|
प्रयागराज – महाकुंभमेळामध्ये २२ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यांच्या मंत्रीमंडळातील सर्व मंत्री त्रिवेणी संगम येथे स्नान करणार आहेत. त्यानंतर मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत चित्रकुट आणि प्रयागराज येथील विकासकामांविषयी धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील, तसेच धार्मिक स्थळांच्या विकासाविषयी चर्चा करण्यात येणार आहे. २२ जानेवारीचा दिनांक श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या पहिल्या वर्धापन दिनाशी संबंधित आहे. धार्मिक आणि प्रशासकीय दृष्टीकोनातून हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वीच शासन आणि मेळा प्रशासन यांना अशी बैठक ठेवण्याचे निर्देश दिले होते; मात्र कोणत्या दिवशी मुख्य स्नान आणि बैठक ठेवायची ? याविषयी निर्णय प्रलंबित होता. मुख्य स्नानाच्या दिवशी बैठक न ठेवणे आणि अतीमहनीय लोकांना दर्शनबंदी करावी, जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना सहजपणे स्नानाचा लाभ घेता येईल. मंत्रीमंडळाच्या बैठकीत पर्यटन, धार्मिक कार्य आणि सांस्कृतिक विकास, यांसाठी प्रस्ताव सादर केले जातील. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात योगी आदित्यनाथ सरकारने गंगा द्रुतगती मार्ग आणि इतर महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना मान्यता दिली होती.