‘श्री. श्रीराम लुकतुके (वय ४३ वर्षे) हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आहे. मला त्यांच्या समवेत सेवा करतांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन घेऊन स्वतःमध्ये पालट करणे
वर्ष २०१७ मध्ये श्रीरामदादा देहली येथे सेवेसाठी आले. तेव्हा त्यांची शारीरिक स्थिती चांगली नव्हती. त्यांना ‘पाठदुखी, प्राणशक्ती न्यून होणे’, असे त्रास होत. थोडी शारीरिक सेवा केल्यावरही ते लगेच थकून जायचे आणि त्यांचा बराच वेळ विश्रांती घेण्यातच जायचा. नंतर त्यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन घेऊन स्वतःमध्ये पुष्कळ पालट केले. पूर्वीच्या तुलनेत आता त्यांची क्षमता पुष्कळ वाढली आहे.
२. वक्तशीरपणा
‘वक्तशीरपणा’ हा दादांचा एक विशेष गुण आहे. बाहेर कुठेही संपर्काला जातांना दादा वेळेत सिद्ध होतात. ‘माझ्याकडून विलंब होऊ नये’, हाच विचार त्यांच्या मनात सतत असतो.
३. इतरांना साहाय्य करणे
सेवाकेंद्रात कुणी आजारी असेल किंवा रात्री कुणाला काही त्रास होत असेल, तर दादा लगेचच साहाय्य करतात.
४. अनेक सेवा कौशल्याने करणे
काही वेळा दादांची शारीरिक स्थिती चांगली नसते, तरीही ते संपर्कासाठी दौर्याला जातांना ६ – ६ घंटे गाडी चालवणे, तेथील समन्वय बघणे आणि सगळ्याच्या नोंदी ठेवणे इत्यादी सेवा कौशल्याने करतात.
५. साधनेचे योग्य दृष्टीकोन देणे
मी माझ्या मनातील अयोग्य विचार दादांना सांगतो. तेव्हा दादा मला साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन ‘विचार कसा केला पाहिजे ?’, हे सांगतात आणि अंतर्मुख करतात.
६. स्वतःच्या चुका आणि अयोग्य विचार मोकळेपणाने साधकांना सांगणे
पूर्वी सेवा करतांना दादांकडून चुका होत. तेव्हा ते त्या चुका मोकळेपणाने साधकांच्या ‘व्हॉट्सॲप’ गटात पाठवत. केवळ चूकच नाही, तर दादांनी अनिष्ट शक्तींमुळे त्यांच्या मनात येणारे अयोग्य आणि नकारात्मक विचार अन् व्यष्टी साधनेविषयीचे अयोग्य दृष्टीकोन हेसुद्धा गटावर पाठवले आहेत. दादांनी मथुरा सेवाकेंद्रातील सर्व साधकांमध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे साधक दादांकडून शिकून तसे करण्याचा प्रयत्न करत आहेत. दादांनी स्वतः अंतर्मुख राहून समष्टीलाही त्यांच्या कृतीतून शिकवले आहे.
७. प्रसिद्धीशी निगडित सेवा प्रभावीपणे करणे
प्रशासनाच्या दृष्टीने काही निवेदन किंवा पत्र द्यायचे असेल, तर त्याचे संकलन करणे, इंग्रजी भाषेत त्याचे ‘ड्राफ्टिंग’ करणे, सामाजिक माध्यमावर योग्य पद्धतीने प्रसारीत करणे, हा दादांच्या गुणांचा एक विशेष भाग लक्षात येतो. ते या सगळ्या गोष्टी प्रभावीपणे करतात.
८. उत्तम संपर्क करण्याचे कौशल्य असल्याने अनेक हिंदुत्वनिष्ठ व्यक्तींपर्यंत धर्मकार्य पोचवणे
दादांनी ‘सोशल मिडिया’च्या माध्यमातून समाजातील अनेक बुद्धीजीवी, हिंदुत्वनिष्ठ आणि प्रतिष्ठित यांच्याशी चांगला संपर्क ठेवला आहे. याचा उपयोग आम्हाला जिज्ञासूंना संपर्क करण्यासाठी होत आहे, तसेच ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने देश-विदेशांतील अनेक प्रतिष्ठित आणि हिंदुत्वनिष्ठ रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले होते. या माध्यमातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य सर्वत्र पोचवण्यासाठी श्रीरामदादा माध्यम बनले आहेत’, हे माझ्या लक्षात आले.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, ‘श्रीरामदादांमध्ये अनेक गुण आहेत. मला त्यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो आणि ‘दादांची प्रगती अशीच जलद गतीने होत रहावी’, अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो.’
– श्री. कार्तिक साळुंके, मथुरा, उत्तरप्रदेश. (जुलै २०२४)
|