मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड यांचे पालकमंत्रीपद !

मुंबई – गेले अनेक दिवस रखडलेली पालकमंत्र्यांची नियुक्ती १८ जानेवारीला घोषित करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे, तर आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे अन् बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. राज्यात यंदा प्रथमच सहपालकमंत्रीपद निर्माण करण्यात आले आहे.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर ‘बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना नको’, अशी मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे घेतले आहे. नागपूर आणि अमरावतीचे चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगरचे राधाकृष्ण विखे-पाटील, सांगलीचे चंद्रकांत पाटील, नाशिकचे गिरीश महाजन, जळगावचे अपेक्षेप्रमाणे गुलाबराव पाटील, मुंबई उपनगर आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, रत्नागिरीचे दायित्व उदय सामंत, सोलापूरचे दायित्व जयकुमार गोरे यांच्याकडे, नांदेडचे दायित्व अतुल सावे, सातार्‍याचे शंभूराज देसाई यांच्याकडे, सिंधुदुर्गचे नितेश राणे, तर अकोल्याचे पालकमंत्रीपद आकाश फुंडकर यांच्याकडे देण्यात आले आहे.

कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे प्रकाश आबीटकर !

‘कोल्हापूरला हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदू विचारांचाच पालकमंत्री हवा’, अशी जाहीर मागणी काही दिवसांपूर्वी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केली होती. या संदर्भातील वृत्तेही प्रसिद्ध झाली होती. याची नोंद घेत शासनाने कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे प्रकाश आबिटकर, तर सहपालकमंत्री म्हणून पुणे येथील श्रीमती माधुरी मिसाळ यांची नियुक्ती केली आहे.