US India Day Parade : संचलनातील श्रीराममंदिराच्या देखाव्यामुळे भारतीय वंशाच्या अमेरिकी मुसलमानांनी घेतला नाही सहभाग !

न्यूयॉर्क (अमेरिका) येथे भारतीय दिवस संचलन !

संचलनातील श्रीराममंदिराचा देखावा

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेत रहाणार्‍या अनिवासी भारतियांनी १८ ऑगस्ट या दिवशी भारताचा स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. यानिमित्ताने न्यूयॉर्कमध्ये ४२ व्या भारत दिवस संचलनाचे (‘इंडिया डे परेड’चे) आयोजन करण्यात आले होते; मात्र त्याच संचलनातील श्रीराममंदिराच्या देखाव्यावरून वाद निर्माण झाला. भारतीय अमेरिकी मुसलमानांनी या देखाव्याला ‘मुसलमानविरोधी’ म्हणत तो हटवण्याची मागणी केली होती; मात्र आयोजकांनी ही मागणी धुडकावून लावत या संचलनामध्ये या देखाव्याचा समावेश केला. भारतीय अमेरिकी मुसलमानांचे प्रतिनिधित्व करणार्‍या एका गटाने श्रीराममंदिराच्या देखाव्याच्या समावेशाच्या निषेधार्थ या संचलनामधून स्वतःचा (मुसलमानांचा) देखावा मागे घेतला होता, तसेच या गटातील सदस्यांनी यात सहभागी होणेही टाळले.

या संचलनामध्ये अभिनेते असणारे खासदार मनोज तिवारी, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी सहभाग घेतला.

कसा होता श्रीराममंदिराचा देखावा ?

श्रीराममंदिराच्या देखाव्यासाठी १८ फूट लांब, ९ फूट रुंद आणि ८ फूट उंच अशी लाकडी नौका सिद्ध करण्यात आली होती. ती भारतात बनवली होती आणि विमानाद्वारे अमेरिकेत पाठवली होती. या नौकेमध्ये अयोध्येत भगवान श्रीरामासाठी वापरलेल्या  गुलाबी वाळूच्या दगडाचा वापर करून लहान श्रीराममंदिर दाखवण्यात आले होते.

श्रीराममंदिर फुलांनी सजवण्यात आले होते, तसेच श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिकृतीही नौकेवर ठेवण्यात आली होती.