‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप ऐकतांना ठाणे सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !

‘३०.८.२०२१ या गोकुळाष्टमीच्या दिवशी ठाणे येथील सनातनच्या सेवाकेंद्रात ध्वनीक्षेपकावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप लावल्यावर तो ऐकतांना साधकांना काय जाणवते ?’, असा प्रयोग करण्यात आला. त्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. सौ. शर्मिला बांगर

अ. ‘जप ऐकतांना ‘माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत आहेत’, असे मला जाणवले.

आ. काही वेळ माझे मन निर्विचार झाले.

इ. मध्येच मला अनावश्यक दृश्ये दिसत होती.

ई. ‘नामजपाच्या माध्यमातून सूक्ष्मातून युद्ध चालू आहे’, असे मला जाणवले.’

२. श्री. सतीश बांगर

अ. ‘नामजप ऐकतांना माझे मन शांत झाले.

आ. ‘माझ्या डोक्यावर सुदर्शनचक्र फिरत आहे’, असे मला जाणवले.’

३. श्रीमती संध्या काटदरे

अ. ‘नामजप ऐकतांना माझी भावजागृती झाली.

आ. ‘श्रीकृष्णाला अनुभवता आले पाहिजे. मायेत अडकायला नको’, असे विचार माझ्या मनात आले.

इ. मला श्रीकृष्णाचे रूप आठवत होते.’

४. सौ. नेहाली शिंपी

४ अ. ‘जेव्हा जप चालू झाला, तेव्हा मला आनंदी आणि उत्साही वाटू लागले.

४ आ. सूक्ष्मातून श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवणे : मी सेवाकेंद्रात जेथे बसले होते, तेथील बाजूच्या आगाशीत मला सूक्ष्मातून बाळकृष्ण दिसला. तो हळूच पडद्याआडून माझ्याकडे पहात होता. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. त्यानंतर बाळकृष्ण संगणक कक्षात पळू लागला. मी त्याला ‘पळू नकोस’, असे सांगितले; पण तो ऐकत नव्हता. मग मी येऊन कार्यक्रमाच्या जागी बसले. तेव्हा ‘त्याने मागून हळूच येऊन मला मिठी मारली’, असे जाणवले.

४ इ. मला माझ्या आज्ञाचक्रावर संवेदना जाणवू लागल्या. ‘माझ्या आज्ञाचक्रावर काहीतरी गोल फिरत आहे आणि तेथे थोडासा प्रकाश आहे’, असे मला जाणवत होते.

४ ई. ‘ज्या दिशेने जप चालू होता, त्या दिशेला मला खेचल्यासारखे वाटू लागले. विरुद्ध दिशेनेही खेचल्यासारख्या संवेदना माझ्या डोक्याजवळ होत होत्या.

४ उ. मला ध्यान लागल्यासारखे वाटू लागले.

४ ऊ. जप बंद झाल्यावरसुद्धा ‘डोळे उघडू नयेत. असेच बसून रहावे’, असे मला वाटत होते.’

५. कु. हर्षदा सूर्यवंशी

अ. ‘नामजप चालू असतांना मला आईच्या कुशीत असल्यासारखे सुरक्षित वाटले.

आ. ‘नामजप संपू नये’, असे मला वाटले.’

६. कु. केतकी शिंपी

अ. ‘दिवसभर माझे डोके दुखत होते. जप ऐकल्यावर मला हलकेपणा जाणवू लागला आणि चांगले वाटू लागले.’

७. कु. सिद्धार्थ देवघरे

७ अ. ‘पहिल्या वेळी जप ऐकत असतांना माझे मन विचलित होत होते. मी जपावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न केला; पण तसे होत नव्हते.

७ आ. नंतर परत एकदा जप लावला. तेव्हा माझे मन एकाग्र झाले आणि मला त्यातून आनंद मिळू लागला.

७ इ. मी तोंडाला मुखपट्टी (मास्क) लावली होती, तरी मला ५ – १० सेकंद सुगंध आला.

७ ई. श्रीकृष्ण समोर आला असल्याचे जाणवणे : त्यानंतर मी आणखी मन लावून नामजप ऐकला. तेव्हा ‘कृष्ण आपल्या समोर आला आहे’, असे मला जाणवले आणि त्याचे निळे चरण माझ्या डोळ्यांसमोर आले. ‘मी त्याच्या हातांवर माझे मस्तक ठेवले आहे’, असे मला जाणवले.

७ उ. श्रीकृष्णाने सूक्ष्मातून साधकाच्या दुखणार्‍या पायावरून हात फिरवल्यावर दुखणे उणावणे आणि भावजागृती होणे : माझा पाय दुखत होता; म्हणून मी कृष्णाला प्रार्थना केली. तेव्हा मला जाणवले, ‘श्रीकृष्ण माझ्या बाजूला बसला आहे. तो त्याचा हात माझ्या पायावरून फिरवत आहे.’ त्यानंतर हळूहळू माझ्या पायाचे दुखणे न्यून होत गेले. त्या वेळी माझ्या पायाला थंड स्पर्श जाणवत होता. तेव्हा माझी भावजागृती झाली.’

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/मान्यवरांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक