CM Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून कुंभक्षेत्राची हवाई पहाणी !

आतापर्यंत ८ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात केले स्नान !

प्रयागराज – महाकुंभाच्या ७ व्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हेलिकॉप्टरद्वारे महाकुंभमेळ्याची पहाणी करून महाकुंभ व्यवस्थेचा आढावा घेतला. २९ जानेवारी या दिवशी मौनी अमावास्येच्या दिवशी अंदाजे ८-१० कोटी भाविक स्नानासाठी येण्याची शक्यता आहे. २२ जानेवारी या दिवशी महाकुंभ येथे होणार्‍या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महाकुंभ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती यांच्या प्रस्तावित कार्यक्रमांवरही चर्चा केली जाणार आहे. १९ जानेवारी या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत ३१ लाख भाविकांनी त्रिवेणी संगम येथे स्नान केले. आतापर्यंत एकूण ८ कोटी लोकांनी स्नान केले आहे. गृहमंत्री अमित शाह २७ जानेवारी या दिवशी महाकुंभात सहभागी होणार आहेत.

महाकुंभातील महत्त्वाच्या घडामोडी

१. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या आखाड्यात बॉम्ब असल्याची अफवा !

१८ जानेवारी या दिवशी रात्री १० वाजता महाकुंभमध्ये शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या आखाड्यात बॉम्ब ठेवल्याची सर्वत्र अफवा पसरली. त्यामुळे महाकुंभ क्षेत्रात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोचला. आखाड्याची पडताळणी केल्यानंतर कोणतीही संशयित वस्तू आढळली नाही. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

२. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर हे प्रयागराज येथे पोचले आहेत. त्यांनी महाकुंभ सेक्टर १८ मधील जुना आखाडा येथील अवधेशानंद महाराज यांची भेट घेतली.

३. भव्यता आणि दिव्यतासह महाकुंभ होत आहे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘भव्यता आणि दिव्यतासह महाकुंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या दृष्टीकोनाची कार्यवाही करण्यासाठी पूर्ण वचनबद्धतेने सर्व जण काम करत आहेत. पौष पोर्णिमा आणि मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान झाले आहे. मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी या दिवशी अंदाजे १ कोटींहून अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे. ७ सहस्रांहून अधिक संस्था महाकुंभ येथे आल्या आहेत.आम्ही त्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी काम करत आहोत. मला विश्वास आहे की, आम्ही महाकुंभ यशस्वीपणे आयोजित करू.’’

श्री चिमटेवाले बाबांकडून यूट्यूबर पत्रकाराला मारहाण !

महाकुंभ येथे श्री चिमटेवाले बाबा यांनी एका यूट्यूबर पत्रकाराला मारहाण केली. महाकुंभ येथे जगातील अन्य देशांतून विविध प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आले आहेत. महाकुंभ येथे वृत्त घेण्यासाठी एक युट्यूबर श्री चिमटेवाले बाबा यांच्याकडे गेला होता. त्यांची मुलाखात घेत असतांना त्या पत्रकाराने बाबांना आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याने श्री चिमटेवाले बाबा क्रोधित होऊन त्यांनी यूट्यूबर पत्रकाराला मारहाण केली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.