गडचिरोलीत पोलाद उद्योगामध्ये ५ सहस्र २०० कोटींची गुंतवणूक
मुंबई – दावोस (स्वित्झर्लंड) येथे जागतिक आर्थिक परिषद (‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’) चालू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यंदा भारताने आपले सर्वांत मोठे शिष्टमंडळ त्यासाठी पाठवले आहे. पहिल्या दिवशी ६ लाख २५ सहस्र ४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आस्थापनांच्या प्रतिनिधींच्या भेटी घेतल्या आहेत आणि अनेकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले आहे. टाटा समूह ३० सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करणार आहे. ही बैठक ५ दिवस चालणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली. हरित ऊर्जा, इलेक्ट्रीक वाहने, उद्योग जगतातील अनेक नवीन घडामोडी यांवर या दोघांमध्ये या वेळी चर्चा झाली.
गडचिरोली येथे पोलाद उद्योगामध्ये ५ सहस्र २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा पहिला सामंजस्य करार करण्यात आला आहे. कल्याणी समूह आणि महाराष्ट्र शासन यांमध्ये स्टील आणि संरक्षण क्षेत्रात करार करण्यात आला आहे. यामाध्यमातून ४ सहस्र जणांना रोजगार मिळणार आहे. कल्याणी समूहाचे प्रमुख अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हा करार केला आहे.