आज भाद्रपद शुक्ल तृतीया (६.९.२०२४) या दिवशी ‘वराह जयंती’ आहे. त्या निमित्ताने…
‘सत्ययुगात श्रीविष्णूचा ‘वराह’ हा तिसरा अवतार झाला. भाद्रपद शुक्ल तृतीया (६.९.२०२४) या दिवशी ‘वराह जयंती’ आहे. ‘श्री वराह अवतारा’च्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी शतशः प्रणाम ! ‘हे काव्यपुष्प श्री चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते. आम्हा साधकांवर श्री वराह अवताराची कृपादृष्टी सदैव राहू दे’, हीच प्रार्थना !’
वराहरूपात श्रीहरि अवतरले ।
श्री चरणी सारे कृतार्थ झाले ।
स्वार होऊनी बुद्धीवरी ।
वार करतो पाठीवरी ।
मित्र बनूनी घात करी ।
शत्रू नाही अहंकारापरी ।। १ ।।
सनत्कुमार ब्रह्मचारी ।
मुनीकुमार ते परम ज्ञानी ।
श्रीहरीचे परम पुजारी ।
भेटण्या गेले वैकुंठधामी ।। २ ।।
क्षीरसागरी शेषशयनी ।
निजले पद्मनाभस्वामी ।
अडवले जयविजय द्वारपालांनी ।
इथेच थांबा बालमुनी ।। ३ ।।
परम पावन प्रभूद्वारी ।
कसे झाले अहंकारी ? ।
मुनी कोपले दोघांवरी ।
शाप भोगा दुराचारी ।। ४ ।।
पतित होऊन धरणीवरी ।
जन्म घ्याल असुराघरी ।
श्रीविष्णूचे बनुनी वैरी ।
दुःख भोगा नरकापरी ।। ५ ।।
क्षमा करा मुनी एकवारी ।
पश्चात्तापाने याचना करी ।
जयविजय म्हणे, ‘कृपा करा आम्हावरी ।
तुम्हाविण आम्हा कोण तारी ?’ ।। ६ ।।
श्रीहरि भूवरी अवतरतील ।
भूमातेचा उद्धार करतील ।
तेच तुमचे प्राण घेतील ।
अन् तुम्हाला भवसागरातून तारतील ।। ७ ।।
गर्भ वाढला दैत्यउदरी ।
पुत्र जन्मले कश्यपगोत्री ।
केशकांती असे सोनेरी ।
‘हिरण्याक्ष’ अन् ‘हिरण्यकश्यपु’ ते असती ।। ८ ।।
पुत्र वाढले कश्यपाघरी ।
माता दिती सांभाळ करी ।
ऋषीपुत्र असले जरी ।
दैत्यसंस्कार रुजले अंतरी ।। ९ ।।
हिरण्याक्षाने कठोर तप केले ।
ब्रह्मदेव त्यावरी प्रसन्न झाले ।
त्याने इच्छित वरदान दिले ।
हिरण्याक्षाने त्रिलोक जिंकले ।। १० ।।
आसुरी राज्य स्थापन केले ।
निष्पाप लोकांचे प्राण हरले ।
ऋषीमुनींचे आश्रम जाळले ।
विष्णुभक्तांना पुष्कळ छळले ।। ११ ।।
हिरण्याक्षाने भूदेवीचे हरण केले ।
तिला पाताळलोकात कैद केले ।
तिच्यावर पुष्कळ अत्याचार केले ।
ते पाहून मानवासह देवही हळहळले ।। १२ ।।
भूदेवीच्या करुण रुदनाने ।
अवतार घेतला श्रीहरीने ।
घनघोर युद्ध केले हिरण्याक्षाने ।
यमसदनी धाडिले त्यास वराहाने ।। १३ ।।
सुळ्यावर उचलूनी धरणी ।
बंधनमुक्त केली अवनी ।
वराहाने ठेवली जननी ।
शेषफण्यावरी सुरक्षित स्थानी ।। १४ ।।
स्तुती गायली गंधर्वांनी ।
गौरविले सर्व देवतांनी ।
सामगान केले ऋत्विजांनी ।
भावपुष्प अर्पिले हरिभक्तांनी ।। १५ ।।
वराहाने भूदेवीला तारले ।
सनत्कुमारांनी गुणगान गायिले ।
वराह बनूनी श्रीहरि अवतरले ।
श्री चरणी सारे कृतार्थ झाले ।। १६ ।।’
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |