सण-उत्सवांत लेझर आणि डीजे वाजवण्याला बंदी नाही !

  • मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका निकाली काढली !

  • न्यायालयात याचिकाकर्ते पुरावे सादर करू शकले नाहीत !

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – सण-उत्सवांत मोठ्या प्रमाणात होणारे ध्वनीप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करण्यात सरकारी यंत्रणा सकृतदर्शनी अपयशी ठरल्याचे पुरावे याचिकाकर्ते सादर करू शकलेले नाहीत. त्यामुळे ‘या आदेशांच्या उल्लंघनाच्या प्रकरणी चौकशीची मागणी केली जाऊ शकत नाही’, असा उल्लेख करत सण-उत्सवांतील डीजे, प्रखर दिव्यांचा (लेझर बीम) वापर, त्यांची विक्री, ते भाडेतत्त्वावर देणे या सर्वांवर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने २१ ऑगस्ट या दिवशी फेटाळून लावली.

लेझर बीमसाठी कायदेशीर प्रावधान नसल्याचे स्पष्ट

१. सण-उत्सवांत मिरवणुकीसह लेझर बीम, कर्णकर्कश डीजेचा वापर करण्याला ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायती’ने जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते. लेझर बीम आणि डीजेच्या वापरामुळे अनेकांची दृष्टी अन् श्रवण क्षमता यांवर परिणाम झाला असून काहींना कायमची दृष्टी गमवावी लागली आहे. त्यामुळे लेझर बीम आणि डिजे यांच्या वापरावर पूर्ण बंदीची मागणी करण्यात आली होती.

२. ‘लेझर बीम’च्या नियमनासाठी अद्यापपर्यंत कोणतेही कायदेशीर प्रावधान नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक मेळावे आणि कार्यक्रम यांमध्ये ‘लेझर बीम’च्या वापरावरील नियमनासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारच्या योग्य प्राधिकरणाकडे तपशीलवार निवेदन देण्याची याचिकाकर्त्यांना मुभा आहे’, असे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपिठाने याचिका निकाली काढतांना स्पष्ट केले आहे.