजनाचे शास्त्र अन् त्याची लीला’ यांविषयी प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. यासमवेतच सैदपूर आणि भदोही येथे सनातननिर्मित विविध ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले. या सर्व उपक्रमांना समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बिहारमधील मुझफ्फरपूर आणि समस्तीपूर येथे विविध उपक्रमांचे आयोजन
श्रीकृष्णाजन्माष्टमीच्या निमित्ताने बिहारमधील समस्तीपूर येथे २ ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा सामूहिक नामजप करण्यात आला. मुझफ्फरपूर आणि समस्तीपूर येथे ‘भगवान श्रीकृष्णाच्या पूजनाचे शास्त्र आणि लीला’ यांविषयी प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. यासमवेतच सनातननिर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. ‘अशा आयोजनांच्या माध्यमातून शास्त्र समजून घेऊन कृती केल्याने भगवान श्रीकृष्णाच्या प्रती भाव वाढला’, असे मत भाविकांनी व्यक्त केले.