आपल्याकडे पुरुष कपाळाला गंध आणि स्त्रिया कपाळाला हळद-कुंकू लावतात, त्यामागे असणारे शास्त्रीय कारण आज जाणून घेऊ.
आपला देश हा उष्ण कटिबंधात मोडतो. त्यामुळे हवेतील उष्णतेचा त्रास न्यून व्हावा, यासाठी थंड असणारे चंदन वापरण्याची पद्धत चालू झाली. दक्षिण भारतातील राज्ये जिथे अधिक उष्णता असते, तिथे ही पद्धत आपल्याला अधिक दिसून येते. हातावर, कपाळावर चंदनाचे पट्टे लावून अंगातील उष्णता न्यून केली जाते. काही देवळातील पुजारी तथा इतर सेवक चंदनाचे पट्टे कपाळावर, हातावर लावतांना आजही दिसतात; पण व्यावहारिक दृष्टीने उपाय म्हणून कपाळाला चंदन लावण्याची पद्धत रूढ झाली.
आपले योगशास्त्र सांगते की, भुवयांच्या मध्यभागी आज्ञाचक्र असते. त्याला ‘तिसरा डोळा’ असेही म्हटले जाते. हे चक्र अंतर्ज्ञान, आंतरिक शहाणपणाशी संबंधित आहे. त्यामुळे यातून ऊर्जा बाहेर पडू नये, यासाठी ते झाकून ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी त्यावर चंदन किंवा कुंकू लावून ते झाकले जाते. याखेरीज स्त्रियांनी किंवा सवाष्ण स्त्रीने हळद-कुंकू लावावे, असे सांगितले जाते किंवा अशी पद्धत आपल्याकडे आहे त्यामागे किती खोल विचार आहे, हे वाचून आश्चर्य वाटेल. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, हळद ही अतिशय औषधी आहे. तिचा उपयोग जखमेवर लावण्यासाठी केला जातो. सर्दी, खोकला यांवरही हळद उपयुक्त असते, तसेच कुंकू हे सर्पदंशावर, तसेच विंचवाचा दंश झाल्यास प्रथमोपचार म्हणून वापरता येऊ शकते. म्हणून हळद-कुंकू अशा कुठल्याही प्रसंगात आपल्या हाताशी असावे, यादृष्टीने ते प्रतिदिन वापरात अशा पद्धतीने ठेवले गेले. पूर्वी लग्न झालेल्या स्त्रिया सौभाग्याची खूण म्हणून मळवट भरत (कपाळभर आडवे कुंकू लावणे) किंवा मोठे कुंकू लावत. यामागचे कारण असेही असू शकते की, जर एखाद्या स्त्रीच्या पतीला सर्पदंश झाला किंवा विंचवाचा दंश झाला, तर पत्नी स्वतःच्या कपाळावरच्या कुंकवाचा उपयोग करून आपल्या पतीचा जीव वाचवू शकेल. (साभार : ‘रूढीमागचे विज्ञान’, लेखक : तन्मय केळकर आणि साप्ताहिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’)