सावकारी जाचामुळे कुटुंबाने केला सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न !

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी – व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करून, तसेच भूमीही नावावर करून दिल्यावर वाढीव पैशासाठी सावकाराने तगादा लावल्याने एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये आई आणि मुलाचा मृत्यू झाला असून वडील वैभव हांडे वाचले आहेत. चिखली येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी संतोष कदम, संतोष पवार आणि जावेद शेख या ३ सावकारांना कह्यात घेतले.

सावकारांच्या त्रासाला कंटाळून हांडे कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. वैभव हांडे यांनी मुलाचा गळा दाबून खून केला, तसेच हांडे दांपत्याने पंख्याला दोरा बांधून गळफास घेतला. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला, तर वैभव हांडे यांना रुग्णालयात नेल्याने त्यांचे प्राण वाचले, असे पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले. पत्नी शीतल हांडे यांनी आत्महत्येपूर्वी भावाला आत्महत्या करत असल्याचा संदेश भ्रमणभाषवर पाठवला होता. त्यानुसार पोलिसांनी अन्वेषण केले. वैभव हांडे यांच्यावर मुलाच्या खून प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे, असे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • सावकारांचा जाच टाळण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांचा वचक हवा !
  • आध्यात्मिक वारसा असणार्‍या भारतात जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे जनता समस्यांच्या विरुद्ध लढण्याऐवजी आत्महत्येचा पर्याय निवडते, हे दुर्दैवी आहे !