महाराष्ट्रात मंदिरांच्या भूमी बळकावण्याचे अनेक प्रकार उघड !

कोल्हापूर, २२ जानेवारी (वार्ता.) – मंदिरांचे आर्थिक व्यवस्थापन, धार्मिक उत्सव यांसाठी राजे-महाराजे यांच्यासह भाविक-भक्त यांनी देवस्थानांना शेतभूमी दान दिल्या होत्या, तसेच तत्कालीन मंदिर व्यवस्थापनानेही काही भूमी खरेदी केल्या होत्या. या शेतभूमींपैकी इमान असलेल्या शेतभूमीची भूधारणा पद्धती भोगवटादार ‘वर्ग-२’ असल्याने त्या भूमीचे कोणतेही अवैधरित्या हस्तांतरण करता येत नाही. असे असतांना शेत भूमीच्या कब्जेदारांकडून आणि भूमाफियांच्या हस्तक्षेपामुळे स्थानिक महसूल प्रशासनाच्या साहाय्याने या शेतभूमींवरील संस्थानचे नाव अवैधरित्या न्यून करून बर्याच भूमी हडप करण्यात आल्या आहेत. त्या संदर्भात दोषींवर कारवाई करण्यासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ (भूमी बळकावणे विरोधी कायदा) लागू करण्यात यावा, या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हा प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वीकारले.
या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा संयोजक श्री. प्रमोद सावंत, सहसंयोजक श्री. अभिजित पाटील आणि श्री. अशोकराव गुरव, श्री. संजय माळी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे आणि श्री. कैलास दीक्षित, श्री. संदीप शेटके, श्री. सूर्यकांत गुरव उपस्थित होते.
शाहूवाडी – याच मागणीचे निवेदन शाहूवाडी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनाही देण्यात आले. या वेळी मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. प्रसाद कुलकर्णी, तालुका संयोजक श्री. महेश कोठावळे, शाहूवाडी तालुका गुरव समाजाचे अध्यक्ष श्री. बाळू गुरव, उपाध्यक्ष श्री. बाबूराव गुरव, माजी नगराध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील, भाजपचे जिल्हाउपप्रमुख श्री. राजू प्रभावळकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. युवराज काटकर, जुगाई देवस्थानचे श्री. विश्वास गुरव, श्री. चारुदत्त पोतदार आणि श्री. रमेश पडवळ उपस्थित होते.