ऋषीजगताचे अनन्यसाधारण महत्त्व आणि माहिती !

आज ‘ऋषिपंचमी’ आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

आज ऋषिपंचमी आहे. हिंदु धर्मानुसार मनुष्यजन्मातील ४ ऋणांपैकी ऋषिऋण हे एक महत्त्वाचे ऋण समजले जाते. त्या निमित्ताने ऋषींविषयी माहिती, कार्य आणि त्यांचे महत्त्व समजून घेऊया. हा लेख वाचून वाचकांच्या मनात आपल्या थोर ऋषी परंपरेविषयी कृतज्ञता वाटून साधना करण्यासाठी स्फूर्ती मिळो, हीच सद्गुरुचरणी प्रार्थना !

१. ऋषींचे महत्त्व

ऋषि म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर येते, ते भगवे कपडे परिधान केलेले, जटा-भस्म धारण केलेले आणि पांढरी शुभ्र दाढी-मिशी असणारे तेजस्वी व्यक्तीमत्त्व ! हिंदु धर्मात असणारे ज्ञान संशोधन करून मनुष्यापर्यंत पोचवण्याचे महान कार्य या ऋषींनी केलेले आहे. एका अर्थी ते त्या त्या काळातील महान शास्त्रज्ञ होते. आजच्या काळातही असे अनेक ऋषिमुनी सूक्ष्म रूपांमध्ये कार्यरत आहेत. स्कंदपुराणात उल्लेख केल्याप्रमाणे ही दैवी व्यक्तीमत्त्वे कलियुगातील आरंभीच्या २ सहस्र ५०० वर्षापर्यंत सदेह दर्शन देत असत. पुढे मनुष्याची बुद्धी आणि सात्त्विकता न्यून होत गेली, तसे देवता अन् ऋषी यांचे समष्टी दर्शन देणे बंद झाले.

२. ऋषींचे ७ मूलभूत प्रकार

अ. ब्रह्मर्षि : ब्रह्म जाणणारे किंवा ब्राह्मण ऋषि. उदा. कश्यप, वसिष्ठ, भृगू, अंगिरस, अत्री ऋषि इत्यादी.

आ. देवर्षी : देव जातीचे ऋषि. उदाहरणार्थ धर्म, पुलस्त्य, क्रतू, पुलह, नर-नारायण, वालखिल्या, नारद इत्यादी.

इ. महर्षि : श्रेष्ठ ऋषि. स्पष्ट विभाग नाही; परंतु उच्च दर्जाच्या ऋषींना उद्देशून वापरला जातो.

श्री. संजोग टिळक

ई. परमर्षी : अव्यक्त तत्त्वाचे यथार्थ ज्ञान असलेले. उदा. महर्षि, ऋषि इत्यादी

उ. कांडर्षी : धर्मशास्त्र, पूर्वोत्तर मीमांसा, व्याकरण, न्याय, धनुर्विद्या इत्यादी शास्त्रे प्रवृत्त करणारे. उदाहरणार्थ जैमिनी, व्यास, शांडिल्य, प्रजापती सोम, अग्नी इत्यादी.

ऊ. श्रुतर्षी : अन्य ऋषींपासून विद्याग्रहण करून ऋषिपदास पोचलेले. उदाहरणार्थ ‘आयुर्वेदा’च्या ग्रंथांचे प्रणेते सुश्रुत आदी.

ए. राजर्षी : क्षत्रिय जातीचे अथवा प्रजानुरंजनामुळे ऋषित्वाला प्राप्त झालेले. उदाहरणार्थ ऋतुपर्ण, इक्ष्वाकू, नाभाग इत्यादी.

विश्वामित्रऋषि कठोर तपश्चर्येने राजर्षी पदास प्राप्त झाले. पुढे अधिक साधनेने त्यांचा अहं (मी ‘परब्रह्मा’पासून निराळा आहे, ही जीवाची जाणीव) पूर्ण गळून पडला, तेव्हा वसिष्ठऋषींनी त्यांना ‘ब्रह्मर्षी’ असे संबोधले. हे एक विलक्षण उदाहरण आहे. यातून साधनेत अहं निर्मूलन किती महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व लक्षात येते.

३. ऋषींचे अन्य प्रकार

बौधायनादिकांनी ‘ऋषितर्पणा’मध्ये वरील ७ प्रकारांसह जनर्षी, तपर्षी आणि सत्यर्षी असे ३ अधिक प्रकार दिले आहेत. ‘वायुपुराण’, ‘ब्रह्मांडपुराण’, ‘वमत्स्यपुराण’ यांमध्ये ऋषींचे मूलभूत ५ प्रकार खालीलप्रमाणे सांगितले आहेत. 

अ. परमर्षी : ‘अव्यक्त’ या परतत्त्वाचे यथार्थ ज्ञान असलेले. परमर्षी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र.

आ. महर्षि : ‘महत्’ तत्त्वाचे यथार्थ ज्ञान असलेले. परमर्षीऋषींचे पुत्र महर्षि.

इ. ऋषि : ‘अहंकार’ तत्त्वाचे यथार्थ ज्ञान असलेले. महर्षिऋषींचे औरसपुत्र ऋषी. परमर्षी हे ऋषिरूपानेच जन्माला आले. महर्षि आणि ऋषि हे तपश्चर्येने ऋषि झाले.

ई. ऋषिक : तन्मात्र तत्त्वाचे यथार्थ ज्ञान असलेले. ऋषींचे औरसपुत्र ऋषीक. ऋषीक हे सत्याने ऋषित्व पावले.

उ. श्रुतर्षी : पंचमहाभूतांचे तत्त्ववेत्ते. ऋषीकांचे औरसपुत्र श्रुतर्षी. श्रुतर्षी हे विद्याश्रवणाने ऋषित्वाला प्राप्त झाले.

४. ऋषींचे ३ स्वतंत्र प्रकार

‘वायुपुराण’ अन् ‘ब्रह्मांडपुराण’ यांमध्ये ब्रह्मर्षी, देवर्षी आणि राजर्षी असेही ३ स्वतंत्र प्रकार केले आहेत. सनक, सनंद, सनातन, आसुरी, कपिल, वोढू अन् पंचशिला हे ७ ब्रह्मपुत्र ऋषींमध्ये त्यांचा समावेश आहे. तर्पणीय पितरांमध्ये सुमंतू, जैमिनी वैशंपायन, गौतम, शाकल्य, ऐतरेय, आश्वालायन, शौनाक आदी अनेक ऋषींचा समावेश आहे.

५. सप्तर्षी

ऋषिसंस्थेच्या पोटात ‘सप्तर्षी’ ही संस्था आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग असे ४३ लाख २० सहस्र वर्षांचे एक महायुग असते. अशा ७१ महायुगांचे एक मन्वंतर असते. प्रत्येक मन्वंतरात मनु, इंद्र, सप्तर्षी भिन्न भिन्न असतात. मन्वंतरारंभी प्रजोत्पादन आणि धर्मस्थापना ही कार्ये मुख्यतः त्यांच्याकडेच असतात. सप्तर्षींच्या नावांविषयी मत्स्य, मार्कंडेय इत्यादी पुराणांमध्ये मतभेद आहेत. १४ मन्वंतरे आणि त्यांतील भिन्न भिन्न सप्तर्षींचे गण पुढीलप्रमाणे आहेत. सध्या हे ७ वे मन्वंतर चालू आहे.

६. विविध सप्तर्षींचे गण

अ. स्वायंभभुव : मरीती, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतू, वसिष्ठ.

आ. स्वारोचिष : दत्त, निश्च्यवन, स्तंब, प्राण, कश्यप, और्व, बृहस्पती.

इ. उत्तम : कौकरुंडी, दाल्भ्य, शंग, प्रवहण, शिव, सित, सस्मित.

ई. तामस : कवी, पृथू, अग्नी, अकपी, कपी, जल्प, धीमान.

उ. रैवत : देवबाहू, सबाहू, पर्जन्य, सोमप, मुनी, हिरण्यरोमा, सप्ताश्व.

ऊ. चाक्षुष : भृगू, सुधामा, विरज्ज्स्, सहिष्णू, नाद, विविस्वान्, अतिनामा.

ए. वैवस्वत : अत्री, वसिष्ठ, कश्यप, गौतम, भरद्वाज, विश्वामित्र, जमदग्नि.

ऐ. सावर्णी : अश्वत्थामा, शरद्वान, कौशिक, गालव, शतानंद, काश्यप, परशुराम.

ओ. दक्षसावर्णी : मेधातिथी, वसू, सत्य, ज्योतिष्मान्, द्युतिमान्, सबल, हव्यवाहन.

औ. ब्रह्मसावर्णी : आपोमूर्ती, हविष्मान्, सुकृती, सत्य, नाभाग, अप्रतिम, वसिष्ठ.

अं. धर्मसावर्णी : हविष्मान् वरिष्ठ, ऋष्टी, आरुणी, निश्चर, अनघ, विष्टी, अग्नितेजस.

क. रुद्रसावर्णी : द्युती, तपस्वी, सुतपस्, तपोमूर्ती, तपोनिधी, तपोरती, तपोधृती.

ख. देवसावर्णी (रौच्य) : धृतिमान्, अव्यय, तत्त्वदर्शी, निरुत्सुक, निर्मोह, सुतपस्, निष्प्रकंप.

ग. इंद्रसावर्णी (भौत्य) : आग्नीध्र, अग्निबाहू, शुची, मुक्त, माधव, शुक्र, अजित.

७. ऋषींचे मूलभूत प्रकार

अ. प्रजापती ऋषि : ब्रह्मदेव स्वतः आणि त्यांनी प्रजाविस्तार करण्यासाठी जे ऋषि उत्पन्न केले, ते प्रजापतिरूप ऋषि होय. ‘महाभारत’ ग्रंथानुसार ब्रह्मा, स्थाणू, मनू, दक्ष, भृगू, धर्म, तपस, दम, मरीची, अंगिरस, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतू, वसिष्ठ, परमेष्ठी, विवस्वान, सोम, कर्दम, क्रोध आणि विक्रीत असे २१ प्रजापती आहेत. विविध पुराणांत ७, १०, १२, १३, १४ अशी प्रजापतींची संख्या आढळते.

आ. गोत्रर्षी : ऋषींपासून मानववंशातील ज्या अनेक कुलशाखा प्रवृत्त झाल्या, त्या कुलशाखाप्रवर्तक ऋषींना ‘गोत्रर्षी’ म्हणतात. विश्वामित्र, जमदग्नि, भारद्वाज, गौतम, अत्री, वसिष्ठ, कश्यप आणि अगस्त्य या ८ ऋषींनी प्रवृत्त केलेल्या कुलांमध्ये असंख्य गोत्रसंज्ञक ऋषि उत्पन्न झाले. त्यांपैकी काही ऋषींची नामनिर्देशपूर्वक गणना बौधायनादी सूत्रकार आणि पुराण यांनी उदाहरणादाखल केली आहे. बौधायनाने प्रवरानुसार ४९ गण आणि ८३५ गोत्रर्षींची गणना केली आहे. इतर सूत्रकारांनी गण आणि गोत्र यांची न्यूनाधिक संख्या सांगितली आहे. गोत्रसंज्ञक ऋषींपैकीच ज्यांचा यज्ञामध्ये अग्निवरणाच्या वेळी उल्लेख केला जातो, त्या ऋषींना ‘प्रवरर्षी’ म्हणतात.

इ. वैदिक ऋषि : वेदांच्या मंत्र-ब्राह्मणादी भागांचा प्रवर्तन आणि प्रसार ज्या ऋषींनी केला, ते वैदिक ऋषि होय. वेदांचे अपौरुषेयत्व मानणार्‍या प्राचीन शास्त्रवेत्त्यांच्या मते ऋषींना परमेश्वराने वेद प्रथम दिले. ‘स्वयंभू ब्रह्म म्हणजे वेद. त्यांचे ज्यांना ज्ञान झाले, ते ऋषि झाले. वेदांचे ज्ञान हेच ऋषींचे ऋषित्व आहे’, असे ‘असेतैत्तिरीय आरण्याका’त म्हटले आहे. ‘सर्वच ऋषींना मंत्रादी वेदभागाचे स्फुरणात्मक ज्ञान झाले आणि तेच त्यांचे ऋषित्व आहे’, असे काही निबंधकारांनी म्हटले आहे; परंतु ते ‘गोत्रर्षी’, ‘मंत्रांचे ऋषि’ इत्यादी संदर्भांपुरतेच मर्यादित आहे, असे मानले पाहिजे; कारण श्रुतर्षी आणि इतर अनेक ऋषि मंत्रद्रष्टे नव्हते, हे स्पष्ट आहे. ऋषींचा वेदांशी असलेला ज्ञानात्मक संबंध, हा ‘दर्शन (प्राथमिक स्फुरण)’ आणि ‘स्मरण’ असा दोन प्रकारचा आहे.

‘सर्वानुक्रमणी’ ग्रंथामध्ये सांगितलेले मंत्रांचे ऋषि प्रायः मंत्रद्रष्टे आहेत. पूर्वऋषिदृष्ट वेदभागांच्या स्मरणाने त्यांचा संप्रदाय चालू करणार्‍या अथवा वेदार्थांचे स्वशब्दांनी निबंधन करणार्‍या श्रुतिर्षींचा वेदांशी स्मरणात्मक संबंध आहे. उदाहरणार्थ ‘शाकलसंहिते’चा स्मर्ताऋषि शाकल आणि त्या संहितेत येणार्‍या त्या त्या सूक्तांचे वसिष्ठ, वामदेव, विश्वामित्र इत्यादी ऋषि द्रष्टे आहेत. कात्यायनाने ‘सर्वानुक्रमणी’त द्रष्टे’ आणि ‘स्मर्ते’ असे दोन प्रकार केले आहेत.

‘मत्स्यादी पुराणां’मध्ये ‘ईश्वर (परमर्षी), ऋषि आणि ऋषिक हे मंत्रकृत आहेत’, असे म्हटले आहे. ‘सर्वानुक्रमणी’त अनेक मंत्रांचे इंद्र, पुरूरवस्, अदिती, अगस्त्यस्वसा, इंद्रस्नुषा, उर्वशी इत्यादी देवता, राजे आणि स्त्रिया हे ऋषि सांगितले आहेत. ‘सर्वानुक्रमणी’काराने ‘मंत्रात्मक वाक्यांचा जो वक्ता तो ऋषि आणि ज्याला उद्देशून ते वाक्य उच्चारले असेल ती देवता’, असे म्हटले आहे.

कात्यायनाच्या ‘सर्वानुक्रमणी’त गोधा, घोषा, विश्ववारा, अपाला, उपनिषद, निषद, जुहूर्नामा ब्रह्मजाया, अगस्त्यस्वसा, अदिती, इंद्राणी, इंद्रमाता, सरमा, रोमशा, उर्वशी, लोपामुद्रा, नदी, यमी, नारी, शश्वती, श्री, लाक्षा, सार्पराज्ञी, वाक्, श्रद्धा, मेधा, दक्षिणा, रात्री, सूर्या आणि सावित्री या २९ स्त्रिया ‘ब्रह्मवादिनी’ म्हणून सांगितल्या आहेत.

या ब्रह्मवादिनी स्त्रिया या उर्ध्वरेतस (ब्रह्मचर्याचे कठोर पालन करणार्‍या) होत्या; म्हणून त्यांचे उपनयन झाले होते. अन्यथा स्त्रियांसाठी उपनयन, म्हणजे त्यांचा विवाह होय. स्त्री-पुरुष एकत्र येऊन निर्माण झालेल्या कामज संततीला धर्मशास्त्र फार महत्त्व देत नाही. त्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णांमध्ये पुरुष बालकाची अनुक्रमे ८ व्या, १२ व्या आणि १६ व्या वर्षी उपनयन करून त्याला द्विजत्व दिले जाते. येथे त्याचा दुसरा जन्म होतो आणि त्यास गुरूंचे अन् सांप्रत काळी पिता गुरु उपदेश करत असल्याने पित्याचे गोत्र लाभते. तेव्हा खर्‍या अर्थाने बालक सगोत्री होतो. येथे पुन्हा गोत्र प्रवर्तक ऋषींचे महत्त्व अधोरेखित होते.

८. ऋषिचर्या

तपश्चर्या आणि ज्ञानप्रसार हे ऋषींचे सर्वप्रमुख लक्षण सर्वत्र वर्णिले आहे. शरीर, वाणी आणि मन यांच्या ठिकाणी असलेले दोष नष्ट करण्यासाठी शास्त्रविहित विशिष्ट कठोर कर्मे आचरणे, हा ‘तपः’ शब्दाचा सर्वमान्य अर्थ आहे. ती तपोरूप कर्मे कृच्छ्र, अतिकृच्छ्र, तप्तकृच्छ्र, सांतपन, चांद्रायण, पंचाग्निसाधन, वाताशन, शीर्णपर्णाशन इत्यादी अनेक प्रकारची आहेत. अर्वाचीन काळात तपश्चर्येचा र्‍हास झाल्यामुळे ऋषि उत्पन्न होत नाहीत. पूर्वजन्मातील तपश्चर्येमुळे अर्वाचीन काळातही काही ऋतुर्षी उत्पन्न होऊ शकतात, असे ‘आपस्तंबधर्मसूत्रा’त लिहिले आहे.

उपवासपूर्वक वेदपारायणे ऋषि करत असत, असे बौधायनधर्मसूत्रात सांगितले आहे. शिक्षादी ६ वेदांगे, न्यायवैशेषिक इत्यादी ६ शास्त्रे, आयुर्वेद, धनुर्वेद, संगीतशास्त्र, वास्तुशास्त्र, स्मृति, धर्मसूत्रे, कारिका, पुराणे, इतिहास, भाष्ये, वार्तिके इत्यादी सर्व ज्ञानभंडार ‘आर्ष’, म्हणजे ऋषिप्रणीत आहेत.

ऋषींचे संध्यावंदन दीर्घकाळ चाले. ‘दीर्घकाळ संध्या करण्यामुळे ऋषींना दीर्घायुष्य, प्रज्ञा, यश, कीर्ती आणि ब्रह्मवर्चस प्राप्त झाले’, असे मनु म्हणतात. यज्ञादी कर्मांचे अनुष्ठानही ऋषी करत असत. ऋषींनी सत्रे केल्याचे उल्लेख ब्राह्मणादी अनेक ग्रंथांत आहेत. चांद्रायणाने आत्मशोधन करून ऋषींनी कर्मे केली, असे विधान बौधायनधर्मसूत्रात आहे. निरनिराळ्या मंत्रांचा जप करणे, हाही एक ऋषिचर्येचा भाग होता. ‘श्रीरामाय नमः’ या षडाक्षर मंत्राचा जप केल्यामुळे ऋषि मुक्त झाले’, असे वर्णन ‘वृद्धहारीतस्मृती’त आहे.

आत्मगुणांचा उत्कर्ष करणारे म्हणून पौरोहित्य गर्ह्य समजले जाते, तेही वसिष्ठ, शतानंद, धौम्य इत्यादी अनेक ऋषींनी केले. ‘सूर्यकुळात तू (परमेश्वर) अवतार घेणार असल्याचे समजल्यावरून तुझा सहवास घडावा; म्हणून हे गर्ह्य जीवन (पौरोहित्य) मी पत्करले’, असे अध्यात्म रामायणात महर्षि वसिष्ठांनी श्रीरामाला सांगितले आहे.

९. ऋषींचे निवास, भोजन आणि नित्यकर्म

ऋषींचा निवास वनांमध्ये असे. त्या वनांना ‘तपोवने’ म्हणत. तपोवनात ऋषींच्या अनेक वसत्या असत. त्यांना ‘आश्रम’ असे नाव असे. ऋषींच्या निवासासाठी आश्रमात पर्णकुटी, तसेच फळे, फुले आणि छाया देणारे वृक्ष असत. ‘आश्रमामध्ये तपश्चर्येसाठी ‘पंचवटी’ सिद्ध करावी’, असा विधी आहे. नाशिकजवळील पंचवटी आश्रमाचा इतिहास प्रसिद्ध आहे. ‘बसण्यासाठी मध्ये ४ हात लांबी X रुंदीचा कट्टा सिद्ध करून त्यांच्या भोवतालच्या पूर्व, उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय या दिशांना अनुक्रमे पिंपळ, बेल, वड, आवळी आणि अशोक हे वृक्ष लावावेत अन् प्रत्येक ५ वर्षांनी या पंचवटीची विधीपूर्वक प्रतिष्ठा करावी’, असे पंचवटीचे विधान आहे. पंचवटीत केलेल्या तपश्चर्येचे फळ अधिक मिळते. श्रीरामपूरजवळील वडाळा महादेव येथे ब्रह्मीभूत महायोगी प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचा आश्रम आहे. तेथे अशी पंचकुटी आजही अस्तित्वात आहे.

या प्रत्येक आश्रमात प्रायः एकेक कुलपती असे. १० सहस्र विद्यार्थ्यांची अन्नवस्त्रादिकांच्या योगे पोषणाचे दायित्व स्वीकारून त्यांना अध्यापन करणार्‍या ऋषीला ‘कुलपती’ म्हणत असत. ऋषींचे जीवन शीलवृत्तीने अथवा कंदमुळे, फळे आणि अकृष्टपच्य म्हणजे शेतात न पिकवलेले, वनात आपोआप उत्पन्न झालेले धान्य, यांच्या योगे होत असे. ऋषींच्या ठिकाणी त्रिकालज्ञता, इंद्रियनिग्रह, सत्य, निग्रहानुग्रह सामर्थ्य, वैराग्य, संतोष, दया इत्यादी गुण होते. ऋषींना सहस्रो वर्षे आयुष्य असण्यासंदर्भाचे उल्लेख आहेत.

सप्तर्षींचा कार्यभाग संपूर्ण मन्वंतरापर्यंत असतो. ‘पाणिनीसूत्रा’त पुराण (प्राचीन) आणि अर्वाचीन असे ऋषींचे २ वर्ग केलेले आहेत.

१०. ऋषींच्या दृष्टीने स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व

अशा या धर्मनिष्ठ आणि धर्मोपदेशक ऋषींकडून क्रोधादी दोषांच्या अधीन झाल्यामुळे अधर्माचरण घडत असे. त्यामुळे ‘तैत्तिरीय शिक्षण’ अध्यायात ‘आमच्या सदाचारांचेच अनुकरण करावे, दुराचारांचे करू नये’, असा उपदेश गुरूंनी शिष्यांना केला आहे. ‘ऋषींचे शरीर आणि इंद्रिये तपोबलाने तेजोमय झाली असल्यामुळे अधर्माचरणजन्य दोष त्यांना लागत नाही; म्हणून तपोबल नसलेल्या आधुनिकाने ऋषींच्या उदाहरणाने अधर्माचरण करू नये’, असे स्मृतिकार सांगतात. सध्याच्या काळात सनातन संस्थेला होत असलेले सप्तर्षींचे मार्गदर्शन हे म्हणूनच विलक्षण आहे. आपणही या कार्यात आपल्या क्षमतेनुसार योगदान देऊन ऋषींची कृपा संपादन करूया !

(टीप : या लेखासाठी गोविंदशास्त्री केळकर यांच्या मूळ लेखाचा आधार घेण्यात आला आहे.)

संकलन : श्री. संजोग टिळक, पुणे.