Sadhvi Ritambhara : श्रीराममंदिरानंतर भारतातील प्रत्येक गावात भगवा फडकावणे, हे उद्दिष्ट ! – साध्वी ऋतंभरा

महाकुंभनगरीत साध्वी ऋतंभरा यांनी जागवले क्षात्रतेज !

साध्वी ऋतंभरा

प्रयागराज, १९ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभमेळ्यात अनेक संप्रदाय आहेत. कुणी महाप्रसाद वाटत आहे, कुणी साहित्य वाटत आहे, कुणी प्रवचने-कथा यांद्वारे ज्ञानामृत वाटत आहे. हे सर्व आवश्यक आहे; मात्र सध्या हिंदु समाजाला शौर्यवाटप करणे आवश्यक आहे. शौर्यासाठी धैर्य आवश्यक असते. शौर्य-धैर्य असेल, तर अनुकुलतेत आणि प्रतिकुलतेतही स्थिर रहाता येते. हेच शौर्य आणि लक्ष्य बाळगून प्रयत्न केल्यामुळे श्रीराममंदिर पूर्ण झाले. महिला, मुली यांच्यात श्री दुर्गादेवीचे तत्त्व आहे. त्यामुळे श्रीराममंदिरानंतर आता भारतातील प्रत्येक गावात भगवा फडकावण्याचे उद्दिष्ट घ्यावे, असे उद्गार साध्वी ऋतंभरा यांनी विश्व हिंदु परिषदेच्या मंडपात काढले.

साध्वी ऋतंभरा यांचा सत्कार करतांना दुर्गावाहिनी संघटनेच्या पदाधिकारी

महाकुंभनगरीत सेक्टर १८ येथील विश्व हिंदु परिषदेच्या मंडपात ‘दुर्गावाहिनी’च्या मिरत आणि लखनऊ येथील शाखांच्या शक्ती समागम कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर दुर्गावाहिनीचे पदाधिकारी उपस्थित होते. साध्वी ऋतंभरा यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे ॲथीलेट पद्मश्री सुधा सिंह यांचा या वेळी दुर्गावाहिनीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सुधा सिंह यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला उपस्थित महिला आणि मुली

साध्वी ऋतंभरा त्यांच्या मार्गदर्शनात पुढे म्हणाल्या की, महिला-मुली यांनी घेतलेल्या उद्दिष्टपूर्तीविषयी स्वत:च्या मनात कोणतीही शंका आणू नये. ‘सौगंध मिट्टी की खाते है मंदिर वही बनायेंगे ।’ (मातीची शपथ घेऊन आम्ही सांगतो की, मंदिर तेथेच बनवणार) अशी घोषणा देऊन श्रीराममंदिराची निर्मिती ही कठीण वाटणारी गोष्ट साध्य झाली. श्रीरामाने ते कार्य आपल्याला निमित्तमात्र करून साध्य करून घेतले. त्याची वर्षपूर्ती आहे. महिलांमध्ये सामर्थ्य असते. त्या कोणत्याही परिस्थितीला अनुकूल करू शकतात. साधू-संत आणि अवतार यांना जन्म देणार्‍या महिलाच आहेत. शास्त्रे, धर्मग्रंथ यांची निर्मिती करणार्‍या जिवांची रचना महिलांनीच केली आहे. स्त्रीला तिच्या आचरणामुळेच प्रतिष्ठा प्राप्त होते. तीच स्त्री आता पतीत होत आहे, हे दुर्दैवी आहे. अपुरी वस्त्रे घालणार्‍या मुली-महिला यांचे प्रबोधन दुर्गावाहिनीच्या मुली-महिला यांनी करून त्यांना जाणीव करून द्यावी.