रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय चुकीचा !
मंत्री भरत गोगावले यांचे मत
अलिबाग – रायगडच्या पालकमंत्रीपदाविषयी घेण्यात आलेला निर्णय मनाला न पटणारा आहे, असे मत राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादनमंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केले. ‘हे पालकमंत्रीपद मला मिळेल’, अशी अपेक्षा होती. या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गांजा साठवणारे तिघे अटकेत !
मुंबई – गांजाचा साठा असलेल्या तीन ठिकाणी मानखुर्द आणि देवनार पोलिसांनी धाड घालून ३ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ७ किलो गांजा जप्त केला आहे. राजू चौधरी (वय २५ वर्षे), इसाक शेख (वय ४८ वर्षे) आणि अब्दुल शेख (वय ३४ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.
संपादकीय भूमिका : अशांवर कठोर कारवाई करायला हवी !
नाशिक येथे ‘साधुग्रामनगरी’ वसणार !
नाशिक – येथे वर्ष २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. प्रत्येकी १२ वर्षांनी होणार्या कुंभमेळ्यातील साधू-महंतांच्या निवासासाठी येथे ‘साधुग्रामनगरी’ वसवण्यात येणार आहे. ४०० एकर क्षेत्रावर हे साधूग्राम उभारण्यात येणार असून त्यासाठी तपोवन परिसरातील सुमारे ३१८ एकर जागा निश्चित केली आहे. हा परिसर ‘ना विकास क्षेत्र’ असल्याने यातील ५४ एकर जागा महापालिकेने कायमस्वरूपी संपादित केली आहे. उर्वरित २६४ एकर भूमी शेतकर्यांकडून अधिग्रहित केली जाईल. ही भूमी कुंभमेळ्याच्या एक वर्षासाठी शेतकर्यांकडून भाडेतत्त्वावर घेतली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्देश देण्यात आले.
धारावीत बाँब असल्याचा दूरभाष निनावी !
मुंबई – धारावीत बाँब असल्याचा निनावी दूरभाष मुंबई पोलिसांना आला होता. धारावी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. शांतता भंग करण्यासाठी खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
बुलेट ट्रेन ताशी २५० कि.मी. वेगाने धावणार !
मुंबई – रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पातील समुद्राखालील बोगद्याच्या कामाची पहाणी केली. बुलेट ट्रेन प्रकल्पात वापरण्यात येणारे तंत्रज्ञान आणि बोगद्याचे बांधकाम पहाता ताशी २५० कि.मी. वेगाने बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले.