सगळ्यांशी समभावाने वागणार्‍या आणि प.पू. गुरुदेवांप्रती श्रद्धा असलेल्या पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक (वय ७६ वर्षे) !

‘श्रावण पौर्णिमा (नारळी पौर्णिमा, १९.८.२०२४) या दिवशी प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पानवळ, बांदा येथील गौतमारण्य आश्रमात सेवा करणार्‍या श्रीमती योजना चंद्रकांत न्हावी यांना पू. (सौ.) माई यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांच्या चरणी त्यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. प्रीती

‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला पानवळ, बांदा येथील गौतमारण्य आश्रमात प्रत्येक शनिवारी आणि रविवारी जाण्याची अन् तेथे सेवा करण्याची संधी मिळते. मी शनिवारी संध्याकाळी बांदा येथे जाण्यासाठी प्रवास करत असतांना पू. माई मला भ्रमणभाष करून ‘तू कुठे आहेस ? तू कुठपर्यंत पोचली आहेस ?’, अशी माझी विचारपूस करतात. मी आश्रमात गेल्यावर त्या माझ्या कुटुंबियांची विचारपूस करतात. पू. माई अन्नपूर्णादेवीसम आहेत. त्या कधीही कुणालाही घरातून रिक्त हस्ते पाठवत नाहीत. त्या सर्वांशी समभावाने वागतात.

श्रीमती योजना चंद्रकांत न्हावी

२. इतरांच्या मताचा आदर करणे

पू. माईंना कुणीही काही सांगितले, तर त्या नम्रपणे ऐकून घेतात. प.पू. दास महाराज यांची प्रकृती ठीक नसतांना कुणी काही उपाय सुचवल्यास पू. माई ते ऐकून घेतात आणि ‘उपाय करूया’, असे सांगतात.

३. उतारवयातही तरुणांना लाजवेल, अशी सेवा करणे

प.पू. दास महाराज गौतमारण्य आश्रमात वास्तव्याला आहेत. पू. माई प.पू. दास महाराज यांची सेवा करतात. पू. माईंना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि त्यांच्या पायांना चिखल्या (टीप) झाल्या आहेत. त्या दुखणे सहन करून सेवा करतात. त्या वयाच्या ७६ व्या वर्षीही तरुणांना लाजवेल, अशी सेवा करतात.

(टीप – चिखल्या : चिखलात चालल्याने पायांना होणारा एक त्वचा विकार)

४. प.पू. गुरुदेवांप्रती श्रद्धा

पू. माईंची प.पू. गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती) अतूट श्रद्धा आहे. त्या म्हणतात, ‘‘प.पू. गुरुदेव सर्व चांगलेच करतील.’’ पू. माईंची संत गजानन महाराज यांच्यावरही श्रद्धा आहे. त्या म्हणतात, ‘‘महाराज येथे आहेत. ते सर्व पहात आहेत.’’ पू. माई सांगतात, ‘‘गौतमारण्य आश्रम’ हा गुरूंचा आश्रम आहे.’’

पू. (सौ.) माई यांचे गुणवर्णन करावे, तेवढे अल्पच आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे शब्दपुष्प त्यांच्या चरणी अर्पण करते. प.पू. गुरुदेव, प्रभु श्रीराम, मारुतिराया, प.पू. दास महाराज यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती योजना चंद्रकांत न्हावी, आरोंदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (२६.७.२०२४)