Netflix Series IC 814 Row : भविष्यात आम्ही कलाकृतींमध्ये राष्ट्राच्या भावनांचा आदर राखू !

वादग्रस्त वेबसिरीजच्या प्रकरणी ‘नेटफ्लिक्स’चे सरकारला आश्‍वासन !

नवी देहली – ‘नेटफ्लिक्स’ची वेबसिरीज ‘आयसी ८१४ : द कंधार हायजॅक’मध्ये जिहादी आतंकवाद्यांची खरी नावे लपवून त्यांना हिंदु नावे देण्यात आल्यावरून केंद्र सरकारने ‘नेटफ्लिक्स’ला समन्स पाठवून बोलावले होते. या आस्थापनासमेवत झालेल्या बैठकीमध्ये नेटफ्लिक्सच्या भारतातील प्रमुख मोनिका शेरगिल यांनी ‘भविष्यात सादर होणार्‍या कलाकृतींविषयी आम्ही काळजी घेऊ, तसेच राष्ट्राच्या भावनांचा आदर राखू’, असे आश्‍वासन दिले.

या वेबसिरीजमध्ये वर्ष १९९९ मधील भारताच्या विमान अपहरणाची कथा दाखवण्यात आली आहे. या कथेत अपहरणात सहभागी आतंकवाद्यांची नावे ‘चीफ, ‘डॉक्टर’, ‘बर्गर,’ ‘भोला’ आणि ‘शंकर’ अशी ठेवण्यात आली आहेत. यावर सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप करत नेटफ्लिक्सला समन्स बजावले होते.