श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मागणी
पुणे – महंत रामगिरीजी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याच्या प्रकरणी मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन अर्वाच्च भाषेत महंत रामगिरीजी महाराज यांच्याविषयी गरळओक केली. हिंदुत्वनिष्ठ तथा सामाजिक कार्यकर्ते अमन परदेशी यांनी आसिफ शेख यांच्या या वक्तव्याचा सामाजिक माध्यमावर जाहीर निषेध केला. त्यानंतर महंमद सोहेल या व्यक्तीने इन्स्टाग्रामवरून अमन परदेशी यांना जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच हाशिम शहा नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून परदेशी यांच्या आईच्या संदर्भात अश्लील आणि विकृत धमकी दिली. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. परदेशी यांना पोलीस संरक्षण द्यावे, तसेच आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हे नोंद करावेत, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.